इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

यशया 60

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1“उठ, प्रकाशमान हो, कारण तुझा प्रकाश आला आहे, आणि परमेश्वराचे तेज तुझ्यावर उगवले आहे.”
2जरी अंधार पृथ्वीला आणि निबीड काळोख लोकांस झाकेल, तरी परमेश्वर तुझ्यावर उदय पावेल आणि, त्याचे तेज तुझ्यावर येईल.
3राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, आणि राजे तुझ्या उगवत्या तेजस्वी प्रकाशाकडे येतील.
4तुझ्या सभोवती पाहा! ते सर्व एकत्र जमतात आणि तुझ्याकडे येतात. तुझी मुले दूरुन येतील आणि तुझ्या मुलींना कडेवर बसून आणतील.
5तेव्हा तू हे पाहशील आणि आनंदाने उल्हासीत होशील, आणि तुझे हृदय हर्षाने भरून वाहेल. कारण समुद्रातील भरपूर संपत्ती तुझ्यापुढे ओतली जाईल, राष्ट्रांचे सर्व धन तुझ्याकडे येईल.
6मिद्यान आणि एफा येथील उंटाचे कळप तुला झाकतील, शेबातले सर्व येतील, ते सोने आणि धूप आणतील आणि परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गातील.
7केदारमधील सर्व मेंढ्या गोळा करून तुझ्याकडे एकत्र केल्या जातील. नबायोथचे मेंढे तुझी सेवा करतील. ते माझ्या वेदीवर स्विकार्य असे अर्पण होतील, आणि मी माझ्या तेजस्वी घराला आणखी गौरवीत करीन.
8हे कोण आहेत जे मेघाप्रमाणे उडतात, आणि कबुतराप्रमाणे आपल्या आश्रयस्थानाकडे उडत येतात?
9द्वीपे माझी वाट पाहतात, आणि परमेश्वर तुझा देव याच्या नावासाठी, आणि इस्राएलाच्या पवित्रासाठी तुझ्या मुलांना आपले सोने व रुपे यांसहीत दुरुन आणावे, म्हणून पहिल्याने तार्शीशाची जहाजे वाट पाहतील, कारण त्याने तुला शोभविले आहे.
10विदेश्यांची मुले तुझ्या भींती पुन्हा बांधतील, आणि त्यांचे राजे तुझी सेवा करतील. “जरी रागात मी तुला शिक्षा केली, परंतु आता माझ्या प्रसन्नतेने मी तुझ्यावर दया केली आहे.”
11तुझे दरवाजे सदोदित उघडे राहतील, दिवस असो किंवा रात्र ते कधीही बंद होणार नाहीत. ह्यासाठी की राष्ट्रे व त्यांची संपत्ती आणि कैद केलेले राजे तुझ्याकडे आणावे.
12खचित, जे राष्ट्र व राज्य तुझी सेवा करतील नाही त्याचा नाश होईल, ती राष्ट्रे पुर्णपणे विनाश पावतील.
13माझ्या पवित्र जागेला सुंदर करायला लबानोनाचे वैभव म्हणजे सरू, देवदारू आणि भद्रदारू हे तुझ्याकडे येतील, आणि मी माझे पायाचे स्थान गौरवशाली करील.
14ज्यांनी तुला दुखावले, तेच आता तुझ्यापुढे नमतील, ते तुझ्या पायावर झुकतील. ते तुला परमेश्वराचे नगर म्हणतील, इस्राएलाच्या पवित्राचे सियोन म्हणून संबोधतील.
15“तू टाकलेली आणि तिरस्कारयुक्त होतीस, तुझ्यातून कोणीही जात नसे, मी तुला चिरकालासाठी गौरवाची एक गोष्ट करीन, एका पिढी पासून दुसऱ्या पिढीपर्यंतचा आनंद असे करीन.”
16तू राष्ट्रांचे दुध पिणार आणि राजांचे स्तन चोखणार, मग तुला समजेल की परमेश्वर तुझा देव, तुला सोडवणारा आणि तारणारा, याकोबाचे सामर्थ्य आहे.
17“मी पितळेच्या ऐवजी सोने आणि लोखंडाच्या ठिकाणी चांदी आणीन, आणि लाकडाच्या ऐवजी, पितळे व दगडांच्या ऐवजी लोखंड आणील. तुझे अधिकारी शांती व तुझे कर घेणारे न्याय असे मी करीन.”
18तुझ्या भूमीत पुन्हा कधीही हिंसेची वार्ता आणि नासधूस किंवा उजाडी ऐकू येणार नाही, परंतु तू तुझ्या वेशीला तारण आणि तुझ्या दरवाजांना स्तुती म्हणशील.
19“दिवसा सुर्य तुझा प्रकाश असणार नाही, आणि चंद्राचा उजेडही तुझ्यावर चमकणार नाही. पण परमेश्वर तुझा अक्षय प्रकाश होईल, आणि तुझा देवच तुझे वैभव असणार.”
20“तुझा ‘सूर्य’ कधी मावळणार नाही आणि ‘चंद्राचा’ क्षय होणार नाही. कारण परमेश्वर तुझा अक्षय प्रकाश असेल, आणि तुझ्या शोकाचे दिवस संपतील.”
21“तुझे सर्व लोक नितीमान असतील, आणि माझा महिमा व्हावा म्हणून मी लावलेले रोप, माझ्या हाताचे कृत्य असे ते सर्वकाळपर्यंत भूमी वतन करून घेतील.”
22“जो लहान तो हजार होईल, आणि जो धाकटा तो बलवान राष्ट्र होईल. मी, परमेश्वर, त्या समयी हे लवकर घडवून आणणार.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.