इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

लूक 10

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1यानंतर प्रभूने आणखी सत्तर जणांस नेमून ज्या ज्या नगरांत व ज्या ज्याठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे असे त्यांना आपल्यापुढे पाठवले.
2तो त्यांना म्हणाला, “पीक फार आहे परंतु कामकरी थोडके आहेत, यास्तव पिकाच्या प्रभूने आपल्या पिकात कामकरी पाठवावे म्हणून तुम्ही त्याची प्रार्थना करा.”
3जा; पाहा, लांडग्यांच्या मध्ये जसे कोंकरांस पाठवावे तसे मी तुम्हास पाठवतो.
4पिशवी किंवा झोळी किंवा वहाणा घेऊ नका व वाटेने कोणाला सलाम करू नका.
5तुम्ही ज्या कोणत्याही घरात जाल तेथे पहिल्याने, या घराला शांती असो असे म्हणा.
6जर तेथे कोणी शांतिप्रिय मनुष्य असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील; पण तो नसला तर ती तुमच्याकडे परत येईल.
7तुम्ही त्याच घरात राहून ते देतील ते खातपीत जा; कारण कामकरी आपल्या मजुरीस योग्य आहे; घरोघरी फिरू नका.
8आणि तुम्ही ज्या कोणत्याही नगरांत जाल आणि ते तुम्हास स्वीकारतो, त्यामध्ये ते जे तुमच्यापुढे वाढतील ते खा,
9आणि त्यामध्ये जे दुखणाईत असतील त्यांना बरे करा व त्यांना सांगा की, देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे.
10परंतु तुम्ही ज्या कोणत्याही नगरांत जाल आणि ते तुमचे स्वागत नाही केले तर रस्त्यांवर बाहेर जाऊन असे म्हणा,
11तुमच्या नगराची धूळ आमच्या पायांला लागली ती देखील आम्ही तुमच्याविरुध्द झाडून टाकतो; तरी हे जाणा की देवाचे राज्य जवळ आले आहे.
12मी तुम्हास सांगतो की त्यादिवशी सदोमाला त्या नगरापेक्षा अधिक सोपे जाईल.
13“हे खोराजिना, तुला हाय! हे बेथसैदा, तुला हाय! कारण तुमच्यामध्ये जी सामर्थ्याची कृत्ये होत आहेत ती जर सोर व सिदोन यांच्यामध्ये झाली असती तर त्यांनी मागेच गोणताट अंगावर घेऊन व राखेत बसून पश्चात्ताप केला असता.
14यामुळे न्यायकाळी सोर व सिदोन यांना अधिक सोपे जाईल.
15हे कफर्णहूमा, तू आकाशापर्यंत उंचावला जाशील काय? तू नरकापर्यंत उतरशील.
16जो शिष्यांचे ऐकतो तो माझे ऐकतो आणि जो शिष्यांना नाकारतो तो मला नाकारतो आणि जो मला नाकारतो तो ज्याने मला पाठवले त्यास नाकारतो.”
17ते सत्तर लोक आनंदाने परतले आणि म्हणाले, “प्रभू, तुझ्या नावाने भूतेसुद्धा आम्हास वश होतात!”
18तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी सैतानाला आकाशातून विजेसारखे पडताना पाहिले!
19पाहा, मी तुम्हास साप आणि विंचू यांना तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिला आहे आणि कशानेच तुम्हास अपाय होणार नाही.
20तथापि तुम्हास दुष्ट आत्मे वश होतात याचा आनंद मानू नका तर तुमची नावे स्वर्गात लिहिली आहेत याचा आनंद माना.”
21त्या क्षणी तो पवित्र आत्म्यात आनंदीत झाला आणि म्हणाला, “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू मी तुझी स्तुती करतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुद्धीमान लोकांपासून लपवून ठेवून त्या लहान बालकांस प्रकट केल्या आहेस. होय, पित्या कारण तुला जे योग्य वाटले ते तू केलेस.
22माझ्या पित्याने सर्व गोष्टी माझ्यासाठी दिल्या होत्या आणि पुत्र कोण आहे हे पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही आणि पुत्राशिवाय कोणालाही पिता कोण आहे हे माहीत नाही व ज्या कोणाला ते प्रकट करण्याची पुत्राची इच्छा असेल त्यालाच फक्त माहीत आहे.”
