इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

शास्ते 18

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1त्या दिवसात इस्राएलावर कोणी राजा नव्हता, आणि त्या दिवसात दानाचा वंश वस्ती करण्यासाठी आपले वतन मिळवायाला पाहत होता; कारण त्या दिवसापर्यंत त्यास इस्राएलाच्या वंशांमध्ये वतनातला भाग मिळाला नव्हता.
2दानाच्या लोकांनी आपल्या सगळ्या वंशातून, सरा व अष्टावोल यांतून अनुभवी असे पाच शूर योद्धे पुरुष निवडून त्यांना देशाची टेहळणी व पाहणी करण्यासाठी पाठवले; तेव्हा त्यांनी त्यांना सांगितले, जा आणि तो देश पाहा. मग ते एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घरापर्यंत आले आणि त्यांनी रात्र तेथे घालवली.
3ते मीखाच्या घराजवळ होते, तेव्हा त्यांनी त्या तरुण लेव्याचा शब्द ओळखला; यास्तव ते तिकडे वळून त्यास बोलले, “तुला इकडे कोणी आणले? आणि तू या ठिकाणी काय करतोस? तू येथे का आहेस?”
4तो त्यांना म्हणाला, “मीखाने माझ्यासाठी जे काही केले ते असे आहे, आणि मला मोलाने नियुक्त केले आणि मी त्याचा याजक झालो आहे.”
5तेव्हा त्यांनी त्यास म्हटले, “तू कृपा करून देवाला सल्ला विचार की, आम्ही जो प्रवास करत आहोत तो सफल होईल किंवा नाही.”
6तेव्हा तो याजक त्यांना बोलला, “तुम्ही शांतीने जा; ज्या मार्गाने तुम्हाला जायचे आहे, त्यामध्ये परमेश्वर देव तुमचे मार्गदर्शन करील.”
7मग ती पाच माणसे निघाली आणि लईश येथे आली, आणि त्यांनी पाहिले की; ज्या प्रकारे सीदोनी अबाधित व सुरक्षित राहत होते; तसेच त्यामध्ये राहणारे लोक हे तेथे सुरक्षित आहेत. आणि देशात त्यांना कशा प्रकारेही त्रास देणारा किंवा त्यांच्यावर अधिकार गाजवणारा एकही जण तेथे नव्हता. ते सीदोन्यांपासून फार दूर राहत होते, आणि त्यांचे कोणाबरोबरही व्यावहारीक संबंध नव्हते.
8नंतर ते सरा व अष्टावोल तेथे आपल्या वंशाजवळ आले; तेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना विचारले, “तुमचा अहवाल काय आहे?”
9ते म्हणाले, “चला! आपण त्यांच्यावर हल्ला करू! कारण आम्ही तो देश पाहिला आणि तो फार चांगला आहे. तुम्ही काहीच करणार नाही का? तुम्ही तो देश जिंकण्यासाठी आणि त्यावर चढाई करून ताब्यात घेण्यासाठी कंटाळा करू नका.
10तुम्ही तेथे जाल, तेव्हा ‘आम्ही अगदी सुरक्षित आहोत’ असा विचार करणाऱ्या लोकांकडे जाल, तसेच त्यांचा देश विस्तीर्ण आहे. देवाने ते तुम्हाला दिले आहेत. ती जागा अशी आहे की पृथ्वीवरील कोणत्याही गोष्टीची उणीव तेथे नाही.”
11मग तेथून, म्हणजे सरा व अष्टावोल यांतून दानाच्या कुळातले सहाशे पुरुष लढाईसाठी शस्त्रे घेऊन निघाले.
12तेव्हा त्यांनी जाऊन यहूदातल्या किर्याथ-यारीम जवळ तळ दिला; यास्तव आजपर्यंत त्या ठिकाणाला महाने-दान, दानाची छावणी असे म्हणतात; ते किर्याथ-यारीमाच्या पश्चिमेस आहे.
13मग ते तेथून पुढे एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात गेले आणि मीखाच्या घरापर्यंत आले.
14तेव्हा जी पाच माणसे लईश प्रदेश हेरावयास गेली होती, त्यांनी आपल्या नातेवाईकांना असे सांगितले की, “या घरामध्ये याजकाचे एफोद व कुलदेवता, आणि कोरीव मूर्ती व ओतीव धातूची मूर्ती आहेत; हे तुम्हाला माहीत आहे काय? तर आता काय करायचे ते तुम्ही ठरवा.”
