इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

यिर्मया 36

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1यहूदाचा राजा योशीया याचा मुलगा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षात असे झाले की, यिर्मयाकडे परमेश्वरापासून वचन आले. ते म्हणाले,
2तू आपणासाठी गुंडाळी घे आणि यहूदा, इस्राएल आणि इतर राष्ट्रे यांच्याविषयी मी तुला सांगितलेले सर्व वचने त्यावर लिही. योशीयाच्या दिवसापासून आतापर्यंत मी तुला सांगितलेली प्रत्येकगोष्ट लिही.
3कदाचित यहूदाचे लोक मी जे अरिष्ट त्यांच्यावर आणण्याचे योजले आहे, ते ऐकतील. कदाचित प्रत्येकजण आपल्या कुमार्गापासून वळेल, मग मी त्यांच्या अन्यायाची व पापांची क्षमा करीन.
4मग यिर्मयाने नेरीयाचा मुलगा बारूख याला बोलावले आणि परमेश्वराने त्याच्याशी बोललेली सर्व वचने यिर्मयाने सांगितली व बारूखाने पटावर लिहून काढली.
5पुढे यिर्मयाने बारूखाला आज्ञा दिली. तो म्हणाला, “मला मनाई आहे आणि मी परमेश्वराच्या घरात जाऊ शकत नाही.
6म्हणून तू जा आणि मी सांगितल्याप्रमाणे तू जे पटावर लिहीले ते वाच. परमेश्वराच्या मंदिरात उपवासाच्या दिवशी, लोकांस ऐकू येतील आणि यहूदा नगरांतून आलेल्या सर्व लोकांस ऐकू येतील अशी वाचून दाखव.
7कदाचित् ते परमेश्वरापुढे आपली दयेची विनंती सादर करतील. कदाचित प्रत्येक व्यक्ती आपल्या कुमार्गापासून वळेल, कारण परमेश्वराचा जो क्रोध व कोप या लोकांविरूद्ध सांगितला आहे तो भयंकर आहे.”
8म्हणून यिर्मयाने संदेष्ट्याने नेरीयाचा मुलगा बारूख याला जे आज्ञापिले होते ती प्रत्येकगोष्ट केली. त्याने परमेश्वराची वचने त्या गुंडाळीतून मोठ्याने परमेश्वराच्या घरात वाचली.
9योशीयाचा पुत्र यहोयाकीम राजाच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षाच्या नवव्या महिन्यात यरूशलेमेतल्या सर्व लोकांनी व जे सर्व लोक यहूदाच्या नगरांतून यरूशलेमेस आले त्यांनीही परमेश्वराच्या आदरासाठी उपासाची घोषणा केली.
10तेव्हा बारूखाने मोठ्याने यिर्मयाची गुंडाळीवरील वचने परमेश्वराच्या घरात शाफान लेखकाचा मुलगा गमऱ्या याच्या खोलीत, वरील अंगणात, नव्या दाराच्या प्रवेशाजवळ सर्व लोकांच्या कानी पडतील अशी वाचली.
11आता शाफानाचा मुलगा गमऱ्या, याचा मुलगा मीखाया परमेश्वराची सर्व वचने त्या पुस्तकातून ऐकली.
12तो खाली राजाच्या घरात चिटणीसाच्या खोलीत गेला. तेव्हा पाहा, सर्व अधिकारी, लेखक अलीशामा, शमायाचा मुलगा दलाया, अखबोरचा मुलगा एलनाथान, शाफानाचा मुलगा गमऱ्या व हनन्याचा मुलगा सिद्कीया आणि सर्व वरिष्ठ अधिकारी तेथे बसले होते.
13तेव्हा बारूख लोकांच्या कानी पडेल असे पुस्तकातून वाचत असताना जी सर्व वचने मीखायाने ऐकली ती त्याने त्यांना कळवली.
14मग त्या सर्व अधिकाऱ्यांनी बारूखाकडे कूशीचा मुलगा शलेम्या याचा मुलगा नथन्या याचा मुलगा यहूदी याला पाठवून सांगितले की, “ज्या गुंडाळीतून तू लोकांच्या कानी पडेल असे वाचले ती तू आपल्या हाती घेऊन ये.” नेरीयाचा मुलगा बारूख ती गुंडाळी आपल्या हातात घेऊन त्यांच्याजवळ आला.
15मग ते त्यास म्हणाले, “खाली बस आणि आम्हास ऐकण्यासाठी वाचून दाखव.” म्हणून बारूखाने तो पट वाचला.
16असे झाले की, जेव्हा त्यांनी सर्व वचने ऐकली तेव्हा प्रत्येक मनुष्य भयभीत होऊन एकमेकांकडे वळले. ते बारूखाला म्हणाले, “आम्ही ही सर्व वचने खचित राजाला कळवतो.”
17मग ते बारूखाला म्हणाले, “तू यिर्मायाच्या तोंडची सर्व वचने कशी लिहीली, हे आम्हास सांग?”
18बारूख त्यांना म्हणाला, “त्याने ही सर्व वचने मला सांगितली व मी ते शाईने या पटावर लिहिली.”
19मग ते अधिकारी बारूखाला म्हणाले, “जा, तू स्वतः आणि यिर्मयासुद्धा लपून राहा. तुम्ही कोठे आहात हे कोणालाही कळू देऊ नका.”
20मग त्यांनी ती गुंडाळी अलीशामा चिटणीसाच्या खोलीत ठेवली आणि ते चौकात राजाकडे गेले व त्यांनी त्यास ही वचने कळवली.
21राजाने यहूदीला ती गुंडाळी आणण्यासाठी पाठविले. यहूदीने अलीशामा चिटणीसाच्या खोलीतून गुंडाळी घेतली. नंतर यहूदीने तो राजाला व त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या अधिकाऱ्यांना मोठ्याने वाचून दाखविला.
22आता तो नवव्या महिना होता म्हणून राजा हिवाळ्याच्या घरात बसला होता आणि त्याच्यासमोर शेगडी पेटलेली होती.
23तेव्हा असे झाले की, यहूदीने तीन चार पाने वाचल्यावर राजाने चाकूने ते कापले आणि ती सर्व गुंडाळी शेगडीतल्या विस्तवात नष्ट होऊन जाईपर्यंत त्याने त्यामध्ये फेकून दिली.
24परंतु राजाने व त्याच्या सेवकांनी ही सर्व वचने ऐकले तरी ते घाबरले नाहीत, त्यांनी आपले वस्त्रेही फाडली नाहीत.
25राजाने ती गुंडाळी जाळू नये म्हणून एलनाथान, दलाया व गमऱ्या यांनी त्यास विनंती केली, पण राजाने त्यांचे ऐकले नाही.
26यहोयाकीम राजाने लेखक बारूखाला व यिर्मया संदेष्ट्याला अटक करण्यासाठी हम्मेलेखाचा मुलगा यरहमेल व अज्रीएलाचा मुलगा सराया व अब्देलचा मुलगा शलेम्या यांना आज्ञा केली. पण त्यांना परमेश्वराने लपविले होते.
27नंतर राजाने गुंडाळी व जी वचने बारूखाने यिर्मयाच्या मुखापासून ऐकून लिहीली होती ती जाळल्यावर यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले. ते म्हणाले,
28परत जा, तू आपल्यासाठी दुसरी गुंडाळी घे आणि जी मुळची वचने पहिल्या गुंडाळीत होती, जी यहूदाचा राजा यहोयाकीम याने जाळली, ती सर्व त्यामध्ये लिही.
29मग तू यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याला सांग परमेश्वर असे म्हणतो, तू ही गुंडाळी जाळली व म्हणालास, खचित “बाबेलाचा राजा येईल आणि या देशाचा नाश करील व यातले माणसे व पशू या दोघांचाही नाश करील, असे हिच्यात तू का लिहीले आहे?”
30म्हणून, यहूदाचा राजा यहोयाकीम याच्याविषयी परमेश्वर म्हणतो, त्यास दावीदाच्या सिंहासनावर बसायला कोणी राहणार नाही. तर त्याचे प्रेत दिवसातल्या उन्हात आणि रात्रीतल्या थंडीत बाहेर टाकण्यात येईल.
31कारण मी त्याला, त्याच्या वंशजाला व त्याच्या सेवकांना त्यांच्या अन्यायामुळे मी शिक्षा करीन आणि जे सर्व अरिष्ट मी त्यांच्यावर व यरूशलेमेमध्ये राहणाऱ्यांवर व यहूदाच्या प्रत्येक व्यक्तीवर आणीन.
32मग यिर्मयाने दुसरी गुंडाळी घेतली व ती नेरीयाचा मुलगा बारूख लेखकाला दिली. आणि जी गुंडाळी यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याने अग्नीत जाळली होती तिच्यातील सर्व वचने त्याने यिर्मयाच्या तोंडून ऐकून तिच्यात लिहीली. आणखी त्यामध्ये तशाच दुसऱ्या पुष्कळ वचनांची भर घातली.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.