इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

मार्क 12

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1येशू त्यांना दाखले सांगून शिकवू लागला, “एका मनुष्याने द्राक्षाचा मळा लावला व त्याच्याभोवती कुंपण घातले. त्याने द्राक्षरसासाठी कुंड खणले आणि टेहळणीसाठी माळा बांधला. त्याने तो शेतकऱ्यास खंडाने दिला व तो दूर प्रवासास गेला.
2हंगामाच्या योग्यवेळी शेतकऱ्याकडून द्राक्षमळ्यातील फळांचा योग्य हिस्सा मिळावा म्हणून त्याने एका नोकरास पाठवले.
3परंतु त्यांनी नोकरास धरले, मारले आणि रिकामे पाठवून दिले.
4नंतर त्याने दुसऱ्या नोकरास पाठवले. त्यांनी त्याचे डोके फोडले आणि त्यास अपमानकारक रीतीने वागविले.
5मग धन्याने आणखी एका नोकराला पाठवले. त्यांनी त्यास जिवे मारले. त्याने इतर अनेकांना पाठवले. शेतकऱ्यांनी काहींना मारहाण केली तर काहींना ठार मारले.
6धन्याजवळ पाठवण्यासाठी आता फक्त त्याचा प्रिय मुलगा उरला होता. तो म्हणाला, खात्रीने ते माझ्या मुलाला मान देतील. तो त्याचा आवडता मुलगा होता म्हणून शेवटी त्याने त्यास त्या शेतकऱ्यांकडे पाठवले.
7परंतु ते शेतकरी एकमेकांस म्हणाले, हा तर वारीस आहे. चला, आपण याला जिवे मारू म्हणजे वतन आपलेच होईल!
8मग त्यांनी त्यास धरले, जिवे मारले आणि द्राक्षमळ्याबाहेर फेकून दिले.
9तर मग द्राक्षमळ्याचा धनी काय करील? तो येईल आणि शेतकऱ्यांना जिवे मारील व द्राक्षमळा दुसऱ्यांना देईल.
10तुम्ही हा शास्त्रलेख वाचला नाही काय? जो दगड बांधणाऱ्यांनी नाकारला तो कोनशिला झाला.
11हे परमेश्वराकडून झाले, आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक कृत्य आहे.”
12मग ते येशूला अटक करण्याचा मार्ग शोधू लागले. परंतु त्यांना लोकांची भीती वाटत होती. त्यास अटक करण्याची त्यांची इच्छा होती कारण त्यांना माहीत होते की, हा दाखला त्याने त्यांनाच उद्देशून सांगितला होता. मग ते त्यास सोडून निघून गेले.
13नंतर त्यांनी त्यास चुकीचे बोलताना पकडावे म्हणून काही परूशी व काही हेरोदी लोकांस त्याच्याकडे पाठवले.
14ते त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “गुरूजी की, आपण प्रामाणिक आहात आणि पक्षपात न करता आपण देवाचा मार्ग खरेपणाने शिकविता हे आम्हास माहीत आहे तर मग कैसरला कर देणे योग्य आहे की नाही? आणि आम्ही तो द्यावा की न द्यावा?”
15परंतु येशूने त्यांचा ढोंगीपणा ओळखला व त्यांना म्हणाला, “तुम्ही माझी परीक्षा का पाहता? माझ्याकडे एक नाणे आणा म्हणजे मी ते पाहीन.”
16मग त्यांनी त्याच्याकडे एक नाणे आणले. त्याने त्यांना विचारले, “या नाण्यावरील ही प्रतिमा व हा लेख कोणाचा आहे?” ते त्यास म्हणाले, “कैसराचा.”
17मग येशू त्यांना म्हणाला, “जे कैसराचे ते कैसराला आणि जे देवाचे ते देवाला द्या.” तेव्हा त्यांना त्याच्या उत्तराविषयी फार आश्चर्य वाटले.
18नंतर, जे पुनरुत्थान नाही असे मानणारे काही सदूकी त्याच्याकडे आले त्यांनी त्यास विचारले,
19“गुरुजी. मोशेने आमच्यासाठी पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, जर कोणा मनुष्याचा भाऊ मरण पावला व त्याची पत्नी मागे राहिली, परंतु त्यांना मूलबाळ नसले तर आपल्या भावाच्या वंश पुढे चालावा म्हणून त्या मनुष्याने तिच्याबरोबर लग्न करावे आणि मरण पावलेल्या भावाचा वंश वाढवावा.
20तर असे कोणी सात भाऊ होते. पहिल्याने पत्नी केली व तो मूलबाळ न होता मरण पावला.
21दुसऱ्याने तिच्याबरोबर लग्न केले, तोसुध्दा मूलबाळ न होता मरण पावला.
