इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

मत्तय 13

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1त्यादिवशी येशू घरातून निघून सरोवराच्या किनार्‍याशी जाऊन बसला
2तेव्हा लोकांचे समुदाय त्याच्याजवळ जमले; म्हणून तो मचव्यात जाऊन बसला व सर्व लोक किनार्‍यावर उभे राहिले.
3मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या तो म्हणाला “पाहा, पेरणारा पेरणी करावयास निघाला;
4आणि तो पेरणी करीत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले.
5काही खडकाळ जमिनीवर पडले, तेथे फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले;
6आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्यास मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले.
7काही काटेरी झाडांमध्ये पडले; मग काटेरी झाडानी वाढून त्याची वाढ खुंटवली.
8काही चांगल्या जमिनीत पडले; मग त्याचे कोठे शंभरपट, कोठे साठपट तर कोठे तीसपट, असे पीक आले.
9ज्याला कान आहेत तो ऐको.”
10मग शिष्य जवळ येऊन त्यास म्हणाले, आपण त्याच्याबरोबर दाखल्यानी का बोलता?
11त्याने त्यास उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची गुपीते जाणण्याचे दान तुम्हास दिले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही.
12कारण ज्या कोणाजवळ आहे त्यास दिले जाईल व त्यास भरपूर होईल; ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.
13यास्तव मी त्याच्याबरोबर दाखल्यांनी बोलतो; कारण ते पाहत असता पाहत नाहीत आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतही नाही.
14यशयाचा संदेश त्याच्याविषयी पूर्ण होत आहे, तो असा की, तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हास समजणारच नाही, व पाहाल तर खरे, परंतु तुम्हास दिसणारच नाही;
15कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे, ते कानानी मंद ऐकतात आणि त्यांनी डोळे मिटून घेतले आहेत; यासाठी की, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतःकरणाने समजून नये आणि वळू नये आणि मी त्यांना बरे करू नये.
16पण तुमचे डोळे धन्य आहेत, कारण ते पाहत आहे; आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत.
17मी तुम्हास खरे सांगतो की, तुम्ही जे पाहत आहात ते पाहावयास पुष्कळ संदेष्टे व नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही; आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकावयास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही.”
18आता तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या.
19वाटेवर पेरलेला तो हा आहे की, कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्यास समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो;
20खडकावरील पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो व ते लगेच आनंदाने स्वीकारतो;
21परंतु त्यास मूळ नसल्याकारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो.
22काटेरी झाडामध्ये पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो.
23चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकून ते समजतो; तो फळ देतोच देतो; कोणी शंभरपट, कोणी साठपट, तर कोणी तीसपट असे देतो.
24येशूने त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला मांडला. “कोणी एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे.
25लोक झोपेत असताना त्याचा शत्रू येऊन गव्हामध्ये निदण पेरून निघून गेला;
26पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निदण ही दिसले.
27तेव्हा घरधन्याच्या दासांनी येऊन त्यास म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना? तर मग त्यामध्ये निदण कोठून आले?
28तो त्यांना म्हणाला हे काम कोणा शत्रूचे आहे. दासांनी त्यास म्हटले, तर आम्ही जाऊन ते काढून टाकावे अशी आपली इच्छा आहे काय?
29तो म्हणाला, नाही. तुम्ही निदण गोळा करताना त्याच्याबरोबर कदाचित गहू ही उपटाल.
30कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या; मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन की, पहिल्याने निदण गोळा करा आणि जाळण्यासाठी त्याच्या पेढ्या बांधा; परंतु गहू मा‍झ्या कोठारात साठवा.”
31त्याने त्याच्यापुढे आणखी एक दाखला मांडला की, “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे; तो कोणाएका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला;
32तो तर सर्व दाण्यामध्ये लहान आहे; तरी वाढल्यावर भाजीपाल्यापेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की, आकाशातील पाखर त्याच्या फांद्यात वस्ती करतात.”
33त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की, “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे; ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पीठामध्ये लपवून ठेवले, तेणेकरून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.”
34या सर्व गोष्टी येशूने दाखल्यानी लोकसमुदायाला सांगितल्या आणि दाखल्यावाचून तो त्याच्याबरोबर काही बोलला नाही;
35यासाठी की, संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की, दाखले सांगायला मी आपले तोंड उघडीन; जगाच्या स्थापनेपासून गुप्त राहिलेल्या गोष्टी मी बोलून दाखवीन.
36नंतर तो लोकसमुदायास निरोप देऊन घरात गेला; तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, शेतातल्या निदणाच्या दाखल्याची आम्हास फोड करून सांगा.
37त्याने उत्तर दिले की, चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे.
38शेत हे जग आहे; चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत; निदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत;
39ते पेरणारा शत्रू हा सैतान आहे; कापणीही युगाची समाप्ती आहे; आणि कापणारे हे देवदूत आहेत;
40तेव्हा जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल.
41मनुष्याचा पुत्र आपल्या देवदूतांना पाठवील आणि त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व वस्तू व अन्याय करणार्‍यांना जमा करील,
42आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल.
43तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहेत तो ऐको.
44स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या धनासारखे आहे, ती कोणाएका मनुष्यास सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात त्याने जाऊन, आपले सर्वस्व विकले आणि ते शेत विकत घेतले.
45आणखी, स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणाऱ्या कोणाएका व्यापारासारखे आहे;
46त्यास एक अति मोलवान् मोती आढळला; मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला.
47आणखी, स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्वप्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे;
48ते भरलेल्या मनुष्यांनी ते किनार्‍याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले.
49तसे युगाच्या समाप्तीस होईल; देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील.
50आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल.
51तुम्हास या सर्व गोष्टी समजल्या काय? ते त्यास म्हणाले, हो.
52तेव्हा तो त्यांना म्हणाला, “प्रत्येक नियमशास्त्राचा शिक्षक जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नव्या जुन्या गोष्टी काढणार्‍या मनुष्यासारखा आहे.”
53नंतर असे झाले की, हे दाखले सांगण्याचे समाप्त केल्यावर येशू तेथून निघाला.
54आणि स्वतःच्या गावी आल्यावर त्याने त्याच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे ज्ञान व अद्भूत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य या मनुष्यास कोठून मिळते?
55हा सुताराचा पुत्र ना? याच्या आईला मरीया म्हणतात ना? याकोब, योसे, शिमोन व यहूदा, हे याचे भाऊ ना?
56याच्या बहि‍णी, त्या सर्व आपणाबरोबर नाहीत काय? मग ते सर्व याला कोठून?
57असे ते त्याच्याविषयी अडखळले. येशूने त्यास म्हटले, “संदेष्ट्याला आपला देश व आपले घर यामध्ये मात्र सन्मान मिळत नाही.”
58तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भूत कृत्ये केली नाहीत.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.