इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

मार्क 3

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1मग येशू पुन्हा एका सभास्थानात गेला, तेथे वाळलेल्या हाताचा एक मनुष्य होता.
2येशूवर आरोप करण्यासाठी कारण मिळावे म्हणून तो शब्बाथ दिवशी त्या मनुष्यास बरे करतो की काय हे पाहण्यासाठी ते त्याच्यावर बारकाईने नजर ठेवून होते.
3येशू वाळलेल्या हाताच्या मनुष्यास म्हणाला, “ऊठ आणि लोकांच्या समोर उभा राहा.”
4नंतर तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ दिवशी चांगले करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीवे मारणे यांतील कोणते योग्य आहे?” पण ते गप्प राहीले.
5मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पहिले व त्या मनुष्यास म्हणाला, “तुझा हात लांब कर,” त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला.
6नंतर परूशी निघून गेले आणि लगेच त्यास जीवे मारणे कसे शक्य होईल याविषयी हेरोदीयांबरोबर येशूविरूद्ध कट करीत बसले.
7मग येशू आपल्या शिष्यांसह सरोवराकडे निघून गेला आणि गालील व यहूदीया प्रांतातून मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग निघाला.
8यरूशलेम शहर, इदोम प्रांत, यार्देने नदीच्या पलीकडच्या प्रदेशातून, सोर व सिदोन शहराच्या आसपासच्या प्रदेशातून मोठा समुदाय, जी मोठमोठी कामे तो करत होता त्याविषयी ऐकून त्याच्याकडे आला.
9मग गर्दीमुळे चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने आपल्या शिष्यांना एक होडी तयार ठेवण्यास सांगितले.
10कारण त्याने अनेक लोकांस बरे केले होते म्हणून ज्यांना रोग होते ते त्यास स्पर्श करण्यासाठी त्याच्या अंगावर पडत होते.
11जेव्हा अशुद्ध आत्मे येशूला पाहत तेव्हा ते त्याच्यासमोर खाली पडून मोठ्याने ओरडत की, “तू देवाचा पुत्र आहेस!”
12पण तो त्यांना सक्त ताकीद देत होता, की मला प्रकट करू नका.
13मग येशू डोंगरावर चढून गेला व त्यास जे शिष्य हवे होते? त्यांना त्याने स्वतःकडे बोलावले आणि ते त्याच्याकडे आले.
14तेव्हा त्याने बारा जणांची नेमणूक केली त्यांना त्याने प्रेषित हे नाव दिले. त्याने त्यांची यासाठी निवड केली की, त्यांनी त्याच्यासोबत असावे व त्यांना दुसऱ्या ठिकाणी उपदेश करण्यासाठी त्यास पाठवता यावे.
15व त्यांना भूते काढण्याचा अधिकार असावा.
16मग येशूने या बारा जणांची निवड केली व जो शिमोन त्यास पेत्र हे नाव दिले.
17जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान त्यांना त्याने बोआनेर्गेश, ज्याचा अर्थ गर्जनेचे पुत्र असा होतो हे नाव दिले.
18अंद्रिया, फिलिप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी
19आणि यहूदा इस्कर्योत ज्याने नंतर येशूचा विश्वासघात केला.
20मग येशू घरी आला आणि पुन्हा इतके लोक जमले की त्यांना जेवता सुद्धा येईना.
21त्याच्या कुटुंबातील लोकांनी याविषयी ऐकले तेव्हा ते त्यास धरावयास निघाले कारण त्यास वेड लागले असे त्यांचे म्हणणे होते.
22तसेच यरूशलेम शहराहून आलेले नियमशास्त्राचे शिक्षक म्हणत होते की, याच्यामध्ये बालजबूल आहे आणि त्या भुतांच्या अधिपतीच्या साहाय्याने हा भूते काढतो.
23मग येशूने त्यांना आपणाजवळ बोलावून दाखल्याच्या साहाय्याने त्यांना सांगू लागला, “सैतान सैतानाला कसा काढील?
24आपापसात फूट पडलेले राज्य टिकू शकत नाही.
25आपापसात फूट पडलेले घरही टिकू शकत नाही.
26जर सैतान स्वतःलाच विरोध करू लागला आणि त्याच्यातच फूट पडली तर तो टिकू शकणार नाही, तर त्याचा शेवट होईल.
27खरोखर कोणालाही बलवान मनुष्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही. प्रथम त्या बलवान मनुष्यास बांधले पाहिजे, मगच त्याचे घर लुटता येईल.”
28मी तुम्हास खरे सांगतो की, “लोकांच्या पापांची व त्यांनी केलेल्या देवाच्या निंदेची त्यांना क्षमा होईल.
29पण जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील, त्याची कधीच क्षमा होणार नाही आणि तो मनुष्य सार्वकालिक पापाचा दोषी आहे.”
30येशू असे म्हणाला कारण त्याच्यामध्ये अशुद्ध आत्मा आहे असे ते त्याच्याविषयी म्हणत होते.
31तेव्हा येशूची आई व भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्यास बोलावले.
32लोकसमुदाय येशूभोवती बसला होता, ते त्यास म्हणाले, “तुझी आई व तुझे भाऊ बाहेर तुझी वाट पाहत आहेत.”
33त्याने त्यांना उत्तर दिले, “माझी आई व माझे भाऊ कोण आहेत?”
34मग तो आपल्या सभोवताली बसलेल्यांकडे सभोवती पाहून म्हणाला, “पाहा माझी आई आणि माझे भाऊ.
35जे कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात तेच माझे भाऊ, माझी बहीण व माझी आई.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.