इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

यशया 15

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1मवाबाबद्दलची घोषणा. खरोखर, एका रात्रीत मवाबाचे आर वैराण आणि नाश करण्यात आले; खरोखर एका रात्रीत मवाबाचे कीर वैराण आणि नाश करण्यात आले.
2दीबोनाचे लोक मंदिरापर्यंत, उच्चस्थानावर रडण्यास चढून गेले; नबो व मेदबा यांच्यासाठी मवाब विलाप करत आहे. त्यांच्या सर्वांची डोकी मुंडिलेली आहेत व त्यांच्या सर्वांच्या दाढ्या कापलेल्या आहेत.
3ते आपल्या रस्त्यात गोणताट पांघरून आहेत; आपल्या घराच्या धाब्यावर आणि आपल्या चौकात प्रत्येकजण आक्रोश करीत आहेत, अश्रू गाळीत आहेत
4हेशबोन व एलाले आरोळी मारत आहेत; त्यांचा आवाज याहसापर्यंत ऐकू जात आहे. यामुळे मवाबाचे शस्त्रधारी माणसे आरोळ्या देत आहेत; त्यांचा जीव त्यांच्यात थरथरत आहे.
5मवाबाकरता माझे हृदय ओरडते; तिचे शरणार्थी सोअर आणि एगलाथ-शलिशीया येथवर पळून गेले आहेत. लूहीथच्या चढणीवर ते रडत रडत चढत आहेत; होरोनाईमाच्या वाटेवर त्यांच्या नाशासाठी मोठ्याने आक्रोश करीत आहेत.
6पण निम्रीमाचे पाणी आटले आहे; गवत सुकून गेले आहे आणि नवीन गवत नाहीसे झाले आहे; काहीच हिरवे नाही.
7यास्तव त्यांनी वाढवलेली विपुलता आणि साठवलेले आहे ते, वाळुंजाच्या ओढ्यापलीकडे घेऊन जात आहेत.
8मवाबाच्या प्रदेशामध्ये सगळीकडे रडणे चालले आहे; त्यांचा आकांत एग्लाइमापर्यंत आणि बैर-एलीमापर्यंत त्यांचा आक्रोश पोहचला आहे.
9दीमोनाचे पाणी रक्ताने भरले आहेत; पण मी दीमोनावर अधिक जास्त संकटे आणीन. जे मवाबापासून निसटले आहेत आणि जे देशात बाकी आहेत त्यांच्यावर सिंह हल्ला करतील.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.