इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

योहान 18

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1हे बोलल्यानंतर येशू आपल्या शिष्यांबरोबर किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला. तेथे एक बाग होती; तेथे तो व त्याचे शिष्य गेले.
2ही जागा त्यास धरून देणाऱ्या यहूदालाही माहीत होती कारण येशू पुष्कळ वेळा आपल्या शिष्यांबरोबर तेथे जात असे.
3तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक लोक व परूशी यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर, दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन यहूदा तेथे आला.
4येशू आपणावर जे काही येणार हे सर्व जाणून बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही कोणाला शोधत आहात?”
5त्यांनी त्यास उत्तर दिले, “नासरेथकर येशूला.” तो त्यांना म्हणाला, “तो मी आहे.” आणि ज्या यहूदाने त्यास धरून दिले देखील त्यांच्याबरोबर उभा होता,
6“तो मीच आहे,” असे म्हणताच ते मागे सरकून जाऊन जमिनीवर पडले.
7मग त्याने त्यांना पुन्हा विचारले, “तुम्ही कोणाला शोधता?” आणि ते म्हणाले, “नासरेथकर येशूला.”
8येशूने उत्तर दिले, “मीच तो आहे; असे मी तुम्हास सांगितले, तुम्ही मला शोधीत असला तर यांना जाऊ द्या.”
9“जे तू मला दिले आहेत त्यांतून मी एकही हरविला नाही,” असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले.
10तेव्हा शिमोन पेत्राजवळ तलवार असल्याने त्याने ती उपसली व महायाजकाच्या दासावर चालविली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्ख होते.
11तेव्हा येशू पेत्राला म्हणाला, “तरवार म्यानात घाल. पित्याने मला जो प्याला दिला आहे तो मी पिऊ नये काय?”
12मग सैनिकांची तुकडी व हजारांचा सरदार आणि यहूद्यांचे अधिकारी हे येशूला धरून बांधले.
13आणि त्यास प्रथम हन्नाकडे नेले कारण, त्या वर्षी महायाजक असलेल्या कयफाचा हा सासरा होता,
14एका मनुष्याने लोकांसाठी मरावे हे फायद्याचे आहे. अशी मसलत यहूद्यास याच कयफाने दिली होती.
15शिमोन पेत्र व दुसरा एक शिष्य येशूच्या मागे मागे चालले; तो शिष्य महायाजकाच्या ओळखीचा होता आणि येशूबरोबर महायाजकाच्या वाड्यात गेला.
16पण पेत्र बाहेर, दाराशी उभा राहिला होता, म्हणून जो दुसरा शिष्य महायाजकाच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले.
17यावरुन ती तरूण द्वारपालिका होती ती पेत्राला म्हणाली, “तूही या मनुष्याच्या शिष्यांपैकी आहेस काय?” तो म्हणाला, “मी नाही.”
18थंडी असल्यामुळे दास व कामदार कोळशाचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते आणि पेत्र पण त्यांच्याबरोबर शेकत उभा होता.
19तेव्हा महायाजकाने येशूला त्याच्या शिष्यांविषयी व त्याच्या शिक्षणाविषयी प्रश्न केले.
20येशूने त्यास उत्तर दिले, “मी जगासमोर उघडपणे बोललो आहे, सभास्थानात आणि परमेश्वराच्या भवनात, सर्व यहूदी जमतात, तेथे मी नेहमी शिक्षण दिले आणि गुप्तपणे मी काही बोललो नाही.
21मला का विचारता? मी काय बोलतो ते. ज्यांनी ऐकले आहे त्यांना विचारा. पाहा, मी जे बोललो ते त्यांना माहीत आहे.”
22त्याने असे म्हटल्याबरोबर जवळ उभा राहणारा एक कामदार येशूला चापट मारून म्हणाला, “तू महायाजकाला असे उत्तर देतोस काय?”
23येशूने त्यास उत्तर दिले, “मी वाईट रीतीने बोललो असलो तर कसे वाईट बोललो ते सिद्ध कर; योग्य रीतीने बोललो असलो तर मला का मारतोस?”
24तेव्हा हन्नाने त्यास महायाजक कयफा याच्याकडे बांधलेलेच पाठवले.
25शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता; त्यास इतर म्हणाले, “तूही त्याच्या शिष्यांतला आहेस काय?” त्याने नाकारले व म्हटले, “मी नाही.”
26पेत्राने ज्याचा कान कापला होता त्याचा नातलग असलेला, महायाजकाच्या दासांपैकी एक होता, तो त्यास म्हणाला, “मी तुला त्याच्याबरोबर बागेत नाही का पाहिले?”
27पेत्राने पुन्हा नाकारले आणि, लागलाच, कोंबडा आरवला.
28तेव्हा त्यांनी येशूला कयफाकडून सरकारवाड्यांत नेले; तेव्हा सकाळ होती आणि आपण अशुद्ध होऊ नये, पण वल्हांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते स्वतः सरकारवाड्यांत गेले नाहीत.
29यास्तव पिलात त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, “तुम्ही या मनुष्यावर काय आरोप ठेवता?”
30त्यांनी त्यास उत्तर दिले, “तो दुष्कर्मी नसता तर आम्ही त्यास आपल्या हाती दिले नसते.”
31पिलाताने त्यांना म्हटले, “त्याला तुम्हीच आपल्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा.” यहूदी अधिकारी त्यास म्हणाले, “आम्हास कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही.”
32आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचवितांना येशूने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
33म्हणून पिलात पुन्हा सरकारवाड्यांत गेला; आणि त्याने येशूला बोलावून म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”
34येशूने उत्तर दिले, “आपण स्वतः हे म्हणता किंवा दुसर्‍यांनी आपणाला माझ्याविषयी हे सांगितले?”
35पिलाताने उत्तर दिले, “मी यहूदी आहे काय? तुझ्याच लोकांनी आणि मुख्य याजकांनी तुला माझ्या हाती दिले; तू काय केले.”
36येशूने उत्तर दिले, “माझे राज्य या जगाचे नाही. माझे राज्य या जगाचे असते तर यहूद्यांच्या हाती मी दिला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती; पण माझे राज्य येथले नाही.”
37म्हणून पिलात त्यास म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे असे आपण म्हणता. मी यासाठी जन्मलो आहे आणि यासाठी मी जगात आलो आहे. मी सत्याची साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.”
38पिलात त्यास म्हणाला, “सत्य काय आहे?” आणि हे बोलून तो पुन्हा यहूद्यांकडे बाहेर गेला आणि त्यांना म्हणाला, “मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही.
39पण तुमच्यासाठी वल्हांडण सणांत मी एकाला सोडावे अशी तुमच्यात रीत आहे; तर तुमच्यासाठी मी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय?”
40तेव्हा पुन्हा ते ओरडून म्हणाले, “ह्याला सोडू नका, तर बरब्बाला सोडा” आता बरब्बा हा एक लुटारू होता.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.