इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

ईयोब 21

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1नंतर ईयोबाने उत्तर दिले.
2“मी काय म्हणतो ते निट ऐक म्हणजे माझे सांत्वन होईल.
3मी बोलेन तेव्हा तू थोडा धीर धर, माझे बोलणे संपल्यावर तू माझी थट्टा करु शकतोस.
4माझी लोकांविरुध्द तक्रार काय आहे? मी अधीर का होऊ नये?
5माझ्याकडे बघ व आश्चर्यचकित हो, व तुझे हात तू आपल्या तोंडावर ठेव.
6माझ्यावर आलेल्या त्रांसाचा विचार करायला लागलो म्हणजे मला भीती वाटते आणि माझ्या शरीराचा थरकाप होतो.
7दुष्ट मनुष्यांना जास्त आयुष्य का असते? ते वृध्द आणि यशस्वी का होतात?
8आणि त्याचे वंशज त्याच्या डोळ्यासमोर स्थापीत होतात, आणि त्याच्या डोळ्यासमोर त्याची मुलेबाळे नांदतात.
9त्यांची घरे भितीपासून सुरक्षित असतात, देवाची काठी त्याच्यांवर पडत नाही.
10त्यांच्या बैलाचे प्रजोत्पादन असफल होत नाही. त्यांच्या गायींना वासरे होतात आणि त्यांची वासरे अकाली मृत्युमुखी पडत नाहीत.
11ते आपल्या मुलांना वासराप्रमाणे बाहेर खेळायला पाठवतात. त्यांची मुले सभोवती नाचत असतात.
12ते डफ आणि वीणेच्या आवाजावर गातात आणि ते पावांचा नाद ऐकुण आनंदी होतात.
13ते त्यांचे दिवस भरभराटीत घालवतात, नंतर ते शांतपणे खाली अधोलोकात जातात.
14ते देवाला म्हणाले, आम्हास एकटे सोड आम्हास तुझ्या ज्ञानाच्या मार्गाची इच्छा नाही.
15सर्वशक्तिमान कोण आहे, की त्याची उपासना आम्ही करावी? त्याची प्रार्थना करून आम्हास काय लाभ?
16पाहा, त्याची भरभराट त्याच्या स्वतःच्या हाती नाही? दुष्ट मनुष्याचा सल्ला माझ्यापासुन दूर असो.
17वांरवार दुष्टाचा दिप विझवला जातो, त्याची विपत्ती त्यांच्यावर येते? आणि असे कीतीतरी वेळ घडते की, देव त्याच्या क्रोधाने त्यांची पीडा त्यांना वाटून देतो.
18ते कितीदा वाऱ्यापुढे धसकटासारखे होतात, किंवा ते वादळाने उडालेल्या भूशासारखे होतात.
19पण तू म्हणतोस देव वडिलांच्या पापाबद्दल मुलाला शिक्षा करतो. तर त्याने त्यालाच प्रतिफळ द्यावे म्हणजेच त्यास त्याचा दोष कळेल.
20त्याच्या डोळ्यांनीच तो आपला नाश पाहो, तो सर्वशक्तिमान देवाच्या रागाचे प्राशन करो.
21जेव्हा त्याच्या आयुष्याची मद्दत कमी करण्यास येईल, तेव्हा त्याच्या मरणानंतर तो त्याच्या परीवाराची काळजी कशी करील?
22देवाला कोणी ज्ञान शिकवू शकते का? तो तर उच्च पदावर असलेल्या लोकांचाही न्यायनिवाडा करतो.
23एखादा मनुष्य त्याच्या पूर्ण शक्तीतच मरतो, पुर्णपणे शांतीत आणि सहजतेने.
24त्याची भांडी दुधाने आणि त्याची हाडे मज्जारसाने ओलसर आहेत.
25दुसरा मनुष्य मनाच्या कटूपणात मरतो, त्याने कधीच चांगले अनुभवलेले नसते.
26शेवटी हे दोघेही बरोबरच मातीत जातील. किडे त्यांना झाकून टाकतील.
27पाहा, मला तुमचे विचार माहीती आहेत, कोणत्या चुकांनी मला दु:ख द्यायची तुझी इच्छा आहे हे मला माहीत आहे.
28तू कदाचित् म्हणशील ‘आता राजाचे घर कोठे आहे? दुष्ट ज्या तंबूत राहतो तो कोठे आहे.
29तू कधीच प्रवास करणाऱ्या लोकांस विचारले नाहीस काय? ते काय चिन्ह देतील हे तुला ठावूक नाही काय,
30दुष्ट मनुष्य नाशाच्या दिवसासाठी ठेवलेला आहे, आणि त्यास क्रोधाच्या दिवशी बाहेर आणतील.
31त्याच्या तोंडावर त्याचा मार्ग कोण प्रकट करील? त्याने जे केले त्याची परत फेड कोण करील?
32नंतर त्यास कबरेकडे नेतील, त्याच्या थडग्यावर पहारा ठेवतील.
33खोऱ्यातील ढेकळे त्यास गोड लागतील, सर्व लोक त्याच्या पाठीमागे जातील जसे असंख्य लोक होऊन गेले तसे ते सर्व त्याच्या मागे जातील
34मग तुमच्या मुर्खपणाने तुम्ही माझे सांत्वन कसे करु शकता, म्हणून तुमची उत्तरे काहीच नाही ती मुर्खपणाची आहेत.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.