15मग त्यांनी तिकडे वळून मीखाच्या घरी त्या तरुण लेव्याच्या घरात जाऊन त्याचे क्षेमकुशल विचारले.
16नंतर दानाच्या वंशातली ती सहाशे माणसे आपल्या लढाईची शस्त्रे घेऊन प्रवेशद्वाराशी उभी राहिली.
17आणि जी पाच माणसे देश हेरायला गेली होती, त्यांनी आत शिरून, ती कोरीव मूर्त्ती, एफोद, कुलदेवता व ओतीव मूर्ती घेतली; त्या वेळी तो याजक शस्त्रसज्ज असणाऱ्या सहाशे मनुष्यांबरोबर दरवाजापुढे उभा होता.
18तर त्यांनी मीखाच्या घरात जाऊन ती कोरीव मूर्ती व ते एफोद व ते कुलदेवता व ती ओतीव धातूची मूर्ती घेतली असता, तो याजक त्यांना म्हणाला, “तुम्ही हे काय करत आहात?”
19त्यांनी त्यास म्हटले, “तू शांत राहा! आपला हात आपल्या तोंडावर ठेव व आमच्याबरोबर चल, आणि आमचा बाप व आमचा याजक हो. एका मनुष्याचा याजक होऊन राहणे बरे की एका वंशाचा, आणि इस्राएलाच्या कुळाचा याजक व्हावे हे बरे? कोणते बरे?”
20तेव्हा त्या याजकाच्या मनास आनंद झाला; यास्तव तो, ते एफोद व ते कुलदेवता व ती कोरीव मूर्ती घेऊन त्या लोकांबरोबर गेला.
21अशा रीतीने ते तेथून वळले आणि दूर गेले. लहान मुलेबाळे, गुरेढोरे व त्यांची मालमत्ता ते आपल्यापुढे घेऊन चालले.
22मीखाच्या घरापासून ते बरेच अंतर दूर गेल्यावर, ज्यांची घरे मीखाच्या घराजवळ होती, त्यांनी माणसे एकत्र बोलावली आणि ते दान वंशाच्या लोकांच्या पाठीस लागले.
23त्यांनी दान वंशाच्या लोकांस हाक मारली; तेव्हा ते मागे वळून मीखाला म्हणाले, “तुला काय झाले म्हणून तू समुदाय घेऊन आलास.”
24तो म्हणाला, “मी केलेले देव तुम्ही चोरले आणि माझ्या याजकाला तुम्ही घेऊन चालला, आणि आता मला दुसरे काही राहिले आहे काय? तर तुला काय झाले हे तुम्ही मला कसे विचारू शकता?”
25मग दान वंशाच्या लोकांनी त्यास म्हटले, “तू आपला आवाज आम्हांला ऐकू देऊ नको; नाही तर आमच्यातली फार रागीट माणसे तुझ्यावर हल्ला करतील, आणि तू व तुझ्या घराण्याला मारून टाकतील.”
26मग दानाचे लोक आपल्या मार्गाने गेले, आणि मीखाने पाहिले की आपल्यापेक्षा ते बलवान आहेत, म्हणून तो माघारी फिरून आपल्या घरी गेला.
27मीखाने ज्या मूर्ती केल्या होत्या त्या आणि त्याचा जो याजक होता, त्यास त्यांनी घेतले; मग ते लईश नगरास आले. तेथील लोक शांत व निश्चिंत होते. त्यांना तलवारीने मारले, आणि नगराला आग लावून जाळले.
28तेव्हा त्यांना कोणी सोडवणारा नव्हता, कारण ते सीदोनापासून दूर होते, आणि त्यांचा कोणाशीही व्यवहार नव्हता; ते नगर बेथ-रहोबच्या खोऱ्याजवळ होते. दानी लोकांनी तेथे पुन्हा नगर बांधले आणि ते त्यामध्ये राहिले.
29त्यांनी आपला पूर्वज दान, जो इस्राएलाचा एक पुत्र होता त्याचे नाव त्या नगराला दिले, परंतु पहिल्याने त्या नगराचे नाव लईश होते.
30नंतर दानाच्या लोकांनी आपल्यासाठी ती कोरीव मूर्ती केली; आणि मनश्शेचा पुत्र गेर्षोम याचा वंशज योनाथान तो व त्याची मुले, देश बंदिवासात जाईपर्यंत दानाच्या वंशाचे याजक होते.
31देवाचे मंदिर शिलोमध्ये होते, तोपर्यंत त्यांनी आपल्यासाठी मीखाची कोरीव मूर्ती जी त्याने केली होती तिची उपासना केली.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.