इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

मत्तय 28

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1मग शब्बाथानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजडतांच पहाटेस मग्दालीया नगराची मरीया, याकोब व योसेफ यांची आई मरीया कबर पाहावयास तेथे गेल्या
2त्यावेळी पाहा, तेथे मोठा भूकंप झाला. परमेश्वराचा दूत स्वर्गातून उतरून तेथे आला. त्याने कबरेच्या तोंडावरची धोंड बाजूला लोटली व तो तीवर बसला.
3त्याचे रूप चमकणाऱ्या विजेसारखे व त्याचे कपडे बर्फासारखे शुभ्र होते.
4पहारा करणारे शिपाई खूप घाबरले, ते थरथर कापू लागले आणि ते मरण पावलेल्या मनुष्यांसारखे झाले.
5देवदूत त्या स्त्रियांना म्हणाला, “भिऊ नका, कारण मी जाणतो की, ज्याला वधस्तंभावर खिळले होते त्या येशूला तुम्ही शोधत आहात.
6पण तो इथे नाही कारण तो म्हणाला होता, त्याप्रमाणे त्यास मरणातून उठविण्यात आले आहे. या आणि जेथे त्यास ठेवले होते ती जागा पाहा.
7आता लवकर जा आणि त्याच्या शिष्यांना सांगा, तो मरणातून उठला आहे आणि बघा, तो तुमच्यापुढे गालील प्रांतात जात आहे आणि तुम्ही त्यास तेथे पाहाल. पाहा, मी तुम्हास सांगितले आहे.”
8तेव्हा त्या स्त्रिया भयाने व मोठ्या आनंदाने कबरेजवळून घाईने निघाल्या व त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगण्यासाठी त्या धावत गेल्या.
9मग पाहा; येशू त्यांना भेटला आणि तो त्यांना म्हणाला, “शांती असो!” त्या त्याच्याजवळ आल्या. त्यांनी त्याचे पाय धरले आणि त्यास नमन केले.
10तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “भिऊ नका, जा, माझ्या भावांना सांगा की त्यांनी गालील प्रांतात जावे. ते तिथे मला पाहतील.”
11त्या स्त्रिया शिष्यांना सांगण्यासाठी गेल्या. तेव्हा कबरेवरील पहारेकरी शिपायांतील काहीजण नगरात गेले आणि त्यांनी घडलेले सर्व मुख्य याजकांना सांगितले.
12नंतर याजक जाऊन वडीलजनांना भेटले आणि त्यांनी एक कट रचला. त्यांनी शिपायांना पुष्कळ पैसे देऊन असे म्हणण्यास सांगितले.
13ते म्हणाले, “लोकांस असे सांगा की, आम्ही रात्री झोपेत असताना येशूचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शरीर चोरुन नेले.
14हे जर राज्यापालाच्या कानावर गेले तर आम्ही त्याच मन वळवू देऊ आणि तुम्हास काही होऊ देणार नाही.”
15मग शिपायांनी पैसे घेतले व याजकांनी सांगितले तसे केले आणि ही गोष्ट यहूदी लोकात आजवर बोलण्यात येते.
16पण अकरा शिष्य गालील प्रांतात येशूने त्यांना सांगितलेल्या डोंगरावर निघून गेले.
17आणि त्यांनी त्यास बघितले तेव्हा त्यांनी त्याची उपासना केली. पण काहींना संशय आला.
18तेव्हा येशू त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आला आहे.
19म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रांतील लोकांस माझे शिष्य करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या.
20आणि जे काही मी तुम्हास शिकविले आहे ते त्या लोकांस पाळायला शिकवा आणि पाहा, युगाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर आहे.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.