22तिसऱ्याने तसेच केले. त्या सात भावांपैकी एकालाही त्या स्त्रीपासून, मूलबाळ झाले नाही. शेवटी ती स्त्रीही मरण पावली.
23सातही भावांनी तिच्याबरोबर लग्न केले तर पुनरुत्थानाच्या वेळी जेव्हा लोक मरण पावलेल्यातून उठतील तेव्हा ती कोणाची पत्नी असेल? कारण सातही जणांनी तिच्याबरोबर लग्न केले होते.”
24येशू त्यांना म्हणाला, “खात्रीने, शास्त्रलेख आणि देवाचे सामर्थ्य तुम्हास माहीत नाही म्हणून तुम्ही अशी चूक करीत आहात.
25कारण जेव्हा लोक मरण पावलेल्यातून उठतील तेव्हा ते लग्न करणार नाहीत व करून देणार नाहीत, त्याऐवजी ते स्वर्गातील देवदूताप्रमाणे असतील.
26परंतु मरण पावलेल्यांच्या पुन्हा उठण्याविषयी तुम्ही मोशेच्या पुस्तकातील जळत्या झुडपाविषयी वाचले नाही काय? तेथे देव मोशाला म्हणाला, मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे.
27तो मरण पावलेल्यांचा देव नव्हे तर जिवंत लोकांचा देव आहे. तुम्ही फार चुकत आहात.”
28त्यानंतर एका नियमशास्त्राच्या शिक्षकाने त्यांना वाद घालताना ऐकले. येशूने त्यांना किती चांगल्या प्रकारे उत्तर दिले ते पाहिले. तेव्हा त्याने विचारले, “सर्व आज्ञा पैकी महत्त्वाची अशी पहिली आज्ञा कोणती?”
29येशूने उत्तर दिले, “पहिली महत्त्वाची आज्ञा ही, ‘हे इस्राएला, ऐक, प्रभू आपला देव एकच प्रभू आहे.
30तू आपल्या संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण मनाने आणि संपूर्ण शक्तीने तुझा देव प्रभू याच्यावर प्रीती कर.’
31दुसरी आज्ञा ही आहे, ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’ यापेक्षा दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही.”
32तो मनुष्य उत्तरला, “देव एकच आहे, गुरूजी आणि त्याच्याशिवाय कोणीही नाही असे आपण म्हणता ते खरे बोललात.
33त्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे हे सर्व यज्ञ व अर्पणे, जी आपणास करण्याची आज्ञा दिली आहे, त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे.”
34येशूने पाहिले की, त्या मनुष्याने शहाणपणाने उत्तर दिले आहे. तेव्हा तो त्यास म्हणाला, “तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस.” त्यानंतर त्यास प्रश्न विचारण्याचे धाडस कोणी केले नाही.
35येशू परमेश्वराच्या भवनात शिकवीत असता, तो म्हणाला, “ख्रिस्त दाविदाचा पुत्र आहे असे नियमशास्त्राचे शिक्षक म्हणातात ते कसे शक्य आहे?
36दावीद स्वतः पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन म्हणाला, ‘प्रभू देव, माझ्या प्रभूला म्हणाला, मी तुझे वैरी तुझ्या पायाखाली घालेपर्यंत, तू माझ्या उजवीकडे बैस.’
37दावीद स्वतः ख्रिस्ताला ‘प्रभू’ म्हणतो तर मग ख्रिस्त दाविदाचा पुत्र कसा?” आणि मोठा लोकसमुदाय त्याचे आनंदाने ऐकत होता.
38शिक्षण देताना तो म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांविषयी सावध असा. त्यांना लांब लांब झगे घालून मिरवायला आणि बाजारात नमस्कार घ्यायला आवडते.
39आणि सभास्थानातील व मेजवानीतील सर्वात महत्त्वाच्या जागांची त्यांना आवड असते.
40ते विधवांची घरे खाऊन टाकतात आणि धार्मिकता दाखविण्यासाठी ते लांब लांब प्रार्थना करतात. या लोकांस फार कडक शिक्षा होईल.”
41येशू दानपेटीच्या समोर बसून लोक पेटीत पैसे कसे टाकतात हे पाहत होता आणि पुष्कळ श्रीमंत लोक भरपूर पैसे टाकीत होते.
42नंतर एक गरीब विधवा आली व तिने दोन तांब्याची नाणी म्हणजे एक दमडी टाकली.
43येशूने आपल्या शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो की, सर्वांनी त्या पेटीत जे दान टाकले त्या सर्वांपेक्षा या विधवेने अधिक टाकले आहे.
44मी असे म्हणतो कारण त्यांच्याजवळ जे भरपूर होते त्यामधून त्यांनी काही दान दिले, परंतु ती गरीब असूनही तिच्याजवळ होते ते सर्व तिने देऊन टाकले. ती सर्व तिच्या जीवनाची उपजीविका होती.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.