इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

यशया 58

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1गळा काढून रड, दम धरू नको, रणशिंगाप्रमाणे तुझा आवाज मोठा कर. माझ्या लोकांनी केलेल्या चुका त्यांना सांग आणि याकोबाच्या घराण्यास त्यांची पापे दाखव.
2तरी ते मला रोज शोधतात आणि माझे ज्ञानाचे मार्ग जाणून घ्यायला त्यांना आनंद होतो. अशा राष्ट्राप्रमाणे ज्याने देवाच्या आज्ञांचे पालन करण्याचे सोडले नाही आणि न्यायीपणाचा सराव केला. ते धार्मिकतेने न्याय करण्यास मला विचारतात, परमेश्वराकडे जाणे त्यांना आवडते.
3ते म्हणतात, “आम्ही का उपास केला, पण ते तू पाहिले नाहीस? आम्ही का आपणाला नम्र केले, तू त्याची दखल घेतली नाहीस?” पाहा! “उपासाच्या दिवशी तुम्ही तुमच्याच गोष्टींमध्ये आनंद पावता आणि तुमच्या सर्व कामकऱ्यांना छळता.”
4पाहा! तुम्ही विवाद व भांडण यासाठी आणि तुमच्या दुष्टतेच्या हातांनी मारण्यासाठी तुम्ही उपास करता. तुमचा आवाज उच्चस्थानी ऐकू जावा, म्हणून तुम्ही आजच्याप्रमाणे उपवास करणार नाही.
5या अशाप्रकारचा उपास मला हवा आहे काय, ज्यात मनुष्याच्या जीवास पीडा व्हावी? आपले डोके लव्हाळ्यासारखे खाली लववणे आणि आपल्या खाली गोणताट व राख पसरवणे, तू खरच याला उपास म्हणतोस, तो दिवस जो परमेश्वरास आनंदीत करेल?
6“या प्रकारचा उपवास मी निवडलेला नाही, दुष्टतेच्या बेड्या तोडणे, जोखडाचे बंद सोडणे व पीडितांना मोकळे करणे व तुम्ही प्रत्येक जोखड मोडावे हाच मी निवडलेला उपास नाही काय?
7भुकेलेल्यांना तुम्ही आपल्या घासातील घास द्यावा, बेघरांना तुमच्या घरात आसरा द्यावा, हे असे नाही काय? जेव्हा तू कोणी उघडा पाहतोस तर त्यास कपडे द्यावे, आणि आपणाला स्वतः:च्या नातेवाईकांपासून लपवून ठेवू नये.”
8तू असे करशील तेव्हा पहाटेच्या प्रकाशाप्रमाणे तुझा प्रकाश उगवेल, आणि तुझे आरोग्य लवकर उजळेल. तुझा चांगुलपणा तुझ्यापुढे चालेल आणि परमेश्वराचे गौरव तुझा पाठीराखा होईल.
9तेव्हा तू परमेश्वरास हाक मारशील आणि परमेश्वर उत्तर देईल. तू त्याची आरोळी करशील आणि तो म्हणेल, मी इथे आहे. जर तू आपल्या मधून जोखड, बोट दाखवने, दुष्टपणाचे भाषण काढून टाकशील.
10जर तू भुकेल्यांना मदत केली आणि दुःखी लोकांची गरज पूर्ण केली, तेव्हा तुझा प्रकाश अंधकारात चमकून उठेल, आणि तुझा अंधकार मध्यान्हीच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे तळपेल.
11तेव्हा परमेश्वर तुला सतत मार्गदर्शन करेल, आणि ओसाड प्रदेशात तो तुझ्या आत्म्याला तृप्त करील, आणि तुमची हाडे मजबूत करील. भरपूर पाणी मिळणाऱ्या बागेप्रमाणे तुम्ही व्हाल. आणि ज्या झऱ्याचे पाणी कधी आटत नाही, अशा सतत वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे तुम्ही व्हाल.
12तुझ्यापैकी काही प्राचीन अवशेषांची पुनःबांधणी करतील; तू पुष्कळ नाश झालेल्या पिढ्या उभारशील. तुला “भींती दुरुस्त करणारा आणि राहण्यासाठी रस्ते नीट करणारा असे म्हणतील.”
13माझ्या पवित्र दिवशी तू आपला स्वत:चा आनंद पूर्ण करू नये म्हणून शब्बाथापासून आपला पाय फिरवशील आणि शब्बाथाला आनंद, परमेश्वराचा पवित्र दिवस, आदराचा दिवस म्हणशील, आणि आपले स्वत:चे कामकाज न करता व आपल्याच मनाचा आनंद न पाहता आणि आपल्याच गोष्टी न बोलता, तू त्याचा आदर करशील.
14तर तू परमेश्वराच्या समक्ष आनंद पावशील, आणि मी तुला पृथ्वीच्या उच्च ठिकाणी चालवेन; आणि तुमचे वडील याकोब यांच्या मालकीच्या सर्व गोष्टी तो तुम्हास देईल, कारण परमेश्वराचे मुख हे बोलले आहे.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.