इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

शास्ते 5

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1त्यादिवशी दबोरा आणि अबीनवामाचा पुत्र बाराक ह्यानी गाइलेले गीत:
2“इस्राएलाचे नेते पुढे चालले, लोक स्वसंतोषाने पुढे आले, म्हणून परमेश्वराचा धन्यवाद करा.
3राजानो, ऐका; अधिपतींनो लक्ष द्या, मी स्वतः परमेश्वरास गाईन; इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याची स्तोत्रे गाईन.
4हे परमेश्वरा, तू सेईराहून निघालास, अदोमाच्या प्रदेशातून कूच केलीस, तेव्हा पृथ्वी कंपायमान झाली; तसेच आकाशाने जलबिंदू गाळले; मेघांनीही जलबिंदू गाळले;
5परमेश्वरासमोर डोंगर थरथरा कापले, इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर हा सीनाय देखील थरारला.
6अनाथाचा मुलगा शमगार ह्याच्या काळी, याएलेच्या काळी राजमार्ग सुने पडले; वाटसरू आडमार्गांनी प्रवास करीत.
7मी दबोरा पुढे येईपर्यंत, इस्राएलात माता म्हणून मी प्रसिद्ध होईपर्यंत, इस्राएलात कोणी पुढारी उरले नव्हते;
8लोकांनी नवे देव निवडले तेव्हा वेशीवेशीतून संग्राम झाला; इस्राएलातील चाळीस हजारांमध्ये एकाजवळ तरी ढाल किंवा भाला दृष्टीस पडला काय?
9माझे मन इस्राएलाच्या अधिपतींकडे लागले आहे ते लोकांबरोबर स्वसंतोषाने पुढे आले; तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा.
10पांढऱ्या गाढवावर स्वारी करणाऱ्यांनो, अमूल्य गालिच्यावर बसणाऱ्यांनो, वाटेने चालणाऱ्यांनो, त्याचे गुणगान करा.
11पाणवठ्यावर पाणक्यांच्या स्वराने परमेश्वराच्या न्यायकृत्यांचे, इस्राएलावरील सत्तेसंबंधाने त्याच्या न्यायकृत्यांचे लोक वर्णन करतात त्या वेळी परमेश्वराचे प्रजाजन वेशीवर चालून गेले.
12जागी हो, जागी हो दबोरे; जागी हो, जागी हो, गीत गा; बाराका ऊठ; अबीनवामाच्या पुत्रा, तू आपल्या बंदिवानांना घेऊन जा.
13तेव्हा उरलेले सरदार खाली उतरले; परमेश्वराचे लोक माझ्याकरिता वीरांविरुद्ध सामना करावयास उतरले.
14अमालेकात ज्यांची पाळेमुळे पसरली आहेत ते एफ्राइमामधून आले; तुझ्यामागून बन्यामीन तुझ्या सैन्यात दाखल झाला; माखीराहून अधिपती व जबुलूनाहून दंडधारी अंमलदार उतरून आले.
15इस्साखाराचे सरदार दबोरेबरोबर होते; इस्साखार बाराकाशी एकनिष्ठ होता; त्याच्या पाठोपाठ ते खोऱ्यात धावले, रऊबेनाच्या पक्षामध्ये मोठी चर्चा झाली.
16खिल्लारांसाठी वाजविलेला पावा ऐकत तू मेंढवाड्यात का बसलास? रऊबेनाच्या पक्षाविषयी फार विचारविनिमय झाला.
17गिलाद यार्देनेपलीकडेच राहिला; दान हा आपल्या जहाजापाशीच का बसून राहिला? आशेर समुद्रकिनाऱ्यावर बसून राहिला, आपल्या धक्क्यावर बसून राहिला.
18जबुलून व नफताली या लोकांनी आपल्या प्रांतांतील उंचवट्यांवर मृत्यूची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घातला.
19राजे येऊन लढले, तेव्हा कनानाचे राजे मगिद्दोच्या जलप्रवाहापाशी तानख येथे लढले; त्यांना रुप्याची काहीच लूट मिळाली नाही.
20आकाशातून तारे लढले; त्यांनी आपआपल्या कक्षातून सीसराशी लढाई केली.
21किशोन नदीने, त्या पुरातन नदीने, त्या कीशोन नदीने त्यांना वाहून नेले. हे जीवा, हिंमत धरून पुढे चाल.
22तेव्हा घोडे भरधाव उधळले ते मस्त घोडे टापा आपटू लागले, त्यांच्या टापांचा आवाज झाला.
23परमेश्वराचा दूत म्हणतो, मेरोजला शाप द्या त्यातल्या रहिवाश्यांना मोठा शाप द्या; कारण परमेश्वरास साहाय्य करावयास वीरांविरुद्ध परमेश्वरास साहाय्य करावयास ते आले नाहीत.
24केनी हेबेर यांची स्त्री याएल ही सगळ्या स्त्रियांमध्ये धन्य! डेऱ्यात राहणाऱ्या सर्व स्त्रियांमध्ये ती धन्य!
25त्याने पाणी मागितले तो तिने त्यास दूध दिले; श्रीमंताना साजेल अशा वाटीत तिने त्यास दही आणून दिले.
26तिने आपला एक हात मेखेला आणि उजवा हात कारागिराच्या हातोड्याला घातला; तिने हातोड्याने सीसराला मारले, त्याचे डोके फोडून टाकले, त्याचे कानशील मेख ठोकून आरपार विंधले.
27तिच्या पायाखाली तो वाकला व पडला, निश्चल झाला; जेथे तो वाकला तेथेच तो मरून पडला.
28सीसराच्या आईने खिडकीतून बाहेर डोकावले, तिने जाळीतून हाक मारली, त्याचा रथ यावयाला एवढा उशीर का झाला? त्याच्या रथाच्या चाकांना कोणी खीळ घातली?
29तिच्या चतुर सख्यांनी तिला उत्तर दिले हो, स्वतः तिनेच आपणास उत्तर दिले;
30‘त्यांना मिळालेल्या लुटीची ते वाटणी तर करून घेत नसतील ना? प्रत्येक वीराला एक एक किंवा दोन-दोन कुमारिका; सीसरासाठी रंगीबेरंगी वस्रे, भरजरी रंगीबेरंगी वस्रे लुटीत मिळालेल्या कुमारिकांच्या गळ्यांत भुषण म्हणून पांघरण्यासाठी रंगीबेरंगी वस्रे मिळाली नसतील ना?’
31हे परमेश्वरा, तुझे सर्व शत्रू असेच नाश पावोत; पण त्याच्यावर प्रेम करणारे प्रतापाने उदय पावणाऱ्या सूर्यासमान होवोत.” मग देशाला चाळीस वर्षे विसावा मिळाला.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.