इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

यहोशवा 13

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1आता यहोशवा म्हातारा आणि चांगल्या उतारवयाचा झाला होता. तेव्हा परमेश्वर त्याच्याशी म्हणाला, “तू म्हातारा झाला आहेस आणि तुझे वय पुष्कळ झाले आहे, परंतु अजून पुष्कळ देश काबीज करून घ्यावयाचा राहिला आहे.”
2हा देश अजून बाकी राहिला आहे: पलिष्ट्यांचा सर्व प्रांत, आणि सर्व गशूरी प्रांत;
3मिसराच्या पूर्वेस जी शीहोर नदी तिजपासून उत्तरेस जे एक्रोन त्याच्या सीमेपर्यंत ही जो देश, तो कनान्यांचा मानलेला आहे; गज्जी व अश्दोदी, अष्कलोन, गथी व एक्रोनी व अव्वी यांचे पलिष्टी पाच सुभेदार आहेत.
4दक्षिणेस कनान्यांचा सर्व देश, आणि सीदोन्याचे मारा, अफेक व अमोऱ्यांच्या सीमेपर्यंतचा देश;
5आणि गिबली यांचा देश, व सूर्याच्या उगवतीस सर्व लबानोन, हर्मोन डोंगराखालच्या बाल-गादापासून हमाथात जायच्या ठिकाणापर्यंत तो देश घ्यायचा आहे;
6लबानोनापासून मिस्रफोथ माइमापर्यंत डोंगराचे सर्व राहणारे, सर्व सीदोनी, यांस मी इस्राएलाच्या संतानापुढून वतनातून बाहेर घालवीन; त्यांचा देश इस्राएलाचे वतन होण्यास मी तुला आज्ञा दिल्याप्रमाणे चिठ्ठ्या टाकून वाटून दे.
7तर आता नऊ वंश व अर्धा मनश्शेचा वंश यांस वतन होण्यासाठी या देशाच्या वाटण्या कर.
8मनश्शेच्या बाकीच्या अर्ध्या वंशाला व रऊबेनी व गादी यांना आपल्या वतनाचा वाटा मिळाला आहे; परमेश्वराचा सेवक मोशे याने त्यांना यार्देनेच्या पलीकडे पूर्वेस जे दिले ते त्यांचे आहे.
9आर्णोन नदीच्या काठावरले अरोएर म्हणजे त्या खोऱ्याच्या मध्यभागी ते नगर, तेथून दीबोनापर्यंत मेदब्याची सर्व पठारे ही;
10आणि अमोऱ्यांचा राजा सीहोन ज्याने हेशबोनात राज्य केले त्याची, अम्मोनी संतानांच्या सीमेपर्यंत सर्व नगरे;
11गिलाद आणि गशूरी व माकाथी यांची सीमा, आणि अवघा हर्मोन डोंगर व सलेखापर्यंत सर्व बाशान;
12म्हणजे रेफाईतला जो एकटाच शेष राहिलेला अष्टारोथ व एद्रई येथे राज्य करणारा बाशानाचा ओग याचे सारे राज्य, येथल्या सर्वांचा मोशेने मारून वतनातून बाहेर घालवले.
13तथापि इस्राएलाच्या संतानानी गशूरी व माखाथी यांना वतनातून बाहेर घालवले नाही, तरी आजपर्यंत गशूरी व माकाथी इस्राएलामध्ये राहत आहेत.
14लेवीच्या वंशाला मात्र त्याने वतन दिले नाही; “इस्राएलाचा देव परमेश्वराने त्यास सांगितल्याप्रमाणे अग्नीतून केलेली अर्पणे,” तेच त्यांचे वतन आहे;
15परंतु रऊबेनाच्या संतानांच्या वंशाला त्याच्या कुळाप्रमाणे मोशेने दिले.
16आणि त्याची प्राप्त झालेली सीमा ही होती, आर्णोन नदीच्या काठावर जे अरोएर, म्हणजे त्या खोऱ्याच्या मध्यभागी जे नगर, तेथून मेदबाजवळचा सर्व पठारी प्रदेश;
17हेशबोन आणि पठारावरील जी सर्व नगरे; दीबोन व बामोथ-बआल व बेथ-बालमोन;
18आणि याहस व कदेमोथ, मेफाथ;
19आणि किर्याथाईम व सिब्मा व खोऱ्याच्या डोंगरावरचे सरेथ शहर;
20बेथ-पौर व पिसगाच्या उतरणी व बेथ-यशिमोथ;
21आणि पठारातली सर्व नगरे; म्हणजे अमोऱ्याचा राजा सीहोन त्याचे सर्व राज्य त्यामध्ये होते; त्याने हेशबोनात राज्य केले; त्यास मोशेने मारले, आणि देशात राहणारे सिहोनाचे मुख्य म्हणजे मिद्यानावरले अधिपती अवी रेकेम व सूर व हूर रेबा यांसहीत मारले.
22आणि त्यांच्या मारलेल्यामध्ये तो ज्योतिषी बौराचा पुत्र बलाम, याला इस्राएलाच्या संतानानी तलवारीने जीवे मारले.
23तर रुऊबेनाच्या संतांनांची सीमा यार्देन नदीचा तीर अशी झाली; रऊबेनाच्या संतानांच्या कुळाप्रमाणे त्यांचे हेच वतन, ती नगरे व त्यांच्या खालची गावे.
24गादाच्या वंशालाही त्यांच्या कुळाप्रमाणे मोशेने वतन दिले.
25आणि त्यांची सीमा याजेर व गिलादातली सर्व नगरे व अम्मोन्यांच्या संतानांचा अर्धा देश, राब्बा यांच्यापुढे जे अरोएर तेथपर्यंत झाली.
26आणि हेशबोनापासून रामाथ मिस्पापर्यंतचा प्रदेश, आणि बतोनीम व महनाईमापासून दबीरच्या सीमेपर्यंत;
27आणि खोऱ्यातले बेथ-हाराम व बेथ-निम्रा व सुक्कोथ व साफोन, म्हणजे हेशबोनाचा राजा सीहोन याच्या राज्याचा शेष भाग, यार्देन व तिच्यातीरींचा किन्नेरोथ समुद्राच्या काठापर्यंत, असे योर्देनेच्या पलीकडे पूर्वेस झाले.
28गादाच्या संतानांच्या, कुळाप्रमाणे त्याचे वतन हेच, ती नगरे व त्यांच्या खालचे गांव.
29आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशाला मोशेने वतन दिले; तर मनश्शेच्या अर्ध्या संतानांच्या वंशाला त्यांच्या कुळाप्रमाणे असे झाले;
30की त्यांची सीमा महनाईमापासून सर्व बाशान, म्हणजे बाशानाचा राजा ओग याचे अवघे राज्य, बाशानातली याईराची जी अवघी गावे साठ नगरे त्यांसुद्धा;
31आणि अर्धा गिलाद, आणि बाशानात ओगाच्या राज्यातली नगरे अष्टारोथ व एद्रई यांसुद्धाही; असे मनश्शेचा पुत्र माखीर यांच्या संतानांना, म्हणजे माखीराच्या अर्ध्या संतानांना त्यांच्या कुळाप्रमाणे प्राप्त झाले.
32यरीहोजवळ यार्देन नदीच्या पलीकडे पूर्वेस मवाबाच्या मैदानात मोशेने जी वतने दिली ती हीच.
33लेवीच्या वंशाला मोशेने वतन दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर याने जसे त्यास सांगितले, तसा तोच त्यांचे वतन आहे.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.