इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

लेवीय 11

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला:
2इस्राएल लोकांस असे सांगा की पृथ्वीवरील ज्या प्राण्यांचे मांस तुम्ही खावे ते हे:
3ज्या प्राण्यांचे खूर दुभंगलेले आहेत व जे रवंथ करतात त्यांचे मांस तुम्ही खावे.
4काही प्राणी रवंथ करतात परंतु त्यांचे खूर दुभंगलेले नाहीत, म्हणून ते तुम्ही अशूद्ध समजावे, जसे उंट, हा रवंथ करतो पंरतू त्याचा खुर विभागलेला नाही, म्हणून तो तुम्ही अशुद्ध समजावा.
5शाफान हा रंवथ करतो परंतु त्याचा खुर विभागलेला नाही म्हणून तुम्ही तो अशुद्ध समजावा.
6ससा हा रंवथ करतो परंतु त्याचा खुर विभागलेला नाही म्हणून तुम्ही तो सुध्दा अशुद्ध समजावा.
7डुकराचे खूर दुभंगलेले आहे पण तो रवंथ करत नाही म्हणून तो तुम्हाकरिता अशुद्ध आहे.
8या प्राण्यांचे मांस तुम्ही खाऊ नये व त्यांच्या शवांना शिवू नये; ते तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.
9“जलाशयात, समुद्रात व नद्यात संचार करणाऱ्या ज्या प्राण्यांना पंख व खवले आहेत ते तुम्ही खावे.
10जलचरापैकी समुद्रात व नद्यात संचार करणाऱ्या ज्या प्राण्यांना पंख आणि खवले नाहीत असे प्राणी तुम्ही खाऊ नये; परमेश्वराच्या दृष्टीने ते अयोग्य आहेत.
11ते तुम्ही अयोग्य समजावे; त्यांचे मांस खाऊ नये; त्यांच्या शवांना देखील शिवू नये.
12जलाशयातल्या ज्या प्राण्यांना पंख व खवले नाहीत ते देवाच्या दृष्टीने खाण्यास योग्य नाहीत ते ओंगळ समजावे.”
13देवाच्या दृष्टीने अशुद्ध प्राण्याप्रमाणेच अशुद्ध असलेले म्हणून खाऊ नयेत ते पक्षी असे; गरुड, गीध, कुरर,
14घार, निरनिराळ्या जातीचे ससाणे,
15निरनिराळ्या जातीचे कावळे,
16शहामृग, गवळण, कोकीळ, निरनिराळ्या जातीचे बहिरी ससाणे,
17पिंगळा, करढोक, मोठे घुबड,
18पांढरे घुबड, पाणकोळी, गिधड,
19करकोचा, निरनिराळ्या जातीचे बगळे, टिटवी आणि वटवाघूळ.
20जितके पंख असलेले कीटक प्राणी चार पायावर चालतात तितके परमेश्वराच्या दृष्टीने खाण्यास योग्य नाहीत; ते खाऊ नये!
21परंतु पायावर चालणाऱ्या व पंख असलेल्या प्राण्यांपैकी ज्यांना जमिनीवर उड्या मारण्यासाठी पायाबरोबर तंगड्या असतात ते तुम्ही खावे.
22त्याचप्रमाणे निरनिरळ्या जातीचे टोळ, निरनिरळ्या जातीचे नाकतोडे, निरनिरळ्या जातीचे खरपुडे व निरनिरळ्या जातीचे गवत्ये टोळ तुम्ही खावू शकता.
23परंतु चार पायाचे पंख असलेले इतर प्राणी परमेश्वराच्या दृष्टीने ओंगळ आहेत ते खाऊ नये.
24त्यांच्यामुळे तुम्ही अशुद्ध व्हाल; जो कोणी त्यांच्या शवांना स्पर्श करेल तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध होईल;
25जो कोणी मरण पावलेल्या कीटकांना उचलील, त्याने आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
26ज्या प्राण्याचे खूर दुभागलेले आहेत पण ते दोन अगदी सारखे भाग करीत नाहीत व जे रवंथ करीत नाहीत ते तुम्ही अशुद्ध समजावेत;
27चार पायावर चालणाऱ्या सर्व पशूपैकी जे आपल्या पंजावर चालतात ते सर्व तुम्ही अशुद्ध समजावे; त्याचा शवांना जो कोणी स्पर्श करेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
28जो कोणी त्यांची शवे उचलील त्याने आपली वस्त्रे धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे; ते प्राणी तुम्ही अशुद्ध समजावे.
