इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

यिर्मया 44

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1जे सर्व यहूदी मिसर देशामध्ये राहत होते, जे मिग्दोल, तहपन्हेस, मेमफिस व पथ्रोस येथे राहत होते, त्यांच्याविषयी परमेश्वराचे वचन यिर्मयाकडे आले ते असे होते.
2सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, यरूशलेम व यहूदाच्या सर्व नगरांवर जे अरिष्ट मी आणली, ते तुम्ही पाहिली आहेत. पाहा, आता ती नगरे उजाड झाली आहेत. तेथे राहण्यास कोणीही जिवंत नाही.
3कारण हे त्यांच्या स्वतःचे नाहीत किंवा तुम्हास किंवा तुमच्या पूर्वजांना माहित नाहीत अशा दुसऱ्या देवांना धूप जाळून आणि त्यांची उपासना करण्यासाठी जाऊन वाईट गोष्टी करून त्यांनी माझे मन दुःखावले.
4मग मी माझे सर्व सेवक संदेष्टे वारंवार पाठवत आलो. मी त्यांना सांगण्यासाठी पाठवले, ज्यांचा मी द्वेष करतो त्या तिरस्कारणीय गोष्टी थांबवा.
5पण त्यांनी ऐकले नाही; त्यांनी दुसऱ्या देवाला धूप जाळणाऱ्या दुष्कृत्यापासून वळण्यास किंवा त्यांनी लक्ष देण्याचे नाकारले.
6म्हणून माझा क्रोध व संताप ओतला गेला आणि यहूदाच्या नगरांत व यरूशलेमेच्या रस्त्यावर अग्नी पेटला. यास्तव ती ओसाड व उजाड झाली आहेत.
7म्हणून आता, सेनाधीश परमेश्वर आणि इस्राएलाचा देव असे म्हणतो, “तुम्ही आपल्या स्वत:विरूद्ध हे मोठे अनिष्ट का करता? तुम्ही आपणासाठी पुरुष व स्त्रिया, मुले व बालके यांना यहूदापासून तोडण्याचे कारण का होता? तुमचा अवशेष उरणार नाही.
8कारण तुम्ही जेथे राहण्यास गेला आहात त्या मिसर देशात दुसऱ्या देवाला धूप जाळून तुमच्या हातच्या कृत्यांनी मूर्तीपूजा करुन तुम्ही मला दुःखवता. तुम्ही तेथे जात आहात याकरिता की तुमचा नाश व्हावा आणि शापीत व्हावे व पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांमध्ये तुमची निंदा व्हावी.
9तुमच्या पूर्वजांनी केलेली दुष्कृत्ये आणि यहूदा राजा व त्याच्या बायकांनी केलेली दुष्कृत्ये तुम्ही विसरलात का? तुम्ही आणि तुमच्या बायकांनी यहूदाच्या देशात व यरूशलेमेच्या रस्त्यावर केलेली वाइट कृत्ये विसरलात का?
10ते या दिवसापर्यंत, अजून नम्र झालेले नाहीत. ते माझे जे नियमशास्त्र व माझे जे विधी मी तुम्हापुढे आणि तुमच्या पूर्वजांपुढे ठेवले, त्यांचा त्यांनी आदर केला नाही किंवा ते त्याप्रमाणे चालले नाहीत.”
11“यास्तव सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, पाहा, मी तुमचे अनिष्ट करण्यासाठी आणि सर्व यहूदाचा नाश करण्यासाठी तुमच्या विरोधात होईन.
12कारण मिसर देशात जाऊन तेथे राहण्याचा यहूदाच्या अवशिष्टांनी निश्चय केला. मी हे यासाठी करीन की, ते सर्व मिसर देशात नष्ट होतील. तलवारीने आणि दुष्काळाने त्यांचा नायनाट होईल. लहानापासून थोरापर्यंत सर्व तलवारीने व दुष्काळाने नष्ट होतील. ते मरतील आणि अपशब्द, शाप, निंदा आणि भयानक गोष्टींचे विषय होतील.
13जशी मी यरूशलेमेला शिक्षा केली, त्याप्रमाणे मिसर देशात राहणाऱ्या लोकांस तलवार, दुष्काळ व मरीने शिक्षा करीन.
14म्हणून यहूदाचे जे कोणी उरलेले, फरारी, वाचलेले मिसर देशात उपरी म्हणून राहायला गेले आहेत, त्यातले जे कोणी ज्यांची यहूदा देशात परत जाण्याची आणि तेथे राहण्याची इच्छा आहे. त्यातील कोणीही परत जाणार नाही, कारण जे कोणी थोडके निसटून जातील त्यांच्यावाचून दुसरे कोणी परत जाणार नाहीत.”
15नंतर आपल्या स्त्रिया दुसऱ्या देवास धूप जाळतात असे ज्या सर्व पुरुषांस माहित होते ते आणि ज्या सर्व स्त्रिया मोठ्या मंडळीत होत्या आणि मिसर देशात पथ्रोसात जे लोक राहत होते, अशा सर्वांनी यिर्मयाला उत्तर दिले.
