इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

लेवीय 9

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1आठव्या दिवशी मोशेने अहरोन, त्याचे पुत्र तसेच इस्राएलांचे वडील ह्यांना बोलावले.
2तो अहरोनाला म्हणाला, “पापार्पणासाठी एक निर्दोष गोऱ्हा व होमार्पणासाठी निर्दोष मेंढा आण आणि त्यांना परमेश्वरास अर्पण कर.
3आणि इस्राएल लोकांस असे सांग, ‘तुम्ही पापार्पणासाठी एक बकरा आणा व होमार्पणासाठी एक गोऱ्हा व एक कोकरु आणा; ही दोन्ही प्रत्येकी एक वर्षाची व निर्दोष असावीत;
4आणि परमेश्वरासमोर शांत्यर्पणे करण्यासाठी बली म्हणून एक बैल, एक मेंढा व तेलात मळलेले अन्नार्पण आणा कारण आज परमेश्वर तुम्हास दर्शन देणार आहे.”
5मग मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्व लोक आले व त्यांनी ते सर्व दर्शनमंडपाच्या दारापाशी आणले मग सर्वजण येऊन परमेश्वरासमोर उभे राहिले.
6तेव्हा मोशे म्हणाला, “परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही सर्वकाही करावे; मग परमेश्वराचे गौरव तुम्हास दिसेल.”
7मग मोशेने अहरोनाला सांगितले, “जा व परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्वकाही कर; वेदीजवळ जाऊन आपला पापबली व होमबली ह्यांचे अर्पण कर आणि स्वत:साठी व लोकांसाठी प्रायश्चित कर आणि लोकांकडील बलीही अर्पण करून त्यांच्यासाठी प्रायश्चित कर.”
8तेव्हा अहरोन वेदीजळ गेला व त्याने स्वत:साठी पापार्पणाचा गोऱ्हा वधला.
9मग अहरोनाचे पुत्र रक्त घेऊन त्याच्यापाशी गेले. तेव्हा त्याने आपले बोट त्यामध्ये बुडवून ते वेदीच्या शिंगांना लावले मग ते वेदीच्या पायथ्याशी ओतले.
10त्याने पापार्पणाची चरबी, गुरदे व काळजावरील चरबीचा पडदा घेऊन त्यांचा वेदीवर परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणेच होम केला.
11मग अहरोनाने मांस व कातडे छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकले.
12नंतर त्याने होमबली वधला व त्याचे तुकडे केले; अहरोनाच्या मुलांनी त्या होमबलीचे रक्त अहरोनाकडे आणले तेव्हा त्याने ते वेदीवर व सभोवती शिंपडले.
13नंतर अहरोनाच्या मुलांनी होमबलीचे तुकडे व त्याचे डोके अहरोनाकडे दिले आणि त्याने त्यांचा वेदीवर होम केला.
14त्याने त्याची आतडी व पाय धुवून त्यांचाही वेदीवर होम केला.
15मग त्याने लोकांचे अर्पण जवळ नेले व त्यांच्यासाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधला आणि पहिल्याप्रमाणेच तोसुध्दा पापार्पण म्हणून अर्पिला.
16त्याने होमबलीही जवळ नेऊन परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे तो अर्पिला.
17मग त्याने अन्नार्पण वेदीजवळ नेले व त्यातले मूठभर घेऊन दररोज सकाळच्या होमार्पणासह तेही अर्पण केले.
18लोकांसाठी शांत्यर्पणे म्हणून आणलेला बैल व मेंढा हे त्याने वधले आणि त्याच्या मुलांनी त्या बलींचे व मेंढ्याचे रक्त अहरोनाकडे आणले तेव्हा त्याने ते वेदीवर व सभोवती शिंपडले.
19अहरोनाच्या मुलांनी बैलाची व मेंढ्याची चरबी, चरबीदार शेपूट, आंतड्यावरील चरबी, गुरदे आणि काळजावरील चरबीचा पडदा ही सर्व अहरोनाकडे आणली.
20त्यांनी ती सर्व चरबी त्या बलींच्या ऊराच्या भागावर ठेवली; मग अहरोनाने त्या सर्वाचा वेदीवर होम केला.
21अहरोनाने बलींचे ऊर व उजवी मांडी ही मोशेच्या सांगण्याप्रमाणे परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळली.
22मग अहरोनाने लोकांकडे वळून, हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला आणि ज्या वेदीवर त्याने पापार्पण, होमार्पण, व शांत्यर्पणे केली होती तेथून तो खाली आला.
23मोशे व अहरोन दर्शनमंडपामध्ये गेले आणि बाहेर आल्यावर त्यांनी लोकांस आशीर्वाद दिला; तेव्हा परमेश्वराचे तेज सर्व लोकांस दिसले;
24तेव्हा परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी भस्म केली; हे पाहून सर्व लोकांनी जयजयकार केला व दंडवत घातले.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.