इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

योहान 21

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1आणि या यानंतर पुन्हा तिबिर्याच्या सरोवराजवळ येशूने शिष्यांना स्वतःस प्रकट झाला; आणि अशाप्रकारे स्वतःस प्रकट केले.
2शिमोन पेत्र व ज्याला दिदुम म्हणत तो थोमा, गालील प्रांतातील काना नगरातील नथनेल व जब्दीचे पुत्र आणि त्याच्या शिष्यांतील दुसरे दोघे जण हे बरोबर होते.
3शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, “मी मासे धरावयला जातो.” ते त्यास म्हणतात, “आम्ही पण तुझ्याबरोबर येतो.” तेव्हा ते निघून तारवात चढले आणि त्या रात्री त्यांनी काहीही धरले नाही.
4पण आता पहाट होते वेळी येशू समुद्र किनार्‍याजवळ उभा होता, पण तो येशू होता हे शिष्यांना समजले नाही.
5तेव्हा येशूने त्यांना म्हटले, “मुलांनो, तुमच्याजवळ काही खावयाला आहे काय?” ते त्यास म्हणाले, “नाही.”
6आणि तो त्यांना म्हणाला, “तारवाच्या उजवीकडे जाळे टाका आणि तुम्हास मिळेल.” म्हणून त्यांनी टाकले आणि माशांच्या घोळक्यामुळे ते त्यांना आता ओढवेना.
7तेव्हा ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, “तो प्रभू आहे.” शिमोन पेत्राने ऐकले की, तो “प्रभू आहे, प्रभू आहे” तेव्हा तो उघडा असल्यामुळे (त्याने बाहेरील वस्त्र, झगा, न घातल्यामुळे) त्याने कमरेला झगा गुंडाळला आणि सरोवरात उडी घेतली.
8आणि दुसरे शिष्य त्या लहान मचव्याने ते माशांचे जाळे ओढीत ओढीत आले कारण ते किनार्‍यापासून फार दूर नव्हते, पण सुमारे दोनशे हातावर होते.
9तेव्हा ते किनार्‍यावर बाहेर आल्यावर तेथे कोळशांचा विस्तव आणि त्यावर ठेवलेली मासळी आणि भाकरी पाहिली.
10येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही आता धरलेल्या मासळीमधून काही आणा.”
11तेव्हा शिमोन पेत्राने मचव्यावर चढून एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनार्‍यावर ओढून आणले. ते तितके असतानाही जाळे फाटले नाही.
12येशू त्यांना म्हणाला, “या, न्याहरी करा.” कारण तो प्रभू आहे हे त्यांना समजले म्हणून आपण कोण आहात हे त्यास विचारावास शिष्यांतील कोणी धजला नाही.
13तेव्हा येशूने भाकर घेतली आणि त्यांना दिली; तशीच मासळी दिली.
14येशू मरण पावलेल्यातून उठल्यानंतर त्याची शिष्यांना प्रकट व्हायची ही तिसरी वेळ.
15मग त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणतो, “माझी कोकरे चार.”
16तो पुन्हा दुसऱ्यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणाला, “माझी मेंढरे राख.”
17तो तिसर्‍यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” पेत्र दुःखी होऊन त्यास म्हणाला, “प्रभू, तुला सर्व माहीत आहे, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” येशू त्यास म्हणतो, “माझी मेंढरे चार.”
18“मी तुला खरे खरे सांगतो, तू जेव्हा तरुण होतास तेव्हा आपली कंबर बांधून तुझी इच्छा असेल तिकडे जात होतास; पण तू म्हातारा होशील तेव्हा हात पुढे करशील, दुसरा तुझी कंबर बांधील आणि तुझी इच्छा नसेल तिकडे तुला नेईल.”
19तो कोणत्या मरणाने देवाचे गौरव करणार होता हे प्रकट करायला तो हे बोलला आणि हे बोलल्यावर तो त्यास म्हणतो, “माझ्यामागे ये.”
20तेव्हा पेत्र मागे वळला आणि पाहतो की, ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती जो भोजनाच्या वेळी त्याच्या छातीशी टेकला असता मागे लवून ‘प्रभू, तुला धरून देणारा तो कोण आहे?’ असे म्हणाला होता, त्यास त्याने मागे चालतांना पाहिले.
21म्हणून, त्यास बघून, पेत्र येशूला म्हणाला, “प्रभू, ह्याचे काय?”
22येशूने त्यास म्हटले, “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर त्याचे तुला काय? तू माझ्यामागे ये.”
23तेव्हा बांधवांत हे बोलणे पसरले की, तो शिष्य मरणार नाही. पण येशू त्यास म्हणाला नव्हता की, तो मरणार नाही, पण “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर तुला काय?”
24जो या गोष्टींची साक्ष देतो व ज्याने या गोष्टी लिहिल्या आहेत तोच हा शिष्य आहे; आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हास माहीत आहे.
25आणि ह्याशिवाय येशूने केलेली पुष्कळ कृत्ये आहेत; ती एकएक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात देखील मावणार नाहीत असे मला वाटते.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.