इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

मार्क 1

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची ही सुरूवात आहे.
2यशया संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे, “पाहा, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील;
3अरण्यांत घोषणा करणाऱ्याची वाणी झाली, ‘परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा सरळ करा.’ ”
4त्याप्रमाणेच योहान आला, तो अरण्यांत बाप्तिस्मा देत होता आणि पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा करीत होता.
5यहूदीया प्रांत व यरूशलेम शहरातील सर्व लोक योहानाकडे आले. त्यांनी आपली पापे कबूल करून त्याच्यापासून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला.
6योहान उंटाच्या केसांपासून बनवलेली वस्त्रे घालीत असे. त्याच्या कंबरेला कातड्याचा पट्टा होता व तो टोळ व रानमध खात असे.
7तो घोषणा करून म्हणत असे, “माझ्यापेक्षाही महान असा कोणीएक माझ्यामागून येत आहे आणि मी त्याच्या वहाणांचा बंद खाली वाकून लवून सोडण्याच्या देखील पात्रतेचा नाही.
8मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील.”
9त्या दिवसात असे झाले की, येशू गालील प्रांतातील नासरेथ नगराहून आला आणि योहानाच्या हातून यार्देन नदीत येशूने बाप्तिस्मा घेतला.
10येशू पाण्यातून वर येताना, आकाश उघडलेले आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा उतरत आहे, असे त्यास दिसले.
11तेव्हा आकाशातून वाणी झाली की, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”
12मग आत्म्याने लगेचच त्यास अरण्यांत घालवले.
13सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यांत चाळीस दिवस राहीला. तो वनपशूंमध्ये होता. आणि देवदूत येऊन त्याची सेवा करीत होते.
14योहानाला अटक झाल्यानंतर, येशू गालील प्रांतास आला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने गाजवली.
15तो म्हणाला, “आता योग्य वेळ आली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे, पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.”
16येशू गालीलच्या सरोवराजवळून जात असता त्यास शिमोन व शिमोनाचा भाऊ अंद्रिया हे सरोवरात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते.
17येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे करीन.”
18मग ते लगेचच जाळी सोडून त्याच्यामागे चालू लागले.
19तेथून काहीसे पुढे गेल्यावर येशूला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळे नीट करताना दिसले.
20त्याने लगेच त्यांना हाक मारून बोलावले; मग ते त्यांचा पिता जब्दी व नोकरचाकर यांना तारवात सोडून त्याच्यामागे गेले.
21नंतर येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूम नगरास गेले, आणि लगेचच येशूने शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले.
22त्याच्या शिकवणुकीने ते चकित झाले, कारण येशू नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे शिकवीत नव्हता, तर त्यास अधिकार असल्यासारखा शिकवीत होता.
23त्याचवेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता, तो एकदम मोठ्याने ओरडला,
24आणि म्हणाला, “नासरेथच्या येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे, जो देवाचा पवित्र तो तूच.”
25परंतु येशूने त्यास धमकावून म्हटले, “शांत राहा व याच्यातून नीघ.”
26“नंतर अशुद्ध आत्म्याने त्यास पिळले व तो मोठ्याने ओरडून त्याच्यातून बाहेर निघून गेला.”
27लोक आश्चर्यचकित झाले व एकमेकांस विचारू लागले, “येथे काय चालले आहे? हा मनुष्य काहीतरी नवीन आणि अधिकाराने शिकवीत आहे. तो अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात!”
28येशूविषयीची ही बातमी ताबडतोब गालील प्रांतात सर्वत्र पसरली.
29येशू व त्याच्या शिष्यांनी सभास्थान सोडले आणि लगेच तो योहान व याकोब यांच्याबरोबर शिमोन व अंद्रिया यांच्या घरी गेला.
30शिमोनाची सासू तापाने बिछान्यावर पडली होती. तेव्हा त्यांनी ताबडतोब येशूला तिच्याविषयी सांगितले.
31तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले आणि तिचा ताप निघून गेला व ती त्यांची सेवा करू लागली.
32संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारी आणि भूतांनी पछाडलेल्यास त्याच्याकडे आणले.
33सर्व नगर दरवाजापुढे जमा झाले.
34त्याने निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्यांना बरे केले व अनेक लोकांतून भूते काढली. पण त्याने भूतांना बोलू दिले नाही कारण ती त्यास ओळखत होती.
35मग त्याने अगदी पहाटेस अंधार असतानाच घर सोडले आणि एकांत स्थळी जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली.
36शिमोन व त्याच्यासोबत असलेले येशूचा शोध करीत होते,
37व तो सापडल्यावर ते त्यास म्हणाले, गुरूजी “आम्ही सर्वजण तुमचा शोध करीत आहोत.”
38तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “आपण जवळपासच्या गावात जाऊ या, म्हणजे मला तेथे देखील उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ कारण त्यासाठीच मी निघून आलो आहे.”
39मग तो सर्व गालील प्रांतातून, त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत आणि भूते काढीत फिरला.
40एक कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याने स्वतःला बरे करण्याची त्यास विनंती केली. तो येशूला म्हणाला, “आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.”
41येशूला त्याचा कळवळा आला, त्याने हात पुढे करून त्यास स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.”
42आणि लगेच त्याचे कुष्ठ गेले व तो शुद्ध झाला.
43येशूने त्यास सक्त ताकीद दिली व लगेच लावून दिले.
44आणि म्हटले, “पाहा, याविषयी कोणाला काहीही सांगू नकोस, तर जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि त्यांना साक्ष व्हावी म्हणून तू आपल्या शुद्धीकरता मोशेने नेमलेले अर्पण कर.”
45परंतु तो तेथून गेला व घोषणा करून ही बातमी इतकी पसरवली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना, म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला आणि तरी चोहोबाजूंनी लोक त्याच्याकडे येत राहण्याचे थांबले नाही.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.