इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

यिर्मया 40

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1यरूशलेम व यहूदा येथील जे सर्व कैदी बंदिवान करून बाबेलास नेले होते त्यांच्यामध्ये यिर्मया बेड्यांनी बांधलेला होता. तेव्हा राजाच्या अंगरक्षकाचा प्रमुख नबूजरदान याने त्यास रामा येथून पाठवून दिल्यावर जे वचन परमेश्वराकडून यिर्मयाकडे आले ते हे.
2प्रमुख अंगरक्षकाने यिर्मयाला घेतले आणि तो त्यास म्हणाला, “तुझा देव परमेश्वर ह्याने हे अरिष्ट या स्थळावर येणार म्हणून भाकीत केले.
3आणि परमेश्वराने ते आणले आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे त्याने केले आहे; कारण तुम्ही लोकांनी परमेश्वराविरुध्द पाप केले आहे आणि त्याची वाणी पाळली नाही. म्हणून या गोष्टी तुम्हा लोकांविरूद्ध घडल्या आहेत.
4पण आता पाहा, मी तुझ्या हातात असलेल्या बेड्यापासून तुला आज सोडवत आहे. जर तुझ्या दृष्टीने तू माझ्याबरोबर बाबेलास येणे चांगले असले तर, ये, आणि मी तुझी काळजी घेईन. पण जर तुझ्या दृष्टीने तू माझ्याबरोबर बाबेलास येणे चांगले नसेल तर मग येऊ नको. तुझ्यादृष्टीने जेथे चांगले आणि योग्य आहे तेथे तू जा.
5जेव्हा यिर्मयाने काही उत्तर दिले नाही, नबूजरदान म्हणाला, शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या ज्याला बाबेलाच्या राजाने त्यास यहूदातील नगरांचा अधिकारी नेमले आहे त्याच्याकडे परत जा आणि त्याच्याबरोबर लोकांमध्ये राहा. किंवा जेथे कोठे तुझ्या दृष्टीने तुला योग्य वाटेल तेथे तू जा.” राजाच्या अंगरक्षकाच्या नायकाने त्यास अन्न व बक्षीस दिले आणि त्यास दूर पाठवून दिले.
6मग यिर्मया, मिस्पा येथे अहीकामाचा मुलगा गदल्या ह्याच्याकडे गेला. तो देशात मागे राहिलेल्या लोकांमध्ये जाऊन राहिला.
7आता यहूदाच्या सैन्यातील काही सेनापतींनी जे अजून अंगणात होते ते आणि त्यांच्या मनुष्यांनी ऐकले की, बाबेलाच्या राजाने अहीकामाचा मुलगा गदल्या ह्यास, देशावर अधिपती म्हणून नेमले आहे. त्यांनी हेही ऐकले की, देशात अगदी गरीब पुरुष, स्त्रिया व मुले ह्यांना कैद करून बाबेलला नेले नव्हते जे मागेच राहिले होते त्यांना त्याच्या ताब्यात दिले आहे.
8मग ते मिस्पा येथे गदल्याकडे गेले. ती माणसे नथन्याचा मुलगा इश्माएलाची होती; कारेहाचे मुले योहानान व योनाथान; तन्हुमेथाचा मुलगा सराया; रफैची मुले नटोफाथी आणि माकाथाचा मुलगा याजन्या ते व त्यांची माणसे.
9तेव्हा शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या त्यांना व त्यांच्या मनुष्यांना शपथ घेऊन आणि त्यांना म्हणाला, खास्दी अधिकऱ्यांची सेवा करण्यास घाबरु नका. देशात वस्ती करा आणि बाबेलाच्या राजाची सेवा करा आणि असे केल्याने तुमचे भले होईल.
10आणि पाहा, जे खास्दी आम्हाजवळ येतील त्यांना भेटण्यास मी मिस्पात राहीन. म्हणून तुम्ही द्राक्षरस, उन्हाळी फळ व तेल यांचे उत्पादन करून आपल्या पात्रात साठवून ठेवावे. जी नगरे तुम्ही ताब्यात घेतली आहेत त्यामध्ये तुम्ही राहा.
11त्याचप्रमाणे मवाबात अम्मोनी लोकांमध्ये, अदोमात व इतर सर्व देशात जे यहूदी होते त्या सर्वांनी जेव्हा ऐकले की बाबेलाच्या राजाने यहूदाचा अवशेष देशात राहू दिला आहे व त्यांच्यावर गदल्या बिन अहीकाम बिन शाफान नेमला आहे,
12तेव्हा जे सर्व प्रत्येक ठिकाणी पांगले होते ते सर्व यहूदी परत यहूदा देशात मिस्पात गदल्याकडे आले. त्यांनी द्राक्षरस आणि उन्हाळी फळांचा हंगाम मोठ्या विपुलतेने साठा केला.
13कारेहाचा मुलगा योहानान व खेड्यापाड्याच्या प्रदेशातील सैन्याचे सर्व अधिकारी मिस्पा येथे गदल्याकडे आले.
14ते त्यास म्हणाले, “अम्मोनी लोकांचा राजा बालीस याने नथन्याचा मुलगा इश्माएल ह्याला तुला मारण्यासाठी पाठविले आहे, हे तू जाणतोस काय?” पण अहीकामचा मुलगा गदल्या याने त्यावर विश्वास ठेवला नाही.
15मग मिस्पा येथे एकांतात कारेहाचा मुलगा योहानान गदल्याशी बोलला की, “मला नथन्याचा मुलगा इश्माएल याला ठार मारण्याची परवानगी दे. कोणी माझ्यावर संशय घेणार नाही. त्याने तुला का मारावे? जे सर्व यहूदी तुझ्याभोवती गोळा झाले आहेत त्यांना देशात पांगण्याची आणि यहूदाचे उरलेले अवशेष नष्ट होण्याची परवानगी का देतोस?”
16पण अहीकामाचा मुलगा गदल्या हा कारेहाचा मुलगा योहानान ह्यास म्हणाला, “तू ही गोष्ट करू नकोस, कारण इश्माएलाबद्दल तू खोट सांगत आहेस.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.