इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

होशेय 7

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1जेव्हा मी इस्राएलास आरोग्य देऊ पाहतो, तेव्हा एफ्राईमाचे पाप आणि शोमरोनाची अधमता उघड होते. ते कट रचतात, चोर आत शिरतो, आणि रस्त्यावर लुटारुंची टोळी हल्ला करते.
2मी त्यांचे दुराचार आठवतो; याची त्यांना त्यांच्या हृदयात जाणीवही नाही, त्यांच्या कृत्यांनी त्यांना घेरले आहे, ते माझ्या मुखासमोर आहे.
3ते आपल्या वाईटाने राजाला, आणि लबाडीने अधिकