इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

यिर्मया 4

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1परमेश्वर असे म्हणतो, “हे इस्राएल जर तू परत येशील, माझ्याकडे परत वळशील. तू आपले तिरस्करणीय गोष्टी माझ्यासमोर दूर करशील आणि जर तू भटकणार नाहीस,
2आणि जर तू परमेश्वर जिवंत आहे अशी शपथ, सत्यतेने, न्यायाने आणि न्यायीपणाने वाहशील, तर त्याच्या ठायी राष्ट्रे आपणास आशीर्वादीत म्हणतील व त्याच्या ठायी हर्ष करतील.”
3कारण परमेश्वर यहूदा व यरूशलेम मधील प्रत्येक व्यक्तीला म्हणतो: “तुम्ही आपली जमीन नांगरा, काट्यांमध्ये बी पेरु नका.
4अहो यहूदातील मनुष्यांनो आणि यरूशलेममधील रहिवास्यांनो, परमेश्वरासाठी तुम्ही आपली सुंता करा व आपले हृदय परमेश्वराला समर्पण करा. नाही तर तुमच्यातील कोणालाही विझवता न येणारा माझा क्रोधाचा अग्नी बाहेर पडून तुम्हास जाळून टाकील. हे असे घडण्याचे कारण तुम्ही केलेल्या दुष्कृत्ये आहेत.”
5“यहूदाच्या लोकांस ही वार्ता कळवा आणि यरूशलेमला हे ऐकू जाऊ द्या: ‘देशात रणशिंगे फुंका, घोषीत करा, एकत्र या. आपण सर्व मजबूत शहराकडे जाऊ या.’
6खुण म्हणून ध्वज उभारा व तो सियोनेच्या दिशेने दाखवा आणि सुरक्षिततेसाठी पळा. थांबू नका, कारण मी उत्तरेकडून अरिष्ट व भयानक विध्वंस आणीत आहे.
7सिंह त्याच्या झाडीतून बाहेर आला आहे, आणि राष्ट्रांचा नाश करणारा निघाला आहे. जिथे कोणी राहत नाही असे, तुमच्या शहरांना भयामध्ये आणि ओसाडी मध्ये पालटायला तो आपल्या स्थानांतून निघून येत आहे.
8म्हणून स्वत:ला गोणताट गुंडाळा, रडा आणि मोठ्याने आक्रोश करा. कारण परमेश्वराचा क्रोध आमच्यापासून मागे फिरला नाही.”
9“आणि परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की राजांचे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचे हृदय मरून जाईल, याजक घाबरतील आणि संदेष्टे भयभीत होतील.”
10तेव्हा मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू तू यहूदातील आणि यरूशलेममधील लोकांस खरोखरच युक्तीने फसविलेस. ‘तू त्यांना म्हणालास की तुम्हास शांती मिळेल.’ तलवार तर जिवापर्यंत पोचली आहे.”
11त्या वेळेला या लोकांस व यरूशलेमेला असे सांगण्यात येईल. “उजाड टेकड्यावरुन गरम वाऱ्याच्या झळा माझ्या लोकांच्या कन्येकडे येतील. तो त्यांना उफळायला किंवा स्वच्छ करायला येणार नाही.”
12हा वारा त्यापेक्षा जोराचा आहे आणि तो माझ्या आज्ञेवरून येत आहे, आणि मी आता त्यांच्याविरुद्ध माझा निकाल जाहीर करीन.
13पाहा! तो ढगाप्रमाणे आक्रमण करील, त्याचे रथ वादळाप्रमाणे आहेत. त्यांचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत. आम्हांला हाय! कारण आम्ही लुटलेले आहो.
14हे यरूशलेमे, तू तारली जावी, म्हणून तू आपल्या हृदयातील पाप धुऊन काढ. “पाप कसे करावे” हे तुझ्या मनातील खोल विचार किती काळ राहतील?
15कारण बातमीचा आवाज दान शहरातून येत आहे आणि एफ्राईमाच्या पर्वतांवरून येणारी विपत्ती ऐकू येत आहे.