16ते म्हणाले, “तू आम्हास परमेश्वराच्या नावात जे वचन सांगितले त्याच्याविषयी आम्ही तुझे ऐकणार नाही.
17पण जसे आमचे पूर्वज, आमचे राजे व आमचे अधिकारी यहूदाच्या नगरांत आणि यरूशलेमेच्या रस्त्यावर करीत असत, तसे आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळणे व तिला पेयार्पणे ओतण्याविषयी जो प्रत्येक शब्द आमच्या मूखातून निघाला आहे तो आम्ही खचित पूर्ण करू. कारण त्यावेळी आम्ही अन्नाने तृप्त होतो आणि कोणत्याही अनिष्टाचा अनुभव न घेता उन्नतीत होतो.
18जेव्हा आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळणे व तिला पेयार्पणे ओतणे यापासून परावृत्त झालो तेव्हापासून आम्ही सर्व दारिद्र्याने दुःखी आहोत व तलवारीने व दुष्काळाने मरत आहोत.”
19मग स्त्रिया म्हणाल्या, “जेव्हा आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळला व तिला पेयार्पणे ओतली, या गोष्टी आम्ही आपल्या पतीच्या संमतीशिवाय केल्या काय?”
20मग यिर्मया सर्व लोकांस, स्त्रिया व पुरुषांस आणि ज्या सर्व लोकांनी त्यास उत्तर दिले, त्याने घोषणा केली व म्हणाला,
21“तुम्ही यहूदाच्या नगरांत आणि यरूशलेमेच्या रस्त्यात, तुम्ही, तुमचे पूर्वज, तुमचे राजे आणि अधिकारी व देशातील लोक जो धूप जाळीत होते, त्याची परमेश्वरास आठवण नव्हती काय? कारण परमेश्वराच्या मनात हे आले. ते त्याच्या विचारात आले.
22मग तुमच्या वाईट व्यवहारामुळे, तिरस्करणीय कृत्यामुळे परमेश्वराची सहनशक्ती संपली. नंतर त्याने तुमचा देश ओसाड, भीतीजनक आणि शापीत केला, म्हणून आजपर्यंत तेथे कोणी रहिवासी नाही.
23तुम्ही धूप जाळला आणि परमेश्वराविरूद्ध पाप केले व तुम्ही त्याची वाणी, त्याचे नियमशास्त्र त्याचे विधी किंवा त्याचे कराराचे आदेश, ऐकले नाहीत, हे अनिष्ट तुमच्याविरुध्द आजपर्यंत घडत आहेत.”
24मग यिर्मया त्या सर्व लोकांस आणि स्त्रियांना म्हणाला, “यहूदातले जे तुम्ही मिसर देशामध्ये आहात ते सर्व तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका.
25सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, ‘आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळायला व तिच्यासाठी पेयार्पणे ओतायला जे नवस केले आहेत ते खचित फेडू असे तुम्ही आणि तुमच्या स्त्रिया तुम्ही दोघांनी आपल्या मुखाने बोलून आणि आपल्या हातांनी पूर्ण केले आहे. तर तुम्ही आपले नवस खचित स्थापित करा आणि आपले नवस फेडा.”
26यास्तव जे तुम्ही यहूदी देशातले मिसर देशात राहता ते सर्व तुम्ही परमेश्वराची वचने ऐका; पाहा, मी आपल्या थोर नावाची शपथ वाहिली आहे की, सर्व मिसर देशामध्ये राहणाऱ्या यहूदा देशातल्या कोणत्याही मनुष्याच्या मुखाने परमेश्वर जिवंत आहे असे म्हणून माझे नाव पुन्हा घेण्यात येणार नाही.
27पाहा, मी त्यांच्या चांगल्यासाठी नाही तर त्यांच्या अनिष्टासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवीन. यहूदा देशातला जो प्रत्येक व्यक्ती मिसर देशामध्ये आहे त्यांचा अंत होईपर्यंत ते तलवारीने नाश होईल.
28नंतर जे काही थोडके लोक तलवारीपासून सुटतील ते मिसर देशामधून यहूदा देशात परत येतील. मग सर्व अवशिष्ट यहूदी मिसर देशात राहण्यास गेलेल्यांना कोणाचे शब्द खरे ठरले आहेत माझे किंवा त्यांचे ते त्यांना समजेल.
29परमेश्वराचे हे सांगणे आहे की, माझी वचने तुमच्या अनिष्टाची ठरतील हे तुम्हास कळून यावे म्हणून मी या जागी तुम्हास शिक्षा करीन. हेच तुम्हास चिन्ह होय.
30परमेश्वर असे म्हणतो, पाहा, जसे मी यहूदाचा राजा सिद्कीयाला त्याचा शत्रू बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या हाती दिले त्याप्रमाणे मी मिसराचा राजा फारो हफ्रा याला त्याच्या शत्रूंच्या हाती व त्याचा जीव घेऊ पाहणाऱ्यांच्या हाती देईन.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.