इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

लूक 3

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1आता तिबिर्य कैसराच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षी, जेव्हा पंतय पिलात यहूदीया प्रांताचा शासक होता आणि हेरोद चौथाई गालील प्रांताचा शासक असताना आणि त्याचा भाऊ फिलिप्प हा चौथाई इतुरीया व त्राखोनीती या देशांचा शासक व लूसनिय हा चौथाई अबिलेनेचा शासक होता.
2आणि हन्ना व कयफा हे मुख्य याजक लोक होते, तेव्हा अरण्यात देवाचे वचन जखऱ्याचा पुत्र योहान याच्याकडे आले.
3तो यार्देनेच्या सभोवतालच्या सर्व परिसरात पापांच्या क्षमेसाठी पश्चात्ताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करत फिरला.
4यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे हे झालेः “रानात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली ती अशी, ‘परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा सरळ करा.
5प्रत्येक दरी भरली जाईल, आणि प्रत्येक डोंगर व टेकडी सपाट केली जाईल, वांकडी सरळ होतील, आणि खडबडीत मार्ग सपाट केले जातील
6आणि सर्व मनुष्यप्राणी देवाचे तारण पाहतील.’ ”
7त्याच्याकडून बाप्तिस्मा करून घेण्यासाठी येणाऱ्या जमावाला योहान म्हणाला; “अहो, विषारी सापाच्या पिलांनो, येणाऱ्या क्रोधापासून सुटका करून घेण्यासाठी तुम्हास कोणी सावध केले?
8पश्चात्तापास योग्य अशी फळे द्या आणि आपल्या मनात असे म्हणू नका की, ‘अब्राहाम आमच्या पित्यासारखा आहे.’ कारण मी तुम्हास सांगतो की, अब्राहामासाठी या दगडापासून मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे.
9आताच झाडांच्या मुळांशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. म्हणून प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाईल.”
10नंतर जमावातील लोकांनी त्यास विचारले, “आता आम्ही काय करावे?”
11त्याने उत्तर दिले, “ज्याच्याकडे दोन अंगरखे असतील त्याने ज्याला नाही त्यास एक द्यावा आणि ज्याच्याकडे अन्न आहे त्यानेही तसेच करावे.”
12काही जकातदारही बाप्तिस्मा करून घ्यावयास आले होते. ते म्हणाले, “गुरुजी, आम्ही काय करावे?”
13तो त्यांना म्हणाला, तुम्हास जे नेमून दिले आहे त्यापेक्षा जास्त पैसे घेऊ नका.
14काही शिपायांनीसुद्धा त्यास विचारून म्हटले, “आणि आमच्या बद्दल काय, आम्ही काय करावे?” तो त्यांना म्हणाला, “कोणाकडून जबरदस्तीने पैसे घेऊ नका, कोणावरही खोटा आरोप करू नका, तुम्हास मिळणाऱ्या पगारात समाधानी राहा.”
15तेव्हा लोक उत्सुकतेने वाट पाहत असता प्रत्येकजण आपल्या अंतःकरणात हाच ख्रिस्त असेल काय म्हणून विचार करीत असत.
16त्या सर्वांना योहानाने उत्तर दिले, “मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण एकजण जो माझ्यापेक्षाही सामर्थ्यशाली आहे तो येत आहे आणि त्याच्या वहाणांचे बंद सोडण्यासही मी पात्र नाही, तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील.
17त्याचे खळे अगदी स्वच्छ करायला व गहू त्याच्या कोठारात साठवायला त्याचे सूप त्याच्या हातात आहे, पण तो भूस न विझणाऱ्या अग्नीत जाळून टाकील.”
18योहानाने इतर पुष्कळ उत्तेजन देणाऱ्या शब्दांनी त्यांना बोध करून सुवार्ता सांगितली.
19योहानाने चौथाईचा शासक हेरोद याची कानउघडणी केली कारण त्याचे त्याच्या भावाच्या पत्नी हेरोदीया हिच्याशी अनैतिक संबंध होते, तसेच इतर अनेक वाईट गोष्टी त्याने केल्या होत्या.
20हे सर्व करून सुद्धा त्याने आणखी एक दुष्कर्म केले ते म्हणजे त्याने योहानाला तुरुंगात टाकले.
21तेव्हा असे झाले की, जेव्हा सर्व लोकांचा बाप्तिस्मा योहानाद्वारे केला जात होता, तेव्हा येशूचा ही बाप्तिस्मा होऊन तो प्रार्थना करीत असता आकाश उघडले गेले.
22आणि पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली की, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, मी तुझ्याविषयी फार संतुष्ट आहे.”
23जेव्हा येशूने त्याच्या कार्यास सुरुवात केली तेव्हा तो सुमारे तीस वर्षांचा होता. लोक त्यास योसेफाचा मुलगा समजत. योसेफ एलीचा मुलगा होता
24एली मत्ताथाचा, मत्ताथ लेवीचा, लेवी मल्खीचा, मल्खी यन्रयाचा, यन्रया योसेफाचा मुलगा होता.
25योसेफ मत्तिथ्याचा मुलगा होता. मत्तिथ्य अमोसाचा, अमोस नहूमाचा, नहूम हेस्लीचा, हेस्ली नग्गयाचा,
26नग्गय महथाचा, महथ मत्तिथ्याचा, मत्तिथ्य शिमयीचा, शिमयी योसेखाचा, योसेख योदाचा मुलगा होता.
27योदा योहानानाचा मुलगा होता. योहानान रेशाचा, रेशा जरूब्बाबेलाचा, जरूब्बाबेल शल्तीएलाचा, शल्तीएल नेरीचा,
28नेरी मल्खीचा, मल्खी अद्दीचा, अद्दी कोसोमाचा, कोसोम एल्मदामाचा, एल्मदाम एराचा,
29एर येशूचा, येशू अलिएजराचा, अलिएजर योरीमाचा, योरीम मत्ताथाचा, मत्ताथ लेवीचा मुलगा होता.
30लेवी शिमोनाचा मुलगा होता. शिमोन यहूदाचा, यहूदा योसेफाचा, योसेफ योनामाचा, योनाम एल्याकीमाचा,
31एल्याकीम मल्लयाचा, मल्लया मिन्नाचा, मिन्ना मत्ताथाचा, मत्ताथ नाथानाचा, नाथान दाविदाचा,
32दावीद इशायाचा, इशाय ओबेदाचा, ओबेद बवाजाचा, बवाज सल्मोनाचा, सल्मोन नहशोनाचा मुलगा होता.
33नहशोन अम्मीनादाबाचा मुलगा होता. अम्मीनादाब अदामीनचा, अदामीन अर्णयाचा, अर्णय हेस्रोनाचा, हेस्रोन पेरेसाचा, पेरेस यहूदाचा,
34यहूदा याकोबाचा, याकोब इसहाकाचा, इसहाक अब्राहामाचा, अब्राहाम तेरहाचा, तेरह नाहोराचा,
35नाहोर सरुगाचा, सरुग रऊचा, रऊ पेलेगाचा, पेलेग एबराचा, एबर शेलहाचा मुलगा होता.
36शेलह केनानाचा मुलगा होता. केनान अर्पक्षदाचा, अर्पक्षद शेमाचा, शेम नोहाचा, नोहा लामेखाचा,
37लामेख मथुशलहाचा, मथुशलह हनोखाचा, हनोख यारेदाचा, यारेद महललेलाचा, महललेल केनानाचा,
38केनान अनोशाचा, अनोश शेथाचा, शेथ आदामाचा, आदाम देवाचा पुत्र होता.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.