इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

यशया 42

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1पाहा, माझा सेवक, ज्याला मी उचलून धरतो; माझा निवडलेला, याच्या विषयी माझा जीव आनंदीत आहेः मी आपला आत्मा त्याच्याठायी ठेवीन; तो राष्ट्रावर न्याय आणील.
2तो मोठ्याने ओरडणार नाही किंवा आरोळी ठोकणार नाही किंवा त्याचा आवाज रस्त्यावर ऐकू येऊ देणार नाही.
3तो चेपलेला बोरू मोडणार नाही आणि मिणमिणती वातसुध्दा तो विझवणार नाही. तो प्रामाणिकपणे न्याय देईल.
4पृथ्वीवर न्याय प्रस्थापित करीपर्यंत तो मंदावणार नाही किंवा धैर्यहीन होणार नाही; आणि किनारपट्टीवरील देश त्याच्या नियमशास्त्राची वाट पाहतील.
5परमेश्वर देव हे म्हणत आहे, ज्याने आकाश निर्माण केले आणि त्यास विस्तारीले; ज्याने पृथ्वी पसरली आणि ज्यामध्ये जीवन दिले आहे; तो त्यावरील लोकांस श्वास देतो आणि त्यावर राहणाऱ्यांना जिवन देतो;
6मी, परमेश्वराने, तुला न्यायानुसार बोलाविले आहे आणि तुझा हात धरीन. मी तुझे रक्षण करीन आणि तुला लोकांसाठी करार व परराष्ट्रीयांसाठी प्रकाश देणारा असे करीन.
7आंधळ्यांचे डोळे उघडावे, बंदिवानांना अंधारकोठडीतून आणि अंधारात बसलेल्यांना बंदीगृहातून सोडवावे.
8“मी परमेश्वर आहे, हे माझे नाव आहे; आणि मी आपले गौरव दुसऱ्यांबरोबर किंवा कोरीव मूर्तीबरोबर आपली स्तुती वाटून घेणार नाही.
9पाहा, पूर्वीच्या गोष्टी घडून चुकल्या आहेत, आता मी नवीन घटनेबद्दल जाहीर करतो. त्या होण्यापूर्वी मी त्याबद्दल तुम्हास सांगत आहे.”
10परमेश्वरास नवीन गाणे गा, आणि पृथ्वीच्या शेवटापासून, जे तुम्ही खाली समुद्रात जाता आणि त्याच्यात जे आहे ते सर्व, किनाऱ्यावरील देश आणि तेथे राहणारे त्याची स्तुती करा.
11वाळवंटांनो आणि नगरांनो आरोळी मारा, ज्या खेड्यात केदार राहतो, मोठ्याने आनंदाने ओरडा! सेलात राहणाऱ्यांनो गायन करोत, डोंगरमाथ्यावरून आरोळी करोत.
12त्यांना परमेश्वरास गौरव देऊ द्या आणि किनाऱ्यावरील देशात त्याची स्तुती जाहीर करोत.
13परमेश्वर शूर योध्द्याप्रमाणे बाहेर जाईल; तो युद्धवीरासारखा पुढे जाईल. तो आपल्या आवेशाने उत्तेजित होईल. तो ओरडेल, होय! तो आपल्या युद्धाची मोठ्याने ओरडून गर्जना करील; तो आपल्या शत्रूंना आपले सामर्थ्य दाखवील.
14बराच वेळ मी काही बोललो नाही; मी स्तब्ध राहिलो आणि स्वतःवर संयम ठेवला; आता मी प्रसूतिवेदना होणाऱ्या स्त्रीसारखा मोठ्याने ओरडेन, मी उसासे व धापा टाकीन.
15मी टेकड्या आणि पर्वत उध्वस्त करीन आणि त्यांचे सर्व झाडेझुडपे मी सुकवून टाकीन; आणि मी नद्यांची बेटे करीन आणि पाणथळ जमीन कोरडी करीन.
16मी आंधळ्यांना माहीत नसलेल्या मार्गाने आणीन, त्यांना माहीत नसलेल्या वाटेने मी त्यांना नेईन, मी त्यांच्यापुढे अंधाराचा प्रकाश करीन, वाकडी ठिकाणे सरळ करीन. या गोष्टी मी करीन आणि मी त्यांना सोडणार नाही.
17जे कोणी कोरीव मूर्तीवर भरवसा ठेवतात, ओतीव मूर्तींना म्हणतात, तुम्ही आमचे देव आहात. ते मागे वळतील, ते पूर्णपणे लज्जित होतील.
18तुम्ही बहिऱ्यांनो ऐका; आणि तुम्ही आंधळ्यांनो, तुम्हास दिसावे म्हणून तुम्ही पाहा.
19माझ्या सेवकाशिवाय कोण आंधळा आहे? किंवा ज्याला मी पाठवले त्या माझ्या निरोप्यासारखा बहिरा कोण आहे? माझ्या कराराच्या भागीदारासारखा किंवा परमेश्वराच्या सेवकासारखा आंधळा कोण आहे?
20तुम्ही पुष्कळ गोष्टी पाहता, परंतु त्याचे आकलन होत नाही; त्याचे कान उघडे आहेत, परंतु कोणी एक ऐकत नाही.
21परमेश्वर आपल्या न्यायीपणामुळे आणि नियमशास्त्र वैभवशाली केल्याने खूश झाला.
22पण हे लोक लुटलेले आणि लुबाडलेले आहेत; ते सर्व खड्ड्यामध्ये सापळ्यात पडलेले आहेत, तुरुंगात कैदी झाले आहेत; ते सर्व लूट असे झाले आहेत त्यांना सोडवणारा कोणी नाही आणि त्यांना परत माघारी म्हणणारा कोणी नाही!
23तुमच्यातील याकडे कोण कान देईल? भविष्यात कोण कान देऊन ऐकेल आणि श्रवण करील?
24याकोबाला लुटीस व इस्राएलास लुटणाऱ्यांस कोणी दिले? ज्या परमेश्वराविरूद्ध आम्ही पाप केले, त्याच्या मार्गाने चालण्यास त्यांनी नकार दिला आणि त्याचे नियम पाळण्याचे त्यांनी नाकारले त्यानेच की नाही?
25म्हणून त्याने आपला भडकलेला कोप त्यांच्याविरुद्ध नासधूसीच्या युद्धासह ओतला. त्याने त्यांच्या सभोवती आग लावली तरी त्यांना कळले नाही; त्यास जाळले. पण तरी तो मनावर घेईना.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.