इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

शास्ते 1

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1यहोशवाच्या मृत्यूनंतर, इस्राएल लोकांनी परमेश्वरास असे म्हणून विचारले, “कनानी लोकांशी लढावयास आम्ही जाऊ तेव्हा आमच्या वतीने पहिल्याने कोणी स्वारी करावी?”
2परमेश्वर म्हणाला, “यहूदा तुमचे नेतृत्व करील; पाहा, हा देश मी त्याच्या हाती दिला आहे.”
3यहूदाच्या लोकांनी आपले भाऊ, “शिमोन याच्या लोकांस म्हटले, आमच्याबरोबर आमच्या प्रदेशात वर या, म्हणजे आपण एकत्र मिळून कनान्यांविरुद्ध लढाई करू, त्याप्रमाणे तुमच्या प्रदेशात आम्हीही तुम्हामध्ये येऊ;” तेव्हा शिमोनाचा वंश त्यांच्याबरोबर गेला.
4मग यहूदाचे लोक वर चढून गेले, या प्रकारे परमेश्वराने कनानी व परिज्जी ह्यांच्यावर त्यांना विजय दिला व त्यांनी बेजेक शहर येथे त्यांच्या दहा हजार लोकांस ठार मारले.
5बेजेक येथे त्यांना अदोनी-बेजेक सापडला आणि तेव्हा त्यांनी त्याच्याशी लढाई केली व कनानी व परिज्जी यांचा पराभव केला.
6पण अदोनी-बेजेक पळून गेला, तेव्हा त्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यास पकडले आणि त्यांच्या हातांचे व पायांचे अंगठे कापून टाकले.
7तेव्हा अदोनी-बेजेक म्हणाला, “हातांचे व पायांचे अंगठे कापून टाकलेले सत्तर राजे माझ्या मेजाखाली अन्न वेचीत होते; जसे मी केले तसे देवाने माझे केले आहे.” त्यांनी त्यास यरूशलेमेस आणले; तेथे तो मेला.
8यहूदाच्या लोकांनी यरूशलेम नगराविरुद्ध लढाई करून ते घेतले, आणि तलवारीच्या धारेने त्यावर हल्ला करून त्या नगराला आग लावली.
9नंतर यहूदाचे लोक डोंगराळ प्रदेश, नेगेब आणि पश्चिमेकडील तळवटीच्या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या कनान्यांशी लढावयाला खाली गेले.
10मग हेब्रोनात राहणाऱ्या कनान्यांविरुद्ध यहूदा पुढे चालून गेला. (हेब्रोनाचे पूर्वीचे नाव किर्याथ-आर्बा होते) आणि त्यांनी शेशय, अहीमान व तलमय यांचा पराभव केला.
11तेथून यहूदाचे लोक दबीरच्या रहिवाश्यांवर पुढे चालून गेले. (दबीरचे पूर्वीचे नाव किर्याथ-सेफर होते)
12कालेब म्हणाला, “जो कोणी लढून किर्याथ-सेफर काबीज करील त्यास मी आपली मुलगी अखसा पत्नी म्हणून देईन.”
13तेव्हा कालेबाचा धाकटा भाऊ कनाज अथनिएल ह्याचा मुलगा ह्याने दबीर नगर काबीज केले आणि म्हणून कालेबाने आपली मुलगी अखसा त्यास पत्नी करून दिली.
14ती आली तेव्हा आपल्या पित्यापासून काही शेतजमीन मागून घेण्यासाठी तिने त्यास गळ घातली. ती गाढवावरून उतरली तेव्हा कालेबाने तिला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करू शकतो?”
15ती त्यास म्हणाली, “मला आशीर्वाद द्या; तुम्ही मला नेगेब प्रदेशात स्थायिक केले आहे तेव्हा मला पाण्याचे झरेही द्या” आणि कालेबाने तिला वरचे व खालचे झरे दिले.
16मोशेचा मेहुणा जो केनी त्यांचे वंशज यहूदाच्या लोकांबरोबर खजुरीच्या नगराहून अरादाजवळील यहूदातले (जे नेगेबात आहे) रान आहे तेथे चढून गेले; आणि तेथे जाऊन यहूदा लोक अराद जवळ त्या लोकांबरोबर राहिले.
17आणि यहूदाची माणसे त्यांचा भाऊ शिमोन ह्याच्या मनुष्यांबरोबर गेली आणि त्यांनी सफाथ येथे राहणारे कनानी यांच्यावर हल्ला करून त्यांचा पूर्णपणे नाश केला; त्या नगराचे नाव हर्मा असे म्हटले होते.
