इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

यशया 45

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1परमेश्वर आपला अभिषिक्त कोरेशाला म्हणतो, ज्याच्यापुढे राष्ट्रे जिंकायला त्याचा उजवा हात मी धरला आहे, आणि ज्याच्यापुढे दरवाजे उघडायला मी राजास निशस्त्र करीन, म्हणून वेशी उघड्या राहतील.
2मी तुझ्यापुढे चालेन आणि पर्वत सपाट करीन; मी पितळी दरवाजाचे तोडून तुकडे तुकडे करीन आणि त्यांच्या लोखंडी सळ्यांचे कापून तुकडे तुकडे करीन
3आणि मी तुला अंधारातील संपत्ती व दूर लपविलेली धन देईन. अशासाठी की, मी जो तुला तुझ्या नावाने हाक मारतो तो इस्राएलाचा देव मी परमेश्वर आहे, हे तुला कळावे.
4कारण माझा सेवक याकोबासाठी, आणि माझा निवडलेला इस्राएल ह्याच्यासाठी, मी तुला नावाने हाक मारली आहे. तू मला ओळखत नव्हतास, तरी मी तुला उपनाव दिले.
5मी परमेश्वर आहे आणि मीच फक्त देव आहे दुसरा कोणीही नाही. जरीही तू मला ओळखत नव्हतास, तरीही तुला युद्धास सशस्त्र केले.
6अशासाठी की, सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत लोकांनी जाणावे की माझ्यावाचून कोणी देव नाही. मी परमेश्वर आहे, आणि दुसरा कोणीही नाही.
7मी प्रकाश बनविला आणि अंधाराला अस्तित्वात आणले; मी शांती आणतो आणि अनर्थ उत्पन्न करतो; मी परमेश्वर आहे, जो ह्यासर्व गोष्टी करतो.
8हे आकाशा, वरून खाली पाऊस पाड! ढग सात्विक तारणाचा पाऊस खाली पाडो. पृथ्वी ते शोषून घेवो, त्या तारणास अंकुर फुटोत आणि त्याचबरोबर धार्मिकता एकत्रित वाढो. मी परमेश्वराने त्या दोघांना निर्मिले आहे.
9जो कोणी आपल्या निर्मात्याशी वाद घालतो त्यास हायहाय! मातीच्या खापरांमध्ये एक खापर असा तो आहे. तू काय करतोस, असे चिखल आपल्या घडणाविऱ्याला म्हणेल काय? किंवा तुला हात नाहीत काय जेव्हा तू हे करतो?
10जो आपल्या पित्याला म्हणतो, तू काय जन्म देतोस? किंवा स्त्रीस म्हणतो, तू काय जन्म देतेस? त्यास हायहाय! असो.
11इस्राएलाचा पवित्र प्रभू, तिचा निर्माणकर्ता परमेश्वर असे म्हणत आहे, येणाऱ्या गोष्टीविषयी मला कोण विचारणार, तुम्ही माझ्या मुलांविषयी प्रश्न कराल का? तुझ्या हातच्या कामाबद्दल काय करायचे ते मला सांग?
12मी पृथ्वी केली व तिच्यावर माणसे निर्माण केली. मी माझ्या हाताने आकाश पसरीले, आणि मी सर्व ताऱ्यांना दिसण्याची आज्ञा दिली.
13मीच न्यायीपणाने कोरेशाची उठावणी केली आहे आणि मी त्याचे सगळे मार्ग सपाट करील. तो माझे नगर बांधील; आणि काही मोल किंवा मोबदला न घेता माझ्या बंदिवान झालेल्या लोकांस घरी जाण्यास सोडून देईल. असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
14परमेश्वर असे म्हणतो, मिसराची मिळकत आणि कूशाचा माल, सवाई लोक, जे उंच बांध्याचे मनुष्ये आहेत, ही तुजजवळ आणली जातील. ते तुझे होतील. ते तुझ्यामागे साखळ्यांनी बांधलेले येतील. ते तुझ्या पाया पडून तुझ्याजवळ विनंतीकरून म्हणतील, खात्रीने देव तुझ्याबरोबर आहे, आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही
15हे इस्राएलाच्या देवा, तारणाऱ्या, खरोखर तू जो स्वतःला लपविणारा आहेस.
16ते सर्व एकंदरीत लज्जित व फजित होतील; ज्यांनी ओतीव मूर्ती घडविल्या आहेत ते अपमानीत होऊन चालतील.
17पण परमेश्वराकडून इस्राएल सर्वकाळच्या तारणाने तारला जाईल; तुम्ही पुन्हा कधीही लज्जित किंवा अपमानीत होणार नाही.
18आकाशाचा निर्माणकर्ता, तोच सत्य देव, ज्याने पृथ्वी निर्माण केली व घडवली, तिची स्थापना केली. ती त्याने उजाड अशी निर्मिली नाही, ज्याने ती वस्ती करण्यासाठी निर्माण केली, तो परमेश्वर असे म्हणतो, “मीच परमेश्वर आहे व दुसरा कोणी नाही.”
19मी एकटेपणात, गुप्त जागी कधी बोललो नाही; तुम्ही व्यर्थ जागी मला शोधा असे मी याकोबाच्या वंशाना कधीही सांगितले नाही. मी परमेश्वर आहे, जो प्रामाणिकपणे बोलतो; रास्तगोष्टी घोषणा करणारा आहे.
20जे तुम्ही राष्ट्रातून निभावलेले शरणार्थी ते तुम्ही एकत्र जमा व्हा व या. जे कोरीव मूर्तीची लाकडे वाहून नेतात आणि ज्या देवाला तारण करता येत नाही त्याची प्रार्थना करतात त्यांना काही ज्ञान नाही.
21त्यांना जवळ आणा आणि पुरावा आणा, मला घोषणा करा! त्यांना एकत्र येऊन मसलत करू द्या. पूर्वीपासून तुम्हास हे कोणी दाखवले आहे? ते कोणी जाहीर केले? मी, परमेश्वरानेच की नाही? तर जो मी न्यायी देव व तारणारा त्या माझ्यावाचून कोणी दुसरा देव नाही; माझ्यावाचून कोणी नाही.
22अहो पृथ्वीच्या सर्व सीमांनो, माझ्याकडे वळा आणि तारण पावा; कारण मी देव आहे, आणि माझ्याशिवाय दुसरा देव नाही.
23मी आपली शपथ वाहीली आहे, न्यायीपणाच्या माझ्या मुखातून वचन निघाले आहे, ते मागे फिरणार नाही आणि ते असे की माझ्यापुढे प्रत्येक गुडघा वाकेल. प्रत्येक जीभ माझ्यापुढे शपथ वाहील.
24माझ्याविषयी कोणी म्हणेल, फक्त परमेश्वराच्याठायीच तारण व सामर्थ्य आहे. जे सर्व त्याच्यावर रागावले आहेत ते त्याच्यापुढे भीतीने दबकत लज्जित होऊन येतील.
25इस्राएलाचा सर्व वंश परमेश्वराच्याठायी नीतिमान ठरेल; ते त्याचा अभिमान बाळगतील.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.