इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

मत्तय 21

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1येशू व त्याचे शिष्य यरूशलेम शहराजवळ आले असता ते जैतूनाचा डोंगराजवळ बेथफगे या जागी थांबले. नंतर येशूने त्याच्या दोन शिष्यांना पाठवले,
2त्यांना असे सांगितले की, “तुम्ही समोरच्या गावात जा आणि लागलीच एक गाढवी बांधलेली व तिच्याबरोबर एक शिंगरु असे तुम्हास आढळेल. त्यांना सोडून माझ्याकडे घेऊन या.
3जर कोणी तुम्हास काही विचारले, तर त्यास सांगा की, प्रभूला यांची गरज आहे, तो ती लगेच माझ्याकडे पाठवील.”
4हे यासाठी घडले की संदेष्ट्यांच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावेः ते असे की,
5“सियोनेच्या कन्येला सांगा, पाहा, तुझा राज लीन होऊन गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसून तुझ्याकडे येत आहे.”
6तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले.
7शिष्यांनी गाढवी व शिंगरु आणून त्यांनी त्यावर आपले अंगरखे घातले आणि येशू त्यावर बसला.
8पुष्कळ लोकांनी आपले अंगरखे वाटेवर अंथरले. दुसऱ्यांनी झाडांच्या फांद्या तोडल्या आणि त्या रस्त्यावर पसरल्या.
9येशूच्या पुढे चालणारा लोकसुदाय आणि मागे चालणारे. मोठ्याने जयघोष करू लागले, “दाविदाच्या पुत्राला होसान्ना. प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित आहे. परम उंचामध्ये होसान्ना!”
10जेव्हा येशूने यरूशलेम शहरामध्ये प्रवेश केला तेव्हा संपूर्ण शहर गजबजून निघाले व लोक विचारत होते, “हा कोण आहे?”
11जमावाने उत्तर दिले, “हा गालील प्रांतातील नासरेथ नगरातून आलेला, येशू संदेष्टा आहे.”
12मग येशूने देवाच्या भवनात प्रवेश केला. तेथे जे लोक विक्री व खरेदी करीत होते त्या सर्वांना बाहेर घालवून दिले. पैश्याचा व्यवहार करणाऱ्यांची मेजे आणि कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी उलथून टाकल्या.
13तो त्यांना म्हणाला, “असे लिहिले आहे, ‘माझ्या घरास प्रार्थनेचे घर म्हणतील,’ पण तुम्ही त्यास लुटारुंची गुहा केली आहे.”
14मग आंधळे आणि पांगळे लोक त्याच्याकडे परमेश्वराच्या भवनात आले आणि त्यांना त्याने बरे केले.
15परंतु जेव्हा मुख्य याजकांना व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी येशूने केलेल्या आश्चर्यकारक गोष्टी आणि परमेश्वराच्या भवनाच्या आवारात लहान मुलांना, “दाविदाच्या पुत्राला होसान्ना.” अशी घोषणा देताना पाहिले, तेव्हा त्यांना संताप आला.
16त्यांनी त्यास विचारले, “ही मुले काय म्हणत आहे हे तुम्ही ऐकता ना?” येशूने त्यांना उत्तर दिले, “होय. परंतु तू बालके व तान्हुली यांच्या मुखातून स्तुती पूर्ण करवली आहे. हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय?”
17नंतर येशू त्यास सोडून शहराबाहेर बेथानीस गेला. तो रात्रभर तेथे राहिला.
18दुसऱ्या दिवशी सकाळी तो शहराकडे पुन्हा येत असता त्यास भूक लागली.
19रस्त्याच्या कडेला त्यास अंजिराचे एक झाड दिसले. ते पाहून तो जवळ गेला. पण पानाशिवाय त्यास एकही अंजीर दिसले नाही. येशू त्या झाडाला म्हणाला, “यापुढे तुला, कधीही फळ न येवो!” आणि ते झाड लगेच वाळून गेले.
20शिष्यांनी हे पाहिले, तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, “हे अंजिराचे झाड इतक्या लवकर वाळून कसे गेले?”
21येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, जर तुम्हास विश्वास असेल आणि तुम्ही संशय धरला नाही तर मी जे अंजिराच्या झाडाबाबतीत केले तेच नव्हे, तर या डोंगराला उपटून समुद्रात पड असे म्हणालात तरी ते घडेल.
22जर तुमचा विश्वास असेल तर जे काही तुम्ही प्रार्थनेत विश्वासाने मागाल ते तुम्हास मिळेल.”
23येशू परमेश्वराच्या भवनात गेला, येशू तेथे शिक्षण देत असताना मुख्य याजक लोक व वडीलजन येशूकडे आले. ते येशूला म्हणाले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हास कोणी दिला?”
24येशू म्हणाला, “मीसुद्धा तुम्हास एक प्रश्न विचारतो. जर तुम्ही मला उत्तर दिले तर मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मी तुम्हास सांगेन.