23आणि शिष्यांकडे वळून तो एकांतात बोलला, “तुम्ही जे पाहता ते पाहणारे डोळे धन्य.
24मी तुम्हास सांगतो, अनेक राजांनी व संदेष्ट्यांनी तुम्ही जे पाहता ते पाहण्याची इच्छा बाळगली, परंतु त्यांनी ते पाहिले नाही आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकण्याची इच्छा बाळगली, परंतु त्यांनी ते ऐकले नाही.”
25नंतर एक नियमशास्त्राचा शिक्षक उभा राहिला आणि त्याने येशूची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला, तो म्हणाला, “गुरुजी, अनंतकाळचे जीवन मिळण्यासाठी मी काय केले पाहीजे?”
26तेव्हा येशू त्यास म्हणाला, “नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तू त्यामध्ये काय वाचतोस?”
27तो म्हणाला, “तू तुझा देव प्रभू याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण आत्म्याने, पूर्ण शक्तीने प्रीती कर.” व स्वतःवर जशी प्रीती करतोस तशी तू आपल्या शेजाऱ्यावरही प्रीती कर.
28तेव्हा येशू त्यास म्हणाला, “तू बरोबर उत्तर दिलेस, हेच कर म्हणजे तू जगशील.”
29पण आपण योग्य प्रश्न विचारला आहे हे इतरांना दाखवून देण्यासाठी त्याने येशूला विचारले, “मग माझा शेजारी कोण?”
30येशूने उत्तर दिले, “एक मनुष्य यरूशलेम शहराहून यरीहोस निघाला होता आणि तो लुटारुंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्यास मारले व त्यास अर्धमेला टाकून ते निघून गेले.
31तेव्हा त्याचवेळी एक याजक त्या रस्त्याने जात होता. याजकाने त्यास पाहिले, पण तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला.
32त्याच रस्त्याने एक लेवी त्याठिकाणी आला. लेव्याने त्यास पाहिले व तो सुद्धा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला.
33मग एक शोमरोनी त्याच रस्त्याने प्रवास करीत असता तो होता तेथे आला त्या मनुष्यास पाहून त्यास त्याचा कळवळा आला
34तो त्याच्याजवळ आला त्याच्या जखमांवर तेल व द्राक्षरस ओतून त्या बांधल्या आणि त्यास आपल्या गाढवावर बसवून त्यास उतारशाळेत आणले व त्याची देखभाल केली.
35दुसऱ्या दिवशी त्याने दोन चांदीचे नाणे काढले आणि उतारशाळेच्या मालकाला दिले व म्हणाला, ‘याची चांगली देखभाल कर म्हणजे यापेक्षा जे तू अधिक खर्च करशील ते मी परत आल्यावर तुला देईन.’
36लुटारुंच्या तावडीत जो मनुष्य सापडला होता, त्याचा त्या तिघांपैकी कोण खरा शेजारी होता असे तुला वाटते?”
37तो नियमशास्त्राचा शिक्षक म्हणाला, “ज्याने त्याच्यावर दया केली तो.” तेव्हा येशू त्यास म्हणाला, “जा आणि तूही तसेच कर.”
38मग येशू आणि त्याचे शिष्य त्याच्या मार्गाने जात असता, तो एका गावात आला. तेथे मार्था नावाच्या स्त्रीने त्याचे स्वागत करून आदरातिथ्य केले.
39तिला मरीया नावाची एक बहीण होती, ती प्रभूच्या पायाजवळ बसली व तो काय बोलतो हे ऐकत राहिली.
40पण मार्थेची अति कामामुळे तारांबळ झाली. ती येशूकडे आली आणि म्हणाली, “प्रभू, माझ्या बहिणीने सर्व काम माझ्यावर टाकले याची तुला काळजी नाही काय? तेव्हा मला मदत करायला तिला सांग.”
41प्रभूने उत्तर दिले, “मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी दगदग करतेस.
42पण एकच गोष्ट आवश्यक आहे. हे मी सांगतो आणि मरीयेने तिच्यासाठी चांगला वाटा निवडला आहे. तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.