इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

यिर्मया 13

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1परमेश्वर मला असे म्हणाला: “जा आणि तागाचा कमरबंद विकत घे आणि तो आपल्या कमरेस बांध, पण पहिल्याने तो पाण्यात घालू नको.”
2तेव्हा मी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे नेसावयास विकत घेतले व ते माझ्या कमरेस बांधले.
3नंतर परमेश्वराकडून मला दुसऱ्यांदा वचन प्राप्त झाले ते असे,
4“तू नेसावयास विकत घेतलेले, जे तुझ्या कमरेस बांधले आहे, उठ आणि फरात नदी कडे जा आणि तिथे ते खडकाला पडलेल्या खाचेत लपवून ठेव.”
5त्याप्रमाणे मी फरातला गेलो आणि अगदी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे ते लपवून ठेवले.
6पुष्कळ दिवसानी, परमेश्वर मला म्हणाला, “उठ आणि फरातला जा व लपवून ठेवायला सांगितलेला कमरबंध परत घे.”
7त्याप्रमाणे मी फरातला गेलो आणि जो कमरबंध मी लपवला होता तो उकरुन काढला. पण पाहा! आता तो कमरबंद नष्ट झाला होता, तो अगदी निरुपयोगी झाला.
8तेव्हा परमेश्वराचे वचन मजकडे पुन्हा आले व म्हणाले.
9परमेश्वर असे म्हणतो, “याचप्रकारे मी यहूदाचा आणि यरूशलेमेचा अहंकारी नष्ट करीन.
10हे दुष्ट लोक जे माझे वचन ऐकण्यास नकार देतात, जे त्यांच्या हृदयाच्या कठोरपणात चालतात, जे दुसऱ्या देवाच्या मागे त्याची उपासना करण्यास आणि त्यांच्या समोर नमन करण्यास जातात, ते या कमरबंधाप्रमाणे होतील, ज्याचा काहीच उपयोग नाही.
11कारण जसा कमरबंध मनुष्याच्या कमरेभोवती लपेटलेला असतो, त्याप्रमाणे मी यहूदाची आणि इस्राएलची कुटुंबे, ते लोक माझे व्हावे, मला कीर्ती, प्रशंसा आणि मान मिळवून द्यावा म्हणून मी त्यांना आपणास लपेटलेले आहे. पण ते माझे ऐकावयाचे नाही.” परमेश्वर असे म्हणतो.
12“यास्तव तू हे वचन त्याना बोललेच पाहिजे, परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो, ‘प्रत्येक बुधला द्राक्षरसाने भरेल.’ तेव्हा ते तुला म्हणतील प्रत्येक बुधला द्राक्षरसाने भरेल हे आम्हांला माहीत नाही काय?
13मग तू त्यांना सांग, ‘परमेश्वर असे म्हणतो, पाहा! या देशात राहणारे, दावीदाच्या सिंहासनावर बसलेले राजे, याजक, संदेष्टे आणि यरूशलेममध्ये सर्व राहणारे यांना मी मद्याच्या धुंदीने भरीन.
14मग मी त्यांना एकमेकांवर आदळीन, पिता पुत्र एकमेकांवर आदळतील, मी त्यांचा नाश करू नये असा त्यांचा कळवळा मी करणार नाही, किंवा त्यांना सोडणार नाही, किंवा त्यांच्यावर दया करणार नाही. असे परमेश्वर म्हणतो.
15ऐका आणि लक्ष द्या, गर्विष्ठ बनू नका, कारण परमेश्वर तुमच्याशी बोलला आहे.
16त्याने अंधकार पसरविण्याच्या आधी, आणि अंधकारमय पर्वतावर तो तुमचे पाय डळमळण्याचे कारण बनण्याआधी, आणि तुम्ही प्रकाशाची प्रतीक्षा करतांना तो त्याची मृत्यूछाया करील व त्याचा निबीड अंधार करून ठेवील त्याच्या आधी, परमेश्वर, तुमचा देव याला मान द्या.
17म्हणून जर तुम्ही ऐकणार नसाल, तर मी तुमच्या अहंकारामुळे शोकाकुल होईन. माझे डोळे खात्रीने अश्रू गाळतील आणि आसवे वाहवील. कारण परमेश्वराचा कळप बंदिस्त केला आहे.
18राजाला आणि राणीच्या आईला सांग, स्वत:ला नम्र करा आणि खाली बसा, कारण तुमचा मुकुट, म्हणजे तुमचे गौरव आणि गर्व, खाली पडले आहे.
19नेगेबमधील शहरे बंद केली गेली आहेत, ती उघडायला कोणी नाही. यहूदाला बंदिस्त केले आहे, तिच्यातील सर्व हद्दपार करण्यात आले आहेत.
20आपले डोळे वर लाव आणि जो उत्तरेहून येत आहे त्यास पाहा. त्याने दिलेला कळप, तुला अति सुंदर असलेला कळप कोठे आहे?
21ज्यांना तू आपले मित्र होण्यास शिकवले, त्यांच्यावर देव जेव्हा तुला ठेवणार, तेव्हा तू काय करशील? जसे प्रसुतपावणाऱ्या स्त्रीला वेदना वेढतात, त्याचप्रमाणे हा तुझ्या वेदनांचा प्रारंभ नाही काय?
22तेव्हा तू कदाचित् स्वत:च्या मनास विचारशील, “माझ्या सोबतच या गोष्टी का घडतात?” हे असे आहे कारण तुझ्या अनेक पापांमुळे तुझा घागरा उठला गेला आहे आणि तुझा बलात्कार झाला आहे.
23कुशी लोक त्यांच्या कातडीचा रंग बदलू शकतील काय? किंवा चित्ता त्याच्यावरील ठिपके बदलू शकेल काय? त्याचप्रमाणे तुम्हास, जी नेहमीच वाईट करण्याची सवय आहे, ते तुम्ही चांगले करणार काय.
24यास्तव वाळवंटातील उडून जाणाऱ्या भुसकटाप्रमाणे मी त्यांचा नाश करील.
25हेच तुला माझ्याकडून देण्यात आले आहे, तुझा घोषीत केलेला वाटा, कारण तू मला विसरली आहे आणि खोट्यावर विश्वास ठेवला आहे, असे परमेश्वर म्हणतो.
26यरूशलेम, मी तुझा घागरा डोक्याकडून खेचीन. प्रत्येकजण तुला पाहील आणि तुझी बेअब्रू होईल.
27तुझी जारकर्मे आणि खिदळणे, तुझ्या व्यभिचाराची दुष्टाई ही रानांतल्या डोंगरावर मी पाहिली आहेत, हे यरूशलेमे, तुला हाय! तू स्वच्छ केली जात नाही आहे, असे किती काळ चालणार?
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.