25‘योहानाचा बाप्तिस्मा कोठून होता? स्वर्गाकडून की मनुष्यांकडून?’ ” येशूच्या या प्रश्नावर ते चर्चा करू लागले. ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा देवाकडून होता असे म्हणावे तर येशू म्हणेल, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’
26पण जर तो मनुष्यांकडून होता असे आपण म्हणालो आपल्याला लोकांची भीती आहे कारण योहान हा एक संदेष्टा होता असे ते सर्वजण मानतात.”
27म्हणून त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हास माहीत नाही.” तेव्हा येशू म्हणाला, “तर मग मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मीही तुम्हास सांगणार नाही.”
28याविषयी तुम्हास काय वाटते ते मला सांगा; “एका मनुष्यास दोन पुत्र होते. तो आपल्या पहिल्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, ‘माझ्या मुला, आज तू द्राक्षाच्या मळ्यात जा आणि काम कर.’
29मुलाने उत्तर दिले, ‘मी जाणार नाही.’ परंतु नंतर त्या मुलाने मन बदलले व तो गेला.
30नंतर वडील आपल्या दुसऱ्या मुलाकडे गेले आणि म्हटले, ‘माझ्या मुला, आज तू जाऊन माझ्या द्राक्षाच्या मळ्यात काम कर.’ त्या मुलाने उत्तर दिले, ‘होय बाबा, मी जातो.’ पण तो गेला नाही.
31त्या दोघांपैकी कोणत्या मुलाने वडीलांची आज्ञा पाळली?” ते म्हणाले, “पहिल्या मुलाने.” येशू त्यांना म्हणाला, “मी खरे सांगतो, जकातदार व वेश्या तुमच्या अगोदर स्वर्गाच्या राज्यात जातील.
32कारण योहान नीतिमत्त्वाच्या मार्गाने तुम्हाकडे आला, परंतु तुम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही, पण जकातदार व वेश्या यांनी त्यावर विश्वास ठेवला आणि हे तुम्ही पाहिले पण तरी देखील तुम्ही आपले मन बदलण्यास आणि त्यावर विश्वास ठेवण्यास तयार झाला नाही.”
33“हा दुसरा दाखला ऐकाः एक मनुष्य होता, त्याचे शेत होते. त्याने आपल्या शेतात द्राक्षे लावली. त्याभोवती कुंपण घातले आणि द्राक्षरसाकरिता कुंड तयार केले आणि माळा बांधला, मग त्याने आपला मळा काही शेतकऱ्यांना खंडाने करायला दिला, मग तो दुसऱ्यादेशी निघून गेला.
34जेव्हा द्राक्षे तोडणीचा हंगाम जवळ आला, तेव्हा त्या मनुष्याने आपला वाटा आणण्याकरिता काही चाकर शेतकऱ्याकडे पाठवले.
35परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. एकाला मार दिला तर दुसऱ्या चाकराला जिवे मारले. नंतर तिसऱ्याला दगडमार करून ठार केले.
36मग शेतकऱ्यांकडे त्या मनुष्याने आणखी एकदा चाकर पाठवले. पहिल्यापेक्षा त्याने जास्त चाकर पाठवले पण त्या शेतकऱ्यांनी त्यांना तशीच वागणूक दिली.
37नंतर, त्याने त्याच्या स्वतःच्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले, तो म्हणाला, ‘निश्चितच ते माझ्या मुलाचा मान राखतील.’
38पण जेव्हा शेतकऱ्यांनी त्याच्या मुलाला पाहिले तेव्हा ते एकमेकास म्हणू लागले, ‘हा तर मालकाचा मुलगा आहे. तो वारस आहे. चला आपण त्यास ठार करू व त्याचे वतन घेऊ.’
39त्यांनी त्यास धरले व द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकले व त्यास ठार मारले.
40मग द्राक्षमळ्याचा मालक परत येईल तेव्हा या शेतकऱ्यांचे काय करील?”
41यहूदी मुख्य याजक लोक आणि पुढारी म्हणाले, “तो त्या लोकांस खात्रीने मरणदंड देईल कारण ते दुष्ट होते. नंतर तो आपला द्राक्षमळा दुसऱ्यास खंडाने देईल. हंगामाच्या दिवसात जे त्याच्या पिकाची वाटणी देतील, अशांना तो ते देईल.”
42येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही शास्त्रलेखात कधी वाचले नाही काय? ‘बांधणाऱ्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला आहे. हे प्रभूने केले आणि आमच्या दृष्टीने हे अद्भूत आहे.’
43म्हणून मी तुम्हास सांगतो की, देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेण्यात येईल आणि जे राष्ट्र त्यातली फळे देईल त्यास ते दिले जाईल.
44जो कोणी या दगडावर पडेल, त्याचे तुकडे तुकडे होतील परंतु जर हा दगड कोणावर पडेल तर त्याचा भुगाभुगा होईल.”
45येशूने सांगितलेले दाखले मुख्य याजकांनी आणि परूश्यांनी ऐकले. येशू त्यांच्याविषयी बोलत आहे हे त्यांनी ओळखले.
46त्यांना येशूला अटक करायचे होते. पण त्यांना लोकांचे भय वाटत होते, कारण लोक येशूला संदेष्टा मानीत होते.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.