इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

लेवीय 23

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1परमेश्वर मोशेला म्हणाला,
2“इस्राएल लोकांस असे सांग. परमेश्वराने नेमलेल सण, पवित्र मेळे भरवण्यासाठी म्हणून तुम्ही जाहीर करावे; ते माझे नेमलेले पवित्रसण आहेत.
3सहा दिवस कामकाज करावे, परंतु सातवा दिवस, विसाव्याचा शब्बाथ दिवस व पवित्र मेळ्याचा दिवस होय; या दिवशी तुम्ही कसलेही काम करु नये; तुमच्या सर्व घराघरात हा परमेश्वराचा शब्बाथ असावा.
4परमेश्वराने ठरविलेले सणाचे दिवस तुम्ही पवित्र मेळ्याचे दिवस म्हणून जाहीर करावे; ते हे,
5पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळपासून परमेश्वराचा वल्हांडण सण आहे.
6त्याच निसान महिन्याच्या पंधराव्या दिवशी परमेश्वराचा बेखमीर भाकरीच्या सणाचा दिवस येतो. तेव्हा तुम्ही सात दिवस बेखमीर (खमीर न घातलेली भाकर खावी).
7सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; त्यादिवशी तुम्ही कसलेही काम करु नये.
8सात दिवस तुम्ही परमेश्वराकरिता अग्नीत हव्य अर्पावे आणि सातव्या दिवशी आणखी दुसरा पवित्र मेळा भरवावा; त्यादिवशी काही काम करु नये.”
9परमेश्वर मोशेला म्हणाला,
10“इस्राएल लोकांस सांग: मी तुम्हास देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोचाल व हंगामाच्या वेळी कापणी कराल त्यावेळी पिकाच्या पहिल्या उपजातील पेंढी तुम्ही याजकाकडे आणावी;
11याजकाने ती पेंढी शब्बाथाच्या दुसऱ्या दिवशी परमेश्वरासमोर ओवाळावी म्हणजे ती तुमच्यासाठी मान्य होईल. शब्बाथाच्या पुढच्या दिवशी ती याजकाने ओवाळावी.
12पेंढी ओवाळाल त्यादिवशी निर्दोष अशा एक वर्षाच्या मेंढ्याचे होमार्पण परमेश्वरासाठी करावे;
13तुम्ही त्याचबरोबर तेलात मळलेल्या दोन दशमांश सपिठा अन्नार्पण अर्पावे. हे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय; आणि त्या बरोबरचे पेयार्पण म्हणून एकचतुर्थांश हीन द्राक्षरस अर्पावा.
14तुम्ही आपल्या देवाला हे सर्व अर्पण आणाल, त्या दिवसापर्यंत नव्या पिकाची भाकर, किंवा हुरडा किंवा हिरव्या धान्याची भाकर खाऊ नये; तुम्ही जेथे कोठे रहाल तेथे तुमच्याकरिता हा नियम पिढ्यानपिढ्या कायमचा चालू राहील.
15तुम्ही शब्बाथ दिवसाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ओवाळणीची पेंढी आणाल, त्या दिवसापासून सात शब्बाथ दिवस मोजावे;
16सातव्या शब्बाथ दिवसानंतर दुसऱ्या दिवशी येणाऱ्या पन्नासाव्या दिवशी तुम्ही परमेश्वराकरिता नवे अन्नार्पण आणावे.
17त्यादिवशी तुम्ही आपल्या घरातून दोन दशांश एफाभर मैद्याच्या, खमीर घालून भाजलेल्या दोन भाकरी ओवाळण्यासाठी आणाव्या; परमेश्वराकरिता हे पहिल्या उपजाचे अर्पण होय.
18एक गोऱ्हा, दोन मेंढे व प्रत्येकी एक वर्षाची सात नर कोकरे ही सर्व निर्दोष अशी घेऊन त्यांचा परमेश्वरासमोर अन्नार्पण आणि पेयार्पणासोबत परमेश्वरासाठी हव्य म्हणून होम करावा. त्या सुवासिक अर्पणामुळे परमेश्वरास संतोष होईल.
19आणि पापार्पणासाठी एक बकरा व शांत्यर्पणासाठी प्रत्येकी एक वर्षाची दोन नर कोंकरे अर्पावित.
20याजकाने ती अर्पणे प्रथम उपजाच्या भाकरीबरोबर त्या मेंढ्यांसह परमेश्वरासमोर ओवाळावी; ती परमेश्वराकरिता पवित्र आहेत; ती याजकाच्या वाट्याची व्हावी.
21त्याच दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; तुम्ही कोणतेही काम करु नये; तुमच्या प्रत्येक घरासाठी हा तुम्हास पिढ्यानपिढ्या निरंतरचा नियम होय.
22तसेच तुम्ही आपल्या जमिनीतील पिकाची कापणी कराल तेव्हा तुमच्या शेताच्या कोनाकोपऱ्यातील साऱ्या पिकाची कापणी करु नका आणि सरवा वेचू नका; गरीब व तुमच्या देशातून प्रवास करणाऱ्या उपरी लोकांसाठी तो राहू द्या, मी तुमचा देव परमेश्वर आहे!”