18यहूदाच्या लोकांनी गज्जा व त्याच्या सभोवतालची जमीन, अष्कलोन व त्याच्या सभोवतालची जागा आणि एक्रोन व त्याच्या सभोवतालची जागा ही नगरे घेतली.
19यहूदाच्या लोकांबरोबर परमेश्वर होता आणि त्यांनी डोंगराळ प्रदेश ताब्यात घेतला, पण खोऱ्यात राहणाऱ्या लोकांजवळ लोखंडी रथ असल्याने त्यांना घालवून देणे त्यांना जमेना.
20मोशेच्या सांगण्याप्रमाणे हेब्रोन कालेबाला देण्यात आले व त्याने तेथून अनाकाच्या तिघा मुलांना घालवून दिले.
21पण बन्यामिनाच्या लोकांनी यरूशलेमेत राहणाऱ्या यबूसी लोकांस बाहेर घालवले नाही, म्हणून आजपर्यंत यबूसी लोक यरूशलेमेत बन्यामिनाच्या लोकांबरोबर राहत आहेत.
22योसेफाच्या घराण्यानेही बेथेलावर हल्ला करण्याची तयारी केली; आणि परमेश्वर त्यांच्याबरोबर होता.
23योसेफाच्या घराण्याने हेरगिरी करण्यास बेथेल येथे माणसे पाठवली. त्या नगराचे पूर्वीचे नाव लूज होते.
24त्या हेरांनी नगरातून एक मनुष्य बाहेर निघताना पाहिला; आणि त्यांनी त्यास म्हटले, “नगरात कसे जायचे ते आम्हांला दाखव म्हणजे आम्ही तुझ्यावर दया करू.”
25तेव्हा त्याने त्यांना नगरात जाण्याचा मार्ग दाखवला आणि त्यांनी त्या नगरावर तलवार चालवली, पण त्या मनुष्यास व त्याच्या सर्व परिवाराला त्यांनी सुखरूप जाऊ दिले.
26त्या मनुष्याने हित्ती लोकांच्या देशात जाऊन एक नगर बांधले व त्याचे नाव लूज ठेवले. त्याचे नाव आजपर्यंत तेच आहे.
27मनश्शेच्या लोकांनी बेथ-शान व त्याची खेडी, तानख व त्याची खेडी, दोर व त्याच्या खेड्यात राहणाऱ्यांना, इब्लाम व त्याची खेडी यामध्ये राहणाऱ्यांना आणि मगिद्दो व त्याची खेडी यामध्ये राहणाऱ्यांना बाहेर घालवून दिले नाही. कारण त्या कनान्यांनी त्या प्रदेशात राहण्याचा निश्चय केला.
28जेव्हा इस्राएल लोक सामर्थ्यवान झाले तेव्हा त्यांनी कनानी लोकांस कठोर परिश्रमाचे काम करायला लावले; पण त्यांना कधीच पूर्णपणे घालवून दिले नाही.
29एफ्राइमने गेजेर येथे राहणाऱ्या कनान्यांना घालवून दिले नाही, ते कनानी गेजेर येथे त्यांच्यामध्येच राहिले.
30जबुलूनाने कित्रोन व नहलोल येथील रहिवाश्यांना घालवून दिले नाही; पण जबुलूनाने कनान्यांवर बळजबरी करून कठोर परिश्रमाच्या कामास नेमले.
31आशेराने अक्को यातले राहणारे आणि सीदोन व अहलाब व अकजीब व हेल्बा, अफीक व रहोब येथील रहिवाश्यांना घालवून दिले नाही;
32म्हणून आशेराचे वंशज त्या देशाच्या कनानी रहिवाश्यांमध्ये राहिले; कारण त्यांनी त्यांना घालवून दिले नाही.
33नफतालीच्या वंशजांनी बेथ-शेमेश व बेथ-अनाथ येथील रहिवाश्यांना घालवून दिले नाही; नफताली त्या देशाच्या कनानी रहिवाश्यांमध्ये राहिले; पण बेथ-शेमेश व बेथ-अनाथ येथील रहिवासी नफताली लोकांची कठीण कष्टाची कामे करू लागले.
34अमोरी लोकांनी दानाच्या वंशजांना डोंगराळ प्रदेशात राहण्यास भाग पाडले. ते त्यांना खाली मैदानात उतरू देईनात;
35अमोऱ्यांनी हेरेस डोंगरावर अयालोन व शालबीम येथे राहण्याचा निश्चय केला; पण योसेफाचे घराणे प्रबळ झाल्यावर त्यांनी त्यांना जिंकले आणि कठीण कष्टाचे काम करण्यास त्यांना भाग पाडले.
36अमोऱ्यांची सीमा अक्रब्बीमाचा चढावापसून आणि सेला येथून डोंगराळ प्रदेशावर गेली होती.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.