इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

ईयोब 9

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1मग ईयोब उत्तर देऊन म्हणाला,
2“तू जे काही म्हणत आहेस ते खरे असल्याची जाणीव मला आहे, परंतु देवापुढे मनुष्य कसा बरोबर ठरेल?
3मनुष्य देवाशी वाद घालू शकत नाही. देव हजार प्रश्न विचारु शकतो आणि मनुष्यास त्याच्या एकाही प्रश्नाचे उत्तर देता येत नाही.
4देव खूप विद्वान आहे आणि त्याची शक्ती अमर्याद आहे. देवाचे मन कठीण करून कोण निभावेल?
5तो क्रोधित झाला की पर्वत हलवतो आणि लोकांस ते कळत देखील नाही.
6तो पृथ्वीचा थरकाप करण्यासाठी भूकंप पाठवतो. आणि पृथ्वीचा पायाच हलवून टाकतो.
7तोच तो देव आहे, जो सूर्याला उगवू नये म्हणून सांगतो आणि तो उगवत नाही, आणि ताऱ्यांनी चमकू नये म्हणून तो लपवून ठेवतो.
8त्याने एकट्याने आकाश निर्माण केले. तो सागराच्या लाटांवर चालतो.
9देवाने सप्तर्षि, मृगश्रीष व कृत्तिका यांना निर्माण केले. दक्षिणेकडचे आकाश ओलांडणारे ग्रहही त्यानेच निर्माण केले.
10तोच देव आहे ज्याने आश्यर्यकारक अनाकलनीय गोष्टीही निर्मिल्या. खरोखरच देवाच्या अद्भुत कृत्यांची सीमा नाही.
11पाहा, देव जेव्हा माझ्या जवळून जातो तेव्हा मी त्यास बघू शकत नाही. तो जातो तरी त्याची महानता मला समजत नाही.
12देवाने जरी काही घेतले तरी त्यास कोणीही अडवू शकत नाही. तू काय करीत आहेस? असे त्यास कोणी विचारु शकत नाही.
13देव त्याचा क्रोध काबूत ठेवणार नाही. राहाबाचे मदतनीससुध्दा त्यास घाबरतात.
14म्हणून मी देवाशी वाद घालू शकत नाही. त्याच्याशी काय बोलावे ते मला सुचणार नाही.
15मी निष्पाप आहे, पण मी त्यास उत्तर देऊ शकणार नाही. मी केवळ माझ्या देवाची कृपादृष्टी मिळावी म्हणून याचना करु शकतो.
16मी हाक मारल्यानंतर त्याने उत्तर दिले असते. तरी त्याने माझे ऐकलेच अशी माझी खात्री झाली नसती.
17तो मला चिरडण्यासाठी वादळे पाठवील. आणि काहीही कारण नसता तो मला जखमा देईल.
18तो मला माझा श्वास परत घेऊ देणार नाही. म्हणून तो मला अधिक कष्ट देईल.
19कोण शक्तीमान आहे जर आपण बोलतो तर देव सर्वशक्तिमान आहे, आणि जर आपण न्याया विषयी बोलतो, तर त्यास न्यायालयात कोणी आणू शकेल काय?
20मी धर्मी जरी असलो, माझेच मुख मला अपराधी बनवते. मी परिपूर्ण जरी असलो, तरी पण माझे बोलणेच माझी अपूर्णता प्रमाणीत करते.
21मी निष्पाप आहे, पण काय विचार करावा ते मला कळत नाही. मी माझ्याच आयुष्याचा धिक्कार करतो.
22मी स्वत:शीच म्हणतो: सगळ्याच्याच बाबतीत हे घडते. पापी लोकांसारखेच निष्पाप लोकही मरतात. देवच सगळ्यांचे जीवन संपवतो.
23काहीतरी भयानक घडते आणि निष्पाप मनुष्य मरतो तेव्हा देव त्यास फक्त हसतो का?
24जेव्हा एखादा वाईट मनुष्य सत्ता बळकावतो तेव्हा जे घडते आहे ते बघण्यापासून देव पुढाऱ्यांना दूर ठेवतो जर नाही, तर तो कोण आहे जो असे करतो?
25माझे दिवस एखाद्या धावपटू पेक्षाही वेगाने धावतात. माझे दिवस उडून जातात, त्यामध्ये कुठेही सुख दिसत नाही.
26लव्हाळाची बनवलेली बोट जशी वेगात जाते तसे माझे दिवस वेगात सरतात. गरुडाने आपल्या भक्ष्यावर झडप घालावी त्याप्रमाणे माझे दिवस अतिशय वेगात जातात.
27मी जरी म्हणालो, की माझे दु:ख विसरेन, मी चेहऱ्यावर हास्य आणेन, मी तक्रार करणार नाही. आणि आनंदी होईल.
28मला माझा दु:खाचे भय वाटायला हवे. कारण मला माहित आहे, निर्दोष गनणार नाहीस.
29मी आधीच अपराधी ठरवला गेलो आहे. मग प्रयत्न तरी कशाला करायचे?
30मी माझे अंग बर्फाने धुतले आणि हात साबणाने स्वच्छ केले.
31तरीही देव मला घाणीच्या खड्ड्यात ढकलेल. नंतर माझे स्वत:चे कपडे देखील माझा तिरस्कार करतील.
32देव माझ्यासारखा मनुष्य नाही. म्हणूनच मी त्यास उत्तर देऊ शकत नाही. आम्ही न्यायालयात एकमेकांना भेटू शकणार नाही.
33आमच्यात कोणी असा न्यायाधीश नाही. जो आम्हा दोघांना सारख्याच न्यायाने तोलेल.
34देवाच्या शिक्षेची छडी माझ्यापासून दूर करणारा कोणी न्यायाधीश नाही त्याच्या धाकामुळे मला भयभीत होण्यापासून वाचवणारा कोणी नाही.
35असे जर झाले तर देवाला न घाबरता मला जे काही म्हणायचे आहे ते मी म्हणू शकेन. परंतु आता मात्र मी तसे करु शकत नाही.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.