इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

यहोशवा 5

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1इस्राएल लोक यार्देनेपलीकडे जाईपर्यंत परमेश्वराने तिचे पाणी त्यांच्यासाठी कसे आटविले हे यार्देनेपलीकडील अमोऱ्यांच्या सर्व राजांनी व समुद्रकिनाऱ्याच्या सर्व कनानी राजांनी ऐकले, तेव्हा इस्राएल लोकांच्या भीतीने त्यांच्या काळजाचे पाणी-पाणी झाले आणि ते गलितगात्र झाले.
2त्या वेळी परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “गारगोटीच्या सुऱ्या करून इस्राएल लोकांची पुन्हा एकदा सुंता कर.”
3त्याप्रमाणे यहोशवाने गारगोटीच्या सुऱ्या बनवून इस्राएल लोकांची सुंता अरालोथ हे नाव दिलेल्या टेकडीजवळ केली.
4यहोशवाने त्यांची सुंता केली याचे कारण हे की, युद्धास लायक असे मिसर देशातून निघालेले सगळे पुरुष मिसर देशातून निघाल्यानंतर वाटेने रानात मरण पावले होते.
5मिसर देशातून निघालेल्या सर्व पुरुषांची सुंता झाली होती, पण मिसर देशातून बाहेर निघाल्यानंतर रानात वाटेने जे जन्मले त्यांची सुंता झाली नव्हती;
6कारण इस्राएल लोक रानात चाळीस वर्षे प्रवास करीत होते; मिसर देशातून निघालेल्या सर्व राष्ट्राने म्हणजे युद्धास लायक अशा पुरुषांनी परमेश्वराची वाणी न ऐकल्यामुळे, त्या काळात त्यांचा नाश झाला होता; परमेश्वराने त्यांना शपथ देऊन सांगितले होते की, ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहतात असा जो देश मी तुमच्या पूर्वजांना तुमच्यासाठी शपथेवर देऊ केला होता, तो देश मी तुमच्या नजरेस पडू देणार नाही.
7त्यांच्या जागी त्यांची जी मुले देवाने वाढविली होती त्यांची यहोशवाने सुंता केली, कारण वाटेने त्यांची सुंता झाली नव्हती; ते बेसुनत राहिले होते.
8सर्व राष्ट्राची सुंता करणे संपल्यावर ते बरे होईपर्यंत छावणीत आपापल्या ठिकाणी राहिले.
9मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, मिसरी लोक तुमची निंदा करीत असत ती आज मी आपल्याद्वारे दूर लोटली आहे, म्हणून आजही त्या जागेला गिलगाल म्हणतात.
10इस्राएल लोकांनी गिलगालात तळ दिल्यावर यरीहोजवळच्या मैदानात त्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी वल्हांडण सण पाळला.
11वल्हांडणाच्या दुसऱ्या दिवशी त्या देशात पिकलेल्या धान्याच्या बेखमीर भाकरी आणि हुरडा हा त्यांनी खाल्ला.
12त्यांनी देशांतले उत्पन्न खाल्ले त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मान्ना बंद झाला; तो पुन्हा इस्राएल लोकांस मिळाला नाही, त्या वर्षी त्यांनी कनान देशातले उत्पन्न खाल्ले.
13यहोशवाने यरीहोजवळ असताना समोर पहिले तो कोणी पुरुष आपल्या हाती उपसलेली तलवार घेऊन पुढे उभा आहे असे त्याच्या नजरेस पडले. यहोशवाने जवळ जाऊन विचारले, तू आमच्या पक्षाचा की आमच्या वैऱ्यांच्या पक्षाचा?
14तो म्हणाला, “दोहोंपैकी कोणतेही नाही; कारण मी परमेश्वराच्या सेनेचा सेनापती आहे.” तेव्हा यहोशवाने त्यास नमन करण्यासाठी आपले मुख भूमीकडे करून म्हटले, “माझ्या स्वामीची आपल्या सेवकाला काय आज्ञा आहे?”
15परमेश्वराचा सेनापती यहोशवाला म्हणाला, “आपल्या पायातले जोडे काढ; कारण ज्या जागी तू उभा आहेस ती पवित्र आहे.” तेव्हा यहोशवाने तसे केले.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.