इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

ईयोब 38

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1नंतर परमेश्वर वावटळीतून ईयोबाशी बोलला आणि तो म्हणाला,
2कोण आहे जो माझ्या योजनांवर अंधार पाडतो, म्हणजे ज्ञानाविना असलेले शब्द?
3आता तू पुरूषासारखी आपली कंबर बांध, मी तुला प्रश्न विचारील, आणि तू मला उत्तर दे.
4मी पृथ्वी निर्माण केली तेव्हा तू कुठे होतास? तू स्वत:ला इतका शहाणा समजत असशील तर मला उत्तर दे.
5जग इतके मोठे असावे हे कोणी ठरवले ते सांग? मोजण्याच्या दोरीने ते कोणी मोजले का?
6तीचा पाया कशावर घातला आहे? तिची कोनशिला कोणी ठेवली?
7जेव्हा ते घडले तेव्हा पहाटेच्या ताऱ्यांनी गायन केले आणि देवपुत्रांनी आनंदाने जयजयकार केला.
8जेव्हा समुद्र पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडला तेव्हा दरवाजे बंद करून त्यास कोणी अडवला?
9त्यावेळी मी त्यास मेघांनी झाकले आणि काळोखात गुंडाळले.
10मी समुद्राला मर्यादा घातल्या आणि त्यास कुलुपांनी बंद केलेल्या दरवाजाबाहेर थोपविले.
11मी म्हणालो, तू इथपर्यंतच येऊ शकतोस या पलिकडे मात्र नाही. तुझ्या उन्मत्त लाटा इथेच थांबतील.
12तुझ्या आयुष्यात तू कधीतरी पहाटेला आरंभ करायला आणि दिवसास सुरु व्हायला सांगितलेस का?
13तू कधीतरी पहाटेच्या प्रकाशाला पृथ्वीला पकडून दुष्ट लोकांस त्यांच्या लपायच्या जागेतून हुसकायला सांगितलेस का?
14पहाटेच्या प्रकाशात डोंगरदऱ्या नीट दिसतात. दिवसाच्या प्रकाशात या जगाचा आकार अंगरख्याला असलेल्या घडीप्रमाणे ठळक दिसतात
15दुष्टांपासून त्यांचा प्रकाश काढून घेतला आहे आणि त्यांचा उंच भूज मोडला आहे.
16सागराला जिथे सुरुवात होते तिथे अगदी खोल जागेत तू कधी गेला आहेस का? समुद्राच्या तळात तू कधी चालला आहेस का?
17मृत्युलोकात नेणारे दरवाजे तू कधी पाहिलेस का? काळोख्या जगात नेणारे दरवाजे तू कधी बघितलेस का?
18ही पृथ्वी किती मोठी आहे ते तुला कधी समजले का? तुला जर हे सर्व माहीत असेल तर मला सांग.
19प्रकाश कुठून येतो? काळोख कुठून येतो?
20तू प्रकाशाला आणि काळोखाला ते जिथून आले तेथे परत नेऊ शकशील का? तिथे कसे जायचे ते तुला माहीत आहे का?
21तुला या सर्व गोष्टी नक्कीच माहीत असतील तू खूप वृध्द आणि विद्वान आहेस मी तेव्हा या गोष्टी निर्माण केल्या तेव्हा तू जिवंत होतास होय ना?
22मी ज्या भांडारात हिम आणि गारा ठेवतो तिथे तू कधी गेला आहेस का?
23मी बर्फ आणि गारांचा साठा संकटकाळासाठी, युध्द आणि लढाईच्या दिवसांसाठी करून ठेवतो.
24सूर्य उगवतो त्याठिकाणी तू कधी गेला आहेस का? पूर्वेकडचा वारा जिथून सर्व जगभर वाहातो तिथे तू कधी गेला आहेस का?
25जोरदार पावसासाठी आकाशात पाट कोणी खोदले? गरजणाऱ्या वादळासाठी कोणी मार्ग मोकळा केला?
26वैराण वाळवंटात देखील कोण पाऊस पाडतो?
27निर्जन प्रदेशात पावसाचे खूप पाणी पडते आणि गवत उगवायला सुरुवात होते.
28पावसास वडील आहेत का? दवबिंदू कुठून येतात?
29हिम कोणाच्या गर्भशयातून निघाले आहे? आकाशातून पडणाऱ्या हिमकणास कोण जन्म देतो?
30पाणी दगडासारखे गोठते. सागराचा पृष्ठभागदेखील गोठून जातो.
31तू कृत्तिकांना बांधून ठेवू शकशील का? तुला मृगशीर्षाचे बंध सोडता येतील का?
32तुला राशीचक्र योग्यवेळी आकाशात आणता येईल का? किंवा तुला सप्तऋर्षो त्यांच्या समूहासह मार्ग दाखवता येईल का?
33तुला आकाशातील नियम माहीत आहेत का? तुला त्याच नियमांचा पृथ्वीवर उपयोग करता येईल का?
34तुला मेघावर ओरडून त्यांना तुझ्यावर वर्षाव करायला भाग पाडता येईल का?
35तुला विद्युतलतेला आज्ञा करता येईल का? ती तुझ्याकडे येऊन. आम्ही आलो आहोत काय आज्ञा आहे? असे म्हणेल का? तुझ्या सांगण्याप्रमाणे ती हवे तिथे जाईल का?
36लोकांस शहाणे कोण बनवतो? त्यांच्यात अगदी खोल शहाणपण कोण आणतो?
37ढग मोजण्याइतका विद्वान कोण आहे? त्यांना पाऊस पाडायला कोण सांगतो?
38त्यामुळे धुळीचा चिखल होतो आणि धुळीचे लोट एकमेकास चिकटतात.
39तू सिंहासाठी अन्न शोधून आणतोस का? त्यांच्या भुकेल्या पिल्लांना तू अन्न देतोस का?
40ते सिंह त्यांच्या गुहेत झोपतात. ते गवतावर दबा धरुन बसतात आणि भक्ष्यावर तुटून पडतात.
41कावळ्याला कोण अन्न देतो? जेव्हा त्याची पिल्ले देवाकडे याचना करतात आणि अन्नासाठी चारी दिशा भटकतात तेव्हा त्यांना कोण अन्न पुरवतो?
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.