23आणखी परमेश्वर मोशेला म्हणाला,
24“इस्राएल लोकांस सांग: सातव्या महिन्याचा पहिला दिवस हा विसाव्याचा पवित्र दिवस असावा; त्यादिवशी पवित्र मेळा भरवावा व पवित्र स्मरणासाठी तुम्ही कर्णे फुंकावी;
25तुम्ही कोणतेही काम करु नये; तर तुम्ही परमेश्वरास अर्पण अर्पावे.”
26परमेश्वर मोशेला म्हणाला,
27“सातव्या महिन्याचा दहावा दिवस हा प्रायश्चिताचा दिवस म्हणून पाळावा; त्यादिवशी पवित्र मेळा भरवावा; काही न खाता आपल्या जिवांस दंडन करून नम्र व्हावे व परमेश्वरास अर्पण अर्पावे.
28त्यादिवशी तुम्ही कसलेही कामकाज करु नये कारण तो प्रायश्चिताचा दिवस आहे; त्यादिवशी तुमचा देव परमेश्वर याच्यामोर तुमच्यासाठी प्रायश्चित करण्यात येईल.
29त्यादिवशी जो मनुष्य काही न खाता आपल्या जिवास ताडन करून आपणाला नम्र करणार नाही त्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.
30त्यादिवशी कोणाही मनुष्याने जर कसलेही काम केले तर मी देव त्यास त्याच्या लोकातून नाहीसा करीन.
31तुम्ही अजिबात कसलेही काम करु नये; तुम्ही जेथे कोठे राहत असाल तेथे तुमच्या सर्व घराघरात तुम्हास हा पिढ्यानपिढ्या कायमचा नियम होय.
32तो दिवस तुम्हास पवित्र विसाव्याचा शब्बाथ दिवस व्हावा; त्यादिवशी तुम्ही काही न खाता आपल्या जिवास ताडन करावे व नम्र व्हावे; त्या महिन्याच्या नवव्या दिवसाच्या संध्याकाळापासून सुरवात करून दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत तुम्ही हा विसाव्याचा दिवस पाळावा.”
33परमेश्वर मोशेला पुन्हा म्हणाला,
34“इस्राएल लोकांस सांग: सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसपर्यंत परमेश्वराकरिता मंडपाचा सण पाळावा;
35पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; त्यादिवशी कसलेही काम करु नये.
36सात दिवस परमेश्वरास अर्पण अर्पावे; आठव्या दिवशी दुसरा पवित्र मेळा भरवावा व त्या दिवशीही परमेश्वरास अर्पण अर्पावे; त्यादिवशी तुम्ही कसलेही काम करु नये.
37परमेश्वराने हे सण नेमलेले आहेत: त्यादिवशी पवित्र मेळे भरवावेत; त्यामध्ये योग्य वेळी हव्य म्हणजे होमार्पण, अन्नार्पण, शांत्यर्पण व पेयार्पण परमेश्वरास अर्पावे.
38परमेश्वराच्या नेहमीच्या शब्बाथ पालना शिवाय अधिक म्हणून हे सणाचे दिवस तुम्ही साजरे करावेत; तुमची सणाची अर्पणे ही तुमची नवस फेडीची अर्पणे, तुम्ही परमेश्वरास अर्पावयाच्या भेटी व इतर अर्पणे, ह्यांच्यात भर घालणारी अर्पणे असावीत.
39जमिनीचा उपज गोळा केल्यावर त्याच सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसापर्यंत परमेश्वराकरिता सण पाळावा; त्यातील पहिला दिवस व आठवा दिवस हे विसाव्याचे दिवस म्हणून पाळावे.
40पहिल्या दिवशी तुम्ही झाडांची चांगली फळे, खजुरीच्या झावळ्या दाट पालवीच्या झाडांच्या डहाळ्या आणि ओहळालगतचे वाळूंज ही घेऊन तुमचा देव परमेश्वर यासमोर सात दिवस उत्सव करावा.
41प्रत्येक वर्षी सात दिवस परमेश्वराकरिता हा सण पाळावा; तुमचा हा पिढ्यानपिढ्या कायमचा नियम होय; सातव्या महिन्यात हा सण पाळावा.
42तुम्ही सात दिवस तात्पुरत्या उभारलेल्या मांडवात रहावे; जन्मापासून जे इस्राएल आहेत त्या सर्वानी मांडवात रहावे,
43म्हणजे तुमच्या पुढील पिढ्यांना कळेल की, मी इस्राएल लोकांस मिसर देशातून बाहेर आणले तेव्हा त्यांना तात्पुरत्या उभारलेल्या मांडवात रहावयास लावले. मी परमेश्वर तुमचा देव आहे!”
44तेव्हा ह्याप्रमाणे परमेश्वराने नेमिलेले सण मोशेने इस्राएल लोकांस कळवले.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.