इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

लेवीय 1

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1परमेश्वराने दर्शनमंडपातून मोशेला हाक मारली आणि त्यास म्हटले,
2इस्राएली लोकांस असे सांग की, जेव्हा तुम्ही परमेश्वरास पशूबली अर्पण करता तेव्हा त्यांनी तो गुराढोरांपैकी किंवा शेरडामेढरांपैकी अर्पावा.
3जेव्हा एखाद्या मनुष्यास गुरांढोरातले होमार्पण अर्पावयाचे असेल तेव्हा त्याने दोषहीन नर अर्पावा; तो त्याने दर्शनमंडपाच्या दारापाशी आणून अर्पावा म्हणजे परमेश्वरासमोर तो मान्य होईल.
4त्या मनुष्याने यज्ञपशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा म्हणजे तो पशू त्याच्याबद्दल प्रायश्चित्त म्हणून मान्य होईल.
5त्यानंतर त्याने परमेश्वरासमोर तो गोऱ्हा वधावा. दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर अर्पण करून अहरोनाचे पुत्र, जे याजक, त्यांनी त्याचे रक्त सादर करावे आणि दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वारासमोरील वेदीवर सभोवती शिंपडावे.
6याजकाने त्या यज्ञपशूचे कातडे काढावे व त्याचे तुकडे करावे.
7नंतर अहरोन याजकाच्या मुलांनी वेदीवर विस्तव ठेवावा व नंतर त्याच्यावर लाकडे रचावी;
8अहरोनाचे मुले जे याजक होते, त्यांनी वेदीवरच्या विस्तवावरील लाकडावर त्याचे तुकडे, डोके, व चरबी रचावी;
9त्याचे पाय व आतडी ही पाण्याने धुवावी, मग याजकाने त्या सर्वांचा वेदीवर होम करून तो अर्पावा, हे होमार्पण आहे; हे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय हे अग्नीद्वारे केलेले अर्पण होय.
10जर कोणाला शेरडाचे किंवा मेंढराचे होमार्पण करावयाचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा.
11त्याने वेदीच्या उत्तरेस परमेश्वरासमोर तो वधावा; मग अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीवर व वेदीच्या सभोवती शिंपाडावे.
12मग याजकाने त्या पशूचे कापून तुकडे करावेत व त्याने ते तुकडे, डोके, व चरबी वेदीवरील विस्तवाच्या लाकडावर रचावी,
13त्याचे पाय व आतडी पाण्याने धुवावी; मग याजकाने त्या सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे होमार्पण परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय.
14जर कोणाला परमेश्वरासाठी पक्षाचे होमार्पण करावयाचे असेल तेव्हा त्याने त्याचे अर्पण होले किंवा पारव्याची पिल्ले अर्पावी.
15याजकाने तो पक्षी वेदीजवळ आणावा, त्याचे मुंडके मुरगळून उपटून काढावे व वेदीवर त्याचा होम करावा आणि त्याचे रक्त वेदीच्या बाजूवर निचरून टाकावे.
16त्याने त्याचा चुनाळ व पिसे काढून वेदीच्या पूर्वेस वेदीवरील राख टाकण्याच्या जागी फेकून द्यावी.
17त्याने तो पक्षी पंखाच्या मधोमध फाडावा, परंतू त्याचे दोन वेगळे भाग करू नयेत; मग याजकाने त्या पक्षाचा वेदीवरील जळत्या लाकडावर होम करावा; हे पण होमार्पण आहे. हे परमेश्वरासाठी केलेले सुवासिक हव्य होय हे अग्नीद्वारे केलेले होमार्पण होय.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.