29जमिनीवर रांगणाऱ्या प्राण्यांपैकी तुम्ही अशुद्ध समजावे ते हे: मुंगूस, उंदीर, निरनिराळ्या जातीचे सरडे,
30चोपई, घोरपड, पाल, सांडा व गुहिऱ्या सरडा.
31हे प्राणी तुम्हाकरिता अशुद्ध समजावे. त्यांच्या शवांना जो कोणी स्पर्श करेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
32त्यांच्यापैकी कोणी मरून एखाद्या वस्तूवर पडला तर ती वस्तूही अशुद्ध समजावी; लाकडी पात्र, वस्त्र कातडे, तरट किंवा कोणत्याही कामाचे हत्यार असो, ते पाण्यात टाकावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे; मग ते धुतल्यावर शुद्ध समजावे.
33त्यांच्यापैकी एखादा मरुन मातीच्या पात्रात पडला तर त्या पात्रात जे काही असेल ते अशुद्ध समजावे व ते पात्र फोडून टाकावे.
34अशुद्ध भांड्याचे पाणी अन्नावर पडल्यास ते अन्नही अशुद्ध समजावे व अशा भांड्यातील कोणतेही पेय असेल तर तेही अशुद्ध समजावे.
35त्यांच्या शवांचा एखादा भाग एखाद्या भट्टीवर किंवा चुलीवर पडला तर ती अशुद्ध समजून, तिचे तुकडे तुकडे करून ती मोडून तोडून टाकावी, ती पुन्हा शुद्ध होणार नाही; म्हणून तुम्ही ती अशुद्ध समजावी.
36झरा किंवा विहीर, ज्यांच्यात सतत पाणी असते ते शुद्धच राहतात; परंतु त्याच्यातील शवांना जो स्पर्श करेल तो अशुद्ध होईल.
37त्या प्राण्याच्या शवाचा काही भाग पेरण्याच्या बियाणावर पडला तरी ते बियाणे शुद्ध समजावे;
38परंतु जर बियाणे पाण्याने भिजल्यावर त्या प्राण्याच्या शवाचा काही भाग त्यावर पडला तर ते तुम्ही अशुद्ध समजावे.
39खाण्यास योग्य अशा प्राण्यांपैकी एखादा मेला आणि त्याच्या शवास कोणी स्पर्श केला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
40कोणी त्याच्या शवाचा काही भाग खाल्ला तर त्याने आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे; जो त्याचे शव उचलील त्यानेही आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
41“जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी अशुद्ध आहेत; परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे ते खाऊ नयेत.
42जमिनीवर जे आपल्या पोटावर सरपटतात, किंवा चार पायावर चालतात, किंवा ज्यांना फार पाय आहेत असे सरपटणारे प्राणी तुम्ही खाऊ नयेत, कारण ते ओंगळ आहेत.
43कोणत्याही जातीच्या रांगणाऱ्या प्राण्यामुळे तुम्ही स्वत:ला अशुद्ध करून घेऊ नका, किंवा त्यांच्यामुळे स्वत:ला अशुद्ध करून विटाळवू नका!
44कारण मी परमेश्वर, तुमचा देव आहे! मी पवित्र आहे! म्हणून तुम्हीही आपणांस पवित्र असे ठेवावे! म्हणून जमिनीवर रांगणाऱ्या कोणत्याही जातीच्या प्राण्यामुळे तुम्ही आपणास विटाळवू नका!
45मी परमेश्वर, ज्याने तुम्हास मिसर देशातून यासाठी बाहेर आणले की तुम्ही माझे पवित्र लोक व्हावे व मी तुमचा देव असावे; मी पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र असावे!”
46प्राणी, पक्षी, सर्व जलचर व जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी ह्याच्याविषयी हे नियम आहेत.
47या नियमावरून शुद्ध प्राणी व अशुद्ध प्राणी, तसेच खाण्यास योग्य असे प्राणी व जे खाऊ नयेत असे प्राणी ह्याच्यातील भेद तुम्हास समजावा.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.