इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

ईयोब 6

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1नंतर ईयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला,
2“अहो, जर तुम्ही फक्त माझ्या यातना तोलल्या, जर माझ्या शोकाला तराजूत मोजले.
3तर ते आता समुद्रातल्या वाळूपेक्षा जड आहे. यामुळेच काय माझे शब्द व्यर्थ आहे.
4त्या सर्वशक्तिमानाचे बाण माझ्यात आहेत. माझ्या प्राण विषाला पिऊन घेत आहे, देवाने स्वतः त्याची दहशत माझ्या विरुध्द सज्ज केली आहे
5वनातील गाढवाला गवत मिळाल्यावर ते ओरडते काय? किंवा गव्हाणीत चारा असता बैल भुकेने हबंरतो काय?
6ज्याला चव नाही असे मिठाशिवाय खातात काय? किंवा अंड्यातल्या पांढऱ्या भागाला काही चव असते काय?
7ज्याला मी स्पर्श करण्यास नाकारले, ते माझ्यासाठी तिरस्करणीय अन्न झाले.
8अहो, माझ्या विनंती प्रमाणे मला मिळाले आणि माझी आशा देव पूर्ण करील तर किती बरे! ज्या गोष्टी हव्यात त्या देवाने मला दिल्या असत्या.
9जर देवाच्या ईच्छेत आले तर त्याने मला चिरडून टाकावे, त्याने आपला हात मजवरून काढून घ्यावा आणि या जीवनातून मला मुक्त करावे.
10तशाने माझ्या दुःखाचा परीहार होईल, जरी मी त्रासात असतो तरी मी दुःखात आनंद करीन, कारण जो पवित्र आहे त्याचे शब्द मी कधीही नाकारले नाही.
11माझी काय शक्ती आहे की मी वाट पाहण्याचा प्रयत्न करू? माझा अंत काय, कि मी स्वतःला आवरून धरू?
12माझी शक्ती पाषाणासारखी आहे काय? किंवा माझे शरीर पितळेचे बनलेले आहे काय?
13माझ्यापासुन मला कोणतेही साहाय्य होत नाही हे सत्य नाही काय, आणि ज्ञान माझ्यापासून हिरावून घेण्यात आले नाही काय?
14कमजोर व्यक्तीवर संकट आले, त्याने सर्वशक्तिमान देवाचे भय धरणे सोडून दिले, तरी सुद्धा त्याच्या मित्राने विश्वासूपण दाखवावा.
15बंधूनो, तुम्ही माझ्यासाठी वाळवंटी प्रदेशासमान व कधी न वाहणाऱ्या ओढ्याप्रमाणे आहात.
16त्याच्यावर बर्फ असल्या कारणाने ते गढूळ झाले आणि जे बर्फामध्ये स्वतःला लपवितात असे तुम्ही आहात.
17जेव्हा ते बाहेर फेकले जातात ते नष्ट होतात, जेव्हा उष्णता वाढते ते जागेवरच वितळून जातात.
18त्यांचा गट त्यांच्या मार्गाने प्रवास करीत असता ते पाण्यासाठी बाजूला वळतात ते सुकलेल्या प्रदेशात भटकतात आणि नंतर नाश पावतात.
19तेमाच्या गटाने तेथे तपास केला. शबाच्या काफिल्याने आशेने त्याचा शोध घेतला.
20त्याची अपेक्षाभंग झाली कारण त्यांना पाणी सापडण्याची खात्री होती, ते तेथे गेले परंतु ते तेथे फसले.
21आता तुम्ही मित्र माझ्यासाठी काहीच नाही, तुम्ही माझी भयानक परिस्थिती पाहीली आणि घाबरून गेला आहात.
22मला काही द्या असे मी म्हणालो का? किंवा आपल्या संपत्तीतून मला काही बक्षीस द्या?
23किंवा ‘माझ्याविरोधकाच्या हातून माझे रक्षण करा? किंवा, क्रूर लोकांपासून खंडणी देऊन वाचवा!’ असे मी तुम्हास म्हटले का?
24आता तुम्ही मला समज द्या आणि मी शांत होईन. माझी काय चूक झाली ते मला दाखवा.
25प्रामाणिक शब्द किती दु:ख देणारे असतात! परंतु तुमचे वादविवाद, मला कसे धमकावतील?
26तुम्ही माझे शब्द नाकारण्याची योजना केली आहे का? निराश करणाऱ्या मनुष्याचे शब्द वाऱ्यासारखे आहेत का?
27खरोखर, पोरक्या मुलांवर जुगार खेळता, आणि तुम्ही व्यापाऱ्यासारखे मित्रांबरोबर घासाघीस करता.
28पण आता माझ्याकडे लक्षपूर्वक पाहा. खात्रीने मी तुमच्या तोंडासमोर खोटे बोलणार नाही.
29मी तुम्हास विनंती करतो तुम्ही आता कडक धोरण सोडून द्या तुमच्याबरोबर अन्याय होणार नाही. खरोखर, कडक धोरण सोडून द्या, कारण माझे ध्येय नितीचे आहे.
30माझा जीभेवर काही वाईट आहे काय? माझ्या तोंडाला अर्धमाचा फरक समजत नाही काय?”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.