इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

मत्तय 19

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1येशूने या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर तो गालील प्रांतातून निघून गेला आणि यार्देन नदीच्या दुसऱ्या किनाऱ्याकडील यहूदीया प्रांतात गेला.
2तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्यामागे गेला आणि तेथील अनेक आजारी लोकांस येशूने बरे केले.
3काही परूशी येशूकडे आले. येशूने चुकीचे काही बोलावे असा प्रयत्न त्यांनी चालविला. त्यांनी येशूला विचारले, कोणत्याही कारणास्तव एखाद्या मनुष्याने आपल्या पत्नीला सूटपत्र द्यावे काय?
4येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असे लिहिलेले तुमच्या वाचनात निश्चितच आले असेल की, जेव्हा देवाने जग उत्पन्न केले, त्यांना नर व नारी असे निर्माण केले.
5आणि देव म्हणाला, ‘म्हणून पुरूष आपल्या आई-वडीलांना सोडून व आपल्या पत्नीला जडून राहील. ती दोघे एकदेह होतील.’
6म्हणून दोन व्यक्ती या दोन नाहीत तर एक आहेत. देवाने त्या दोघांना एकत्र जोडले आहे. म्हणून कोणाही व्यक्तीने त्यांना वेगळे करू नये.”
7परुश्यांनी विचारले, “असे जर आहे, तर मग पुरूषाने सूटपत्र लिहून देण्याची आणि आपल्या पत्नीला सोडून देण्याची मोकळीक देणारी आज्ञा मोशेने का दिली?”
8येशूने उत्तर दिले, “तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हास आपल्या स्त्रिया सोडून देण्याची मोकळीक दिली. पण सुरुवातीला सूटपत्र देण्याची मोकळीक नव्हती.
9मी तुम्हास सांगतो, जो मनुष्य आपली पत्नी सोडून देतो आणि दुसरीशी लग्न करतो तो व्यभिचार करतो. आपल्या पत्नीला सूटपत्र देण्याचे एकच कारण आहे, ते म्हणजे पहिल्या पत्नीने परपुरुषांशी व्यभिचार करणे होय.”
10मग त्याचे शिष्य त्यास म्हणाले, “जर पती व पत्नीमधील परिस्थिति अशी असेल तर मग लग्न न करणे जास्त योग्य ठरेल.”
11येशूने उत्तर दिले, “अशी शिकवण स्वीकारणे प्रत्येकाला शक्य होणार नाही. परंतु ज्यांना ही शिकवण स्वीकारण्याची मोकळीक दिली आहे तेच घेतील
12कारण आईच्या उदरातून जन्मताच नपुसंक असे आहेत व मनुष्यांनी केले असे नपुसंक आहेत आणि स्वर्गाच्या राज्यासाठी ज्यांनी आपणास नपुसंक करून घेतले आहेत. ज्याला हे स्वीकारता येते त्याने, स्वीकारावे.”
13नंतर येशूने आपल्या मुलांवर हात ठेवून प्रार्थना करावी यासाठी काही लोकांनी आपली मुले त्याच्याकडे आणली. येशूच्या शिष्यांनी त्यांना पाहिल्यावर ते बालकांना घेऊन येशूकडे येण्यास मना करू लागले.
14परंतु येशू म्हणाला, “लहान मुलांना मजकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.”
15मुलांवर हात ठेवल्यावर येशू तेथून निघून गेला.
16नंतर पाहा, कोणीएक मनुष्य येशूकडे आला आणि त्याने विचारले, “गुरूजी सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत?”
17येशूने उत्तर दिले, “काय चांगले आहे असे मला का विचारतोस? फक्त देव एकच चांगला आहे पण जर तुला सार्वकालिक जीवन पाहिजे तर सर्व आज्ञा पाळ.”
18त्याने विचारले, “कोणत्या आज्ञा?” येशूने उत्तर दिले, “खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको.
19आपल्या आई-वडीलांना मान दे आणि जशी स्वतःवर प्रीती करतोस तशी इतरावर प्रीती कर.”
20तो तरुण म्हणाला, “या सर्व आज्ञा मी पाळत आलो आहे. मी आणखी काय करावे?”
21येशूने उत्तर दिले, “तुला जर परिपूर्ण व्हायचे असेल तर जा आणि तुझे जे काही आहे ते विकून टाक आणि ते पैसे गरीबांना वाटून दे. म्हणजे स्वर्गात तुला मोठी संपत्ती मिळेल आणि चल, माझ्यामागे ये.”
22पण जेव्हा त्या तरूणाने हे ऐकले, तेव्हा त्यास फार दुःख झाले कारण तो खूप श्रीमंत होता, म्हणून तो येशूला सोडून निघून गेला.
23तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, धनवान मनुष्यास स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे फार कठीण जाईल.
24मी तुम्हास सांगतो की, धनवानाचा स्वर्गाच्या राज्यांत प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे जास्त सोपे आहे.”
25जेव्हा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार आश्चर्यचकित झाले. त्यांनी येशूला विचारले, “मग कोणाचे तारण होईल?”
26येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले आणि तो म्हणाला, “मनुष्यांना हे अशक्य आहे, पण देवासाठी सर्व गोष्टी शक्य आहेत.”
27पेत्र येशूला म्हणाला, “पाहा, आम्ही सर्वकाही सोडले आणि तुमच्यामागे आलो आहोत; मग आम्हास काय मिळेल?”
28येशू म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, नव्या युगात जेव्हा मनुष्याचा पुत्र त्याच्या गौरवी राजासनावर बसेल तेव्हा तुम्ही जे सर्व माझ्यामागे आलात ते सर्व बारा राजासनावर बसाल आणि इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय कराल.
29ज्याने ज्याने माझ्यामागे येण्याकरता आपले घर, भाऊ, बहीण, आईवडील, मुले, शेतीवाडी सोडली असेल तर त्यास त्यापेक्षा कितीतरी जास्तपटीने लाभ होईल व त्यास सार्वकालिक जीवन मिळेल.
30पण पुष्कळसे जे आता पहिले आहेत ते शेवटचे होतील आणि जे शेवटचे आहेत ते पहिले होतील.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.