इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

यशया 13

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1आमोजाचा पुत्र यशया याने बाबेलाविषयी स्विकारलेली घोषणा.
2उघडया डोंगरावर इशारा देणारा ध्वज उभारा, त्यांना मोठयाने हाक मारा, त्यांनी सरदारांच्या द्वारात यावे म्हणून त्यांना हाताने खुणवा.
3मी आपल्या पवित्र केलेल्यांस आज्ञा केली आहे, होय, माझ्या क्रोधास्तव मी माझ्या पराक्रमी लोकांस, तसेच गर्वाने उल्लासीत होणाऱ्या माझ्या लोकांस बोलाविले आहे.
4अनेक लोकांच्या समुदायाच्या गोंगाटाप्रमाणे, अनेक राष्ट्रांच्या राजाच्या एकत्र जमल्याप्रमाणे डोंगरात गलबला होत आहे. सेनाधीश परमेश्वर लढाईसाठी फौज तयार करत आहे.
5ते दूर देशातून, दिगंतापासून येत आहेत. परमेश्वर त्याच्या न्यायाच्या शस्त्रांसहीत संपूर्ण देशाचा नाश करावयास येत आहे.
6आक्रोश करा, कारण परमेश्वराचा दिवस समीप आहे; सर्वसमर्थाकडून विनाशासहीत तो येत आहे.
7त्यामुळे सर्व हात गळाले आहेत, आणि प्रत्येक हृदय विरघळले आहे;
8ते अगदी घाबरतील; प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे वेणा व वेदना यांनी त्यांना घेरले आहे. ते विस्मयाने एकमेकांकडे पाहतील; त्यांची मुखे ज्वालेच्या मुखांसारखी होतील.
9पाहा, क्रोध आणि संतापाने भरून वाहणारा रोष, असा परमेश्वराचा दिवस येत आहे अशासाठी की देश उजाड आणि तिच्यातून पाप्यांचा नाश करायला येत आहे.
10आकाशाचे तारे आणि नक्षत्रे आपला प्रकाश देणार नाहीत. अरुणोदयापासूनच सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र प्रकाशणार नाही.
11मी जगाला त्यांच्या वाईटासाठी आणि दुष्टांला त्यांच्या अपराधासाठी शिक्षा करीन. मी गर्विष्ठांचा उद्धटपणा आणि निर्दयांचा गर्व उतरवील.
12मी पुरुषांना उत्कृष्ट सोन्यापेक्षा अधिक दुर्मिळ करील आणि मानवजात ओफीरच्या शुध्द सोन्याहून शोधण्यास कठिण करील.
13म्हणून मी आकाश हादरून सोडील, व पृथ्वी तिच्या स्थानावरून हालविली जाईल, सेनाधीश परमेश्वराचा संताप आणि त्याच्या तीव्र क्रोधाचा दिवस येईल.
14शिकारी झालेल्या हरिणाप्रमाणे किंवा मेंढपाळ नसलेल्या मेंढराप्रमाणे, प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या लोकाकडे वळेल आणि आपल्या देशाकडे पळून जाईल.
15जो कोणी सापडेल त्यास मारण्यात येईल आणि जो कोणी पकडला जाईल त्यास तलवारीने मारण्यात येईल.
16त्यांच्या डोळ्यादेखत त्यांची बालके आपटून तुकडे तुकडे करण्यात येतील. त्यांची घरे लुटली जातील आणि त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार होतील.
17पाहा, मी त्यांच्याविरुद्ध माद्य लोकांस हल्ला करण्यासाठी उठवीन, ते रुप्याबद्दल पर्वा करणार नाहीत किंवा ते सोन्याने आनंदीत होणार नाही.
18त्यांचे बाण तरूणांना भेदून जातील. ते बालकांवर दया करणार नाहीत आणि मुलांना सोडणार नाहीत.
19आणि राज्याचे अधिक कौतुक, खास्द्यांच्या वैभवाचा अभिमान अशी बाबेल, तिला सदोम आणि गमोराप्रमाणे देवाकडून उलथून टाकण्यात येईल.
20ती कधी वसविली जाणार नाही आणि पिढ्यानपिढ्यापासून तिच्यामध्ये कोणी राहणार नाहीत. अरब आपले तंबू तेथे ठोकणार नाहीत किंवा मेंढपाळ आपले कळप तेथे विसाव्यास नेणार नाहीत.
21परंतु रानातील जंगली पशू तेथे पडतील. त्यांची घरे घुबडांनी भरतील; आणि शहामृग व रानबोकड तेथे उड्या मारतील.
22तरस त्यांच्या किल्ल्यात आणि कोल्हे त्याच्या सुंदर महालात ओरडतील. तिची वेळ जवळ आली आहे आणि तिच्या दिवसास विलंब लागणार नाही.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.