इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

यहोशवा 1

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या मरणानंतर असे झाले की, नूनाचा पुत्र यहोशवा, मोशेचा मुख्य मदतनीस याच्याशी परमेश्वर बोलला,
2“माझा सेवक मोशे मरण पावला आहे, तर आता ऊठ, तू आणि हे सर्व लोक असे तुम्ही यार्देन, ओलांडून जो देश मी इस्राएल लोकांस, देत आहे त्यामध्ये जा.
3मी मोशेला सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल, ते प्रत्येक ठिकाण मी तुम्हाला दिले आहे.
4रान व हा लबानोन यापासून महानद, फरात नदीपर्यंतचा हित्ती यांचा सर्व देश, व मावळतीकडे भूमध्य सागराचा प्रदेश तुमचा होईल.
5तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही, जसा मोशेबरोबर मी होतो तसाच तुझ्याबरोबरही मी असेन, मी तुला सोडून जाणार नाही. व तुला टाकणार नाही.
6बलवान हो, धैर्य धर, कारण जो देश ह्या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू यांना वतन म्हणून मिळवून देशील.
7मात्र तू बलवान हो व धैर्य धर, आणि माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ, ते सोडून उजवीडावीकडे वळू नको, म्हणजे तू जाशील तिकडे यशस्वी होशील.
8नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून निघून जाऊ नये म्हणून रात्रंदिवस त्याचे मनन कर, त्या जे काही लिहिले आहे ते सर्व तू पाळ. मग तुझी भरभराट होईल आणि तू यशस्वी होशील.
9मी तुला आज्ञा केली नाही का? बलवान हो, धीट हो, घाबरू नकोस, धैर्यहीन होऊ नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.”
10मग यहोशवाने लोकांच्या पुढाऱ्यांना अशी आज्ञा केली की,
11“छावणीतून फिरून लोकांस अशी आज्ञा द्या की, स्वतःसाठी अन्नसामग्री तयार करा. कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला ताब्यात देणार आहे त्याचा ताबा घेण्यासाठी तीन दिवसाच्या आत तुम्हाला ही यार्देन ओलांडायची आहे.”
12मग यहोशवाने रऊबेनी, गादी व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना म्हटले,
13“परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने तुम्हाला जी आज्ञा दिली होती तिची आठवण करा, तो तुम्हाला म्हणाला होता की, तुम्हाला विसावा मिळावा म्हणून तुमचा देव परमेश्वर हा देश तुम्हाला देत आहे.
14या यार्देनेच्या पूर्वेकडील जो देश मोशेने तुम्हाला दिला आहे त्यामध्येच तुमच्या स्त्रिया, पुत्र-मुलेबाळे आणि गुरेढोरे ह्यांनी रहावे, पण तुम्ही सर्व योद्ध्यांनी सशस्त्र होऊन आपल्या बांधवांपुढे नदीपलीकडे जावे आणि त्यांना मदत करावी.
15परमेश्वर तुमच्याप्रमाणेच तुमच्या बांधवांना विसावा देईल आणि तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांना दिलेल्या देशाचा ते ही ताबा घेतील, मग परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने यार्देनेच्या पूर्वेस, उगवतीकडे जो देश तुम्हाला दिला आहे, त्या तुमच्या वतनाच्या देशात परत येऊन त्याचा ताबा तुम्ही घ्यावा.”
16तेव्हा त्यांनी यहोशवाला उत्तर दिले, “जे काही करण्याची तू आम्हांला आज्ञा केली आहेस ते सर्व आम्ही करू आणि तू आम्हांला पाठवशील तिकडे आम्ही जाऊ.
17जसे आम्ही सर्व बाबतींत मोशेचे सांगणे ऐकत होतो तसेच आम्ही तुझेही ऐकू, मात्र तुझा देव परमेश्वर मोशेबरोबर होता तसाच तुझ्याबरोबर असो.
18जो कोणी तुझ्या आज्ञेविरूद्ध बंड करेल व तुझे शब्द पाळणार नाही त्यास देहान्त शिक्षा द्यावी. तू मात्र खंबीर हो व धैर्य धर.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.