16“राष्ट्रांना ह्याबद्दल विचार करण्यास लावा. पाहा! यरूशलेमेविरूद्ध घोषीत करा की, दूर देशातून वेढा घालणारे येत आहेत आणि यहूदाच्या विरूद्ध ते आपला शब्द उच्चारत आहेत.
17शेताचे रक्षण करणारे तसे ते तिच्याभोवती आहेत. कारण तिने माझ्या विरूद्ध बंड केले आहे. असे परमेश्वर म्हणतो.
18तूझे मार्ग आणि तुझे कर्म यानी तुला या गोष्टी आणून दिल्या आहेत. ही तुझी दुष्टाई आहे, आणि ती कडू या कारणाने तुझ्या हृदयापर्यंत पोचली आहे.”
19माझे हृदय! माझे हृदय! मी माझ्या हृदयात दु:खी आहे. माझ्याठायी माझे हृदय अनावर झाले आहे. माझ्याने शांत बसवत नाही, कारण हे माझ्या जीवा तू रणशिंग्याचा आवाज, लढाईची ओरड ऐकली आहे.
20अरिष्टामागून अरिष्ट घोषीत करण्यात आले आहे. कारण संपूर्ण देशाचा नाश झाला आहे. एकाएकी त्यांनी माझ्या तंबूचा व कनातींचा नाश केला आहे.
21युद्धाचा झेंडा मी किती काळ पाहू? काय मला रणशिंग्याचा आवाज ऐकायला मिळेल?
22कारण देव म्हणतो, “माझे लोक मूर्ख आहेत, ते मला ओळखत नाहीत. ती मूर्ख लोक आहेत आणि त्यांना काहीएक समजत नाही. दुष्कृत्ये करण्यात ते पटाईत आहेत पण चांगले करायचे त्यांना ज्ञान नाही.”
23मी पृथ्वीकडे पाहिले आणि पाहा! ती उजाड आणि आकारविरहीत होती. मी आकाशाकडे पाहिले त्यामध्ये काही प्रकाश नव्हता.
24मी डोंगराकडे पाहिले आणि पाहा! ते कापत होते व सर्व टेकड्या थरथरत होत्या.
25मी पाहिले आणि पाहा! पण कोठेही माणसे नव्हती आणि आकाशातील सर्व पक्षी पळाले होते.
26मी पाहिले आणि पाहा! फळबागेचे वाळवंट झाले होते आणि सर्व शहरे परमेश्वरा समोर, त्याच्या संतप्त क्रोधासमोर खाली ओढले गेले होते.
27परमेश्वर असे म्हणाला: “संपूर्ण देशाची नासधूस होईल, पण मी त्यांचा संपूर्ण नाश करणार नाही.
28या कारणामुळे भूमी शोक करणार आणि वर आकाशे काळोख होतील. कारण मी माझे बेत घोषीत केले आहेत, मी त्यापासून माघार फिरणार नाही.”
29प्रत्येक शहर स्वर व धनुर्धारी यांच्या आवाजाने पळून जातील, ते जंगलात पळून जातील. प्रत्येक शहर डोंगरकड्याच्या ठिकाणी चढेल. शहरे ओसाड पडतील, कारण तेथे कोणीही राहणारे नसतील.
30आता तू उद्ध्वस्त होशील, तेव्हा काय करशील? जरी तू किरमिजी वस्त्रे घातली, आणि सोन्याच्या दागिण्याने आपल्याला सजवतेस, जरी तू काजळ घालून डोळे मोठे करतेस, पण जे मनुष्य तुझ्याकरता वासनाधीन होते आता तुझा तिरस्कार करतात. उलट, ते तुझा जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
31त्यामुळे मी दुःखाचा आवाज ऐकतो आहे, पहिल्या बाळंतपणाच्या वेळेला स्त्री ज्याप्रमाणे किंकाळी फोडते, तसाच सियोनकन्येचा आवाज मी ऐकला आहे. ती श्वासाकरता धडपडत आहे, ती आपले हात पसरत आहे, “मला हाय हाय! कारण माझ्या घातक्यांमुळे माझा जीव कंटाळला आहे!”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.