इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

यिर्मया 17

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1“यहूदाचे पाप लोखंडी लेखणीने व हिऱ्याच्या टोकाने लिहिलेले आहे. ते त्यांच्या हृदयाच्या पाटीवर आणि वेदीच्या शिंगांवर कोरले आहेत.
2त्यांचे लोक उंच डोंगरावरील हिरव्या झाडाजवळील त्यांच्या वेद्या आणि अशेराचे खांब आठवण करतात.
3विस्तीर्ण प्रदेशातील डोंगरावरील त्यांच्या वेद्या ते आठवतात. मी तुझी संपत्ती आणि विपुलता दुसऱ्यास लूट अशी वाटून देणार. कारण तुझी पातके तुझ्या सर्व सिमांत सरळीकडे आहेत.
4मी दिलेला वारसा तू गमावशील. मी तुमच्या शत्रूंना तुम्हास गुलाम म्हणून अज्ञान भूमीत देईन. कारण माझ्या क्रोधात तू अग्नी पेटवला आहे, जो सर्वकाळ जळत राहीन.”
5परमेश्वर असे म्हणतो, “जो मानवजातीवर विश्वास ठेवतो, जो आपल्या देहाला आपले सामर्थ्य करतो पण त्याचे हृदय परमेश्वरापासून दूर आहे, तो शापित असो.
6कारण तो वाळवंटातील झुडुपाप्रमाणे आहे आणि चांगले येईल ते तो पाहणार नाही. तो निर्जन, कोरड्या व बरड जमिनीवर व रहिवासी नसलेल्या जागी वस्ती करीन.
7परंतु जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तो आशीर्वादीत आहे, कारण परमेश्वर त्याचा विश्वास आहे.
8तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या वृक्षाप्रमाणे तो होईल, ज्याची मुळे प्रवाहाजवळ पसरते, तो हे पाहत नाही की उन्हाची झळ येत आहे, कारण त्याची पाने हिरवीगार राहतात. मग दुष्काळाच्या वर्षाच्या काळात तो चिंताग्रस्त होणार नाही, किंवा तो फळ देण्याचे थांबवणार नाही.”
9हृदय इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त कपटी आहे, ते आजारी आहे, कोण त्यास समजू शकणार?
10मी प्रत्येक मनुष्यास त्याच्या लायकीप्रमाणे, त्याच्या कर्माच्या फळाप्रमाणे ताडना करण्यास, मी परमेश्वर, मनाचा शोध घेतो, मी हृदय पारखतो.
11अन्यायाने जो श्रीमंत होतो, तो जशी तितर जी अंजी घालत नाहीत त्यावर बसते तसा आहे. पण त्याच्या आयुष्याच्या मध्यांनात, ती संपत्ती त्यास सोडील. तो शेवटी एक मूर्ख असेल.
12आमच्या मंदिराचे ठिकाण एक गौरवशाली राजासन, जे सुरुवातीपासून भारदस्त आहे.
13परमेश्वरा, तू इस्राएलचे आशास्थान आहेस. तू पाण्याच्या जिवंत झऱ्याप्रमाणे आहेस. जो या भूमीवर परमेश्वरा पासून फिरेल, त्यास छेदले जाईल. कारण त्यांनी परमेश्वरास जो जिवंत पाण्याचा झरा आहे, त्यास सोडले आहे.
14परमेश्वरा, तू मला बरे कर, आणि मी पूर्ण, बरा होईन. तू मला तार, म्हणजे मी तरेन. कारण तुच माझे स्तुतीचे गीत आहेस.
15पाहा, ते मला विचारत आहे, “परमेश्वराचे वचन कोठे आहे? ते आता येवो.”
16मी तर तुझ्यामागे चालून मेंढपाळ होण्यापासून मागे हटलो नाही, तो भयंकर दिवस उजाडावा अशी माझी इच्छाही नव्हती. हे तू जाणतोस, जे माझ्या ओठातून निघाले ते तुझ्यासमोर आहे.
17तू मला भयावह असे होऊ नकोस. संकटाच्या दिवशी तू माझा आश्रय आहेस.
18माझा पाठलाग करणारे लाजवले जावो, परंतू मी न लाजवला जावो. ते निराश केले जावोत, परंतू मी निराश न केला जावो. अरिष्टाचा दिवस त्यांच्याविरुद्ध पाठव आणि दुप्पट नाशाने त्यांना विखरुन टाक.
19परमेश्वराने मला असे म्हटले: “यहूदाचे राजे यरूशलेमेच्या ज्या प्रवेशद्वारातून ये-जा करतात, त्या द्वारात जाऊन उभा राहा आणि लोकांस सांग. मग यरूशलेमेच्या इतर प्रवेशद्वारापाशी जाऊन हेच कर.
20त्यांना सांग, यहूदाच्या राजांनो आणि सर्व यहूदा लोकांनो व यरूशलेमेच्या प्रवेशद्वारांतून प्रवेश करणाऱ्या सर्व राहणाऱ्यांनो, परमेश्वराचे वचन ऐका.
21परमेश्वर असे म्हणतो: तुम्ही आपला जीव जपा आणि शब्बाथाच्या दिवशी तुम्ही यरूशलेमेच्या प्रवेशद्वारातून ओझी वाहून आणू नका.
22आणि शब्बाथाच्या दिवशी तुम्ही आपल्या घरातून काही भार बाहेर आणू नका व काही उद्योगही करु नका, तुमच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञेप्रमाणे शब्बाथाचा दिवस पवित्र पाळा.
23पण त्यांनी तो पाळला नाही आणि लक्ष दिले नाही. परंतू ते आपल्या मानेत ताठर झाले, म्हणून ते ऐकेणात आणि शिक्षण आत्मसात करेनात.
24असे होईल की, जर तुम्ही खचित माझे ऐकाल आणि शब्बाथाच्या दिवस पवित्र पाळण्यासाठी, यरूशलेमेच्या प्रदेशद्वारातून तुम्ही ओझी आणली नाहीत आणि त्या दिवशी काम नाही केले, परमेश्वर असे म्हणतो.
25तर या नगराच्या दारातून दावीदाच्या सिंहासनावर बसणारे राजे आणि सरदार, रथांमधे व घोड्यावर बसून आत जातील, ते व त्यांचे सरदार, यहूदा आणि यरूशलेमेत राहणारे, आत जातील, आणि हे नगर सर्वकाळ राहीन.
26ते सर्व यहूदा आणि यरूशलेमेच्या आजूबाजूच्या सर्व प्रदेशातून, आणि बन्यामीनच्या देशातून आणि खालच्या भागातून, डोंगराळ प्रदेशातून आणि नेगेबमधून, होमार्पण आणि धान्यार्पण, यज्ञ व धूप आणतील आणि उपकारस्तुतीची अर्पणे घेऊन लोक परमेश्वराच्या घरास येतील.
27पण जर तुम्ही शब्बाथ दिवस पवित्र पाळण्यासाठी माझे ऐकले नाही, जर तुम्ही शब्बाथाच्या दिवशी यरूशलेमेच्या दारात ओझे वाहिले, तर मी दारात कधींही विझू न शकणारी आग लावीन, ही आग यरूशलेमचे राजवाडे खाऊन टाकील आणि ती विझवली जाणार नाही.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.