इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

मीखा 1

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1परमेश्वराचे वचन जे मीखा मोरेष्टी याजकडे, योथाम, आहाज व हिज्कीया ह्यांच्या दिवसात त्याच्याकडे आले, जे वचन शोमरोन व यरूशलेम यांच्याविषयी होते, ते असे.
2सर्व लोकांनो ऐका, पृथ्वी व ते सर्व जे तुझ्यात आहेत, तुम्ही ऐका! प्रभू परमेश्वर, त्याच्या पवित्र मंदिरातून तुमच्याविरुध्द साक्षीदार होवो.
3पाहा, परमेश्वर त्याच्या स्थानातून बाहेर येत आहे. तो खाली येणार व पृथ्वीवरील उच्चस्थानावर चालणार.
4विस्तवाजवळ ठेवल्यास मेण वितळते, तसे त्याच्या पायाखाली पर्वत वितळतील, दऱ्या दुभंगतील, आणि उंच टेकड्यावरून वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे ते वाहू लागतील.
5ह्याला सर्वांचे कारण याकोबचे पाप, तसेच इस्राएलाच्या घराण्याची दुष्कर्मे आहेत. याकोबाच्या बंड खोरीचे कारण काय? त्यास कारणीभूत शोमरोनच आहे की नाही? यहूदाची उंचस्थाने कोणती आहेत? ती यरूशलेमच आहेत की नाही?
6“म्हणून मी शोमरोनला शेतातल्या ढिगाप्रमाणे करीन, ती द्राक्षमळे लावण्याच्या जागेप्रमाणे होईल.” मी तिचे दगड दरीत ढकलून देईन, आणि तिचे पाये उघडे करीन.
7तिच्या सर्व मूर्तीं ठेचून तुकडे तुकडे केले जातील. तिच्या कोरीव मूर्ती आगीमध्ये भस्मसात केल्या जातील. तिच्या सर्व खोट्या दैवतांच्या मूर्तींचा मी नाश करीन, कारण तिने वेश्येच्या कमाईने त्या मिळवल्या आहेत, म्हणून वेश्येच्या वेतनास त्या परत जातील.
8या कारणास्तव मी विलाप व आकांत करीन. मी अनवाणी व वस्त्राशिवाय फिरेन. मी कोल्ह्याप्रमाणे मोठ्याने आकांत करीन आणि घुबडाप्रमाणे शोक करीन.
9कारण तिच्या जखमा बऱ्या न होणाऱ्या आहेत. कारण त्या यहूदापर्यंत आल्या आहेत, आणि तो माझ्या मनुष्यांच्या वेशीपर्यंत, यरूशलेमपर्यंत पोहोचला आहे.
10गथमध्ये हे सांगू नका; अजिबात रडू नका. बेथ-ले-अफ्रामध्ये मी धुळीत लोळलो.
11शाफीरमध्ये राहणारे लोकहो, तुम्ही नग्न आणि लज्जित होऊन निघून जा. सनानिवासी बाहेर निघून येत नाही, बेथ-एसलासचा शोक करेल, कारण त्यांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे.
12मारोथमधील लोक उत्सुकतेने चांगल्या बातमीची वाट पाहत आहेत, कारण परमेश्वराकडून संकट खाली यरूशलेमेच्या वेशीपर्यंत आले आहे.
13लाखीशात राहणारे, रथाला चपळ घोडा जुंप, लाखीश, तूच, सियोनेच्या कन्येला पापाची सुरूवात अशी होती. कारण इस्राएलाचे अपराध तुझ्यांत सापडले होते.
14म्हणून तू गथांतल्या मोरेश-गथला निरोपाचे नजराणे देशील; अकजीबची घरे इस्राएलाच्या राजाला निराश करतील.
15मारेशामध्ये राहणाऱ्या लोकांनो, मी तुझा वारीस तुझ्याकडे आणीन, जे तुमचा ताबा घेतील. इस्राएलचे पुढारी अदुल्लामला येतील.
16म्हणून तू आपले केस काप व मुंडन कर. कारण तुम्हास प्रिय असलेल्या मुलांसाठी तुम्ही शोक कराल. गरुडा प्रमाणे तुम्ही स्वत:च्या डोक्याचे मुंडन करा. कारण तुमच्या मुलांना तुमच्यापासून दूर नेले जाईल.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.