इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

योहान 9

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1तो तिकडून पुढे जात असता एक जन्मपासूनचा आंधळा मनुष्य त्याच्या दृष्टीस पडला.
2तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्यास विचारले, “रब्बी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला? याच्या की याच्या आई-वडीलांच्या?”
3येशूने उत्तर दिले, “ह्याने किंवा याच्या आई-वडीलाने पाप केले असे नाही, तर याच्याठायी देवाची कार्ये प्रकट व्हावीत म्हणून हा असा जन्मास आला.
4ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे. तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही.
5मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे.”
6असे बोलून तो जमिनीवर थुंकला व थुंकीने त्याने चिखल केला, तो चिखल त्याच्या डोळ्यांस लावला.
7आणि त्यास म्हटले, “जा, शिलोहाच्या तळ्यात धू.” (याचा अर्थ पाठवलेला) म्हणून त्याने जाऊन धुतले आणि तो डोळस होऊन पाहू लागला.
8म्हणून त्याचे शेजारी व ज्यांनी त्यास भीक मागताना पूर्वी पाहिले होते ते म्हणाले, “तो जो बसून भीक मागत असे तो हाच ना?”
9कोणी म्हणाले, “हा तो आहे.” दुसरे म्हणाले, “नाही, हा त्याच्यासारखा आहे.” पण तो म्हणाला, “मी तोच आहे.”
10म्हणून ते त्यास म्हणाले, “मग तुझे डोळे कसे उघडले?”
11त्याने उत्तर दिले, “येशू नावाच्या मनुष्याने चिखल करून माझ्या डोळ्यांस लावला आणि तो मला म्हणाला, ‘शिलोहवर जाऊन धू.’ मी जाऊन धुतले आणि मला दिसू लागले.”
12तेव्हा त्यांनी म्हटले, “तो कोठे आहे?” तो म्हणाला, “मला माहीत नाही.”
13तो जो पूर्वी आंधळा होता त्यास त्यांनी परूश्यांकडे नेले,
14ज्यादिवशी येशूने चिखल करून त्याचे डोळे उघडले तो दिवस शब्बाथ होता.
15म्हणून परूश्यांनीही त्यास पुन्हा विचारले. “तुला कसे दिसू लागले?” आणि तो त्यांना म्हणाला, “त्याने माझ्या डोळ्यांस चिखल लावला, तो मी धुऊन टाकल्यावर, मला दिसू लागले.”
16तेव्हा परूश्यांतील कित्येक म्हणाले, “हा मनुष्य देवापासून नाही, कारण तो शब्बाथ पाळीत नाही.” पण दुसरे म्हणाले, “जो मनुष्य पापी आहे तो असली चिन्हे कशी करू शकतो?”
17म्हणून, पुन्हा ते त्या आंधळ्याला म्हणाले, “त्याने जर तुझे डोळे उघडले तर तू त्याच्याविषयी काय म्हणतोस?” तो म्हणाला, “तो एक संदेष्टा आहे.”
18म्हणून यहूदी अधिकाऱ्यांनी ज्याला दृष्टी आली होती त्याच्याविषयी त्याच्या आई-वडीलांना बोलवून विचारपूस करीपर्यंत, तो पूर्वी आंधळा असून व आता डोळस झाला आहे, यावर विश्वास ठेवला नाही.
19त्यांनी त्यांना विचारले, “तुमचा जो मुलगा आंधळा जन्मला म्हणून तुम्ही म्हणता तो हा आहे काय? मग आता त्यास कसे दिसते?”
20त्याच्या आई-वडीलानी उत्तर दिले, “हा आमचा मुलगा आहे; आणि हा आंधळा जन्मला होता हे आम्हास माहीत आहे.
21तरी आता त्यास कसे दिसू लागले हे आम्हास माहीत नाही किंवा त्याचे डोळे कोणी उघडले हेही आम्हास माहीत नाही. त्यास विचारा, तो वयात आलेला आहे, तो स्वतःविषयी सांगेल.”
22त्याच्या आई-वडीलांना यहूदी अधिकाऱ्यांचे भय होते म्हणून ते असे म्हणाले, कारण, तो ख्रिस्त आहे असे कोणी पत्करल्यास त्यास सभास्थानातून घालवावे, असे यहुद्यांचे आधीच एकमत झाले होते.
23यामुळे त्याच्या आई-वडीलानी म्हटले, “तो वयात आलेला आहे, त्यास विचारा.”
24तेव्हा जो मनुष्य आंधळा होता त्यास त्यांनी दुसर्‍यांदा बोलावले आणि ते त्यास म्हणाले, “देवाचे गौरव कर; हा मनुष्य पापी आहे हे आम्ही जाणतो.”
25यावरुन त्याने उत्तर दिले, “तो पापी आहे किंवा नाही हे मी जाणत नाही. मी एक गोष्ट जाणतो; मी पूर्वी आंधळा होतो आणि आता मला दिसते.”
26म्हणून ते त्यास म्हणाले, “त्याने तुला काय केले? त्याने तुझे डोळे कसे उघडले?”
27त्याने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हास आताच सांगितले, तरी तुम्ही ऐकले नाही; ते पुन्हा ऐकायची इच्छा का करता? तुम्हीही त्याचे शिष्य होऊ पाहता काय?”
28तेव्हा त्यांनी त्याची निंदा करून आणि ते त्यास म्हणाले, “तू त्याचा शिष्य आहेस; आम्ही मोशेचे शिष्य आहोत.
29देव मोशेबरोबर बोलला हे आम्हास माहीत आहे. हा कोठला आहे हे आम्हास माहीत नाही.”
30त्या मनुष्याने त्यांना उत्तर दिले “हेच तर मोठे आश्चर्य आहे की, हा कोठला आहे हे तुम्हास माहीत नाही; आणि तरी त्याने माझे डोळे उघडले.
31आपल्याला हे माहीत आहे की, देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो मनुष्य देवाचा उपासक आहे आणि जो त्याच्या इच्छेप्रमाणे करतो त्याचे तो ऐकतो.
32आंधळा जन्मलेल्या कोणाचे डोळे उघडल्याचे युगाच्या आरंभापासून कधी कोणाच्या ऐकण्यात आले नव्हते.
33हा जर देवापासून नसता तर याला काही करता आले नसते.”
34त्यांनी त्यास म्हटले, “तू सर्वस्वी पापात जन्मलास आणि तू आम्हास शिकवतोस काय?” आणि त्यांनी त्यास बाहेर घालवले.
35त्यांनी त्यास बाहेर घालवले हे येशूने ऐकले; आणि त्यास तो सापडल्यावर तो त्यास म्हणाला, “तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय?”
36त्याने उत्तर दिले, “साहेब, मी त्याच्यावर विश्वास ठेवावा असा तो कोण आहे?”
37येशूने त्यास म्हटले, “तू त्यास पाहिले आहे आणि तुझ्याबरोबर आता बोलत आहे तोच तो आहे.”
38तो म्हणाला, “प्रभूजी, मी विश्वास ठेवतो.” आणि त्याने त्यास नमन केले.
39तेव्हा येशू म्हणाला, “मी न्यायनिवाड्यासाठी या जगात आलो आहे; यासाठी की, ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे.”
40तेव्हा परूश्यांतील जे त्याच्याबरोबर होते त्यांनी या गोष्टी ऐकल्या; आणि ते त्यास म्हणाले, “आम्ही पण आंधळे आहोत काय?”
41येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही आंधळे असता तर तुम्हास पाप नसते, परंतु तुम्ही म्हणता की, ‘आम्हास आता दिसते’, म्हणून तुमचे पाप तसेच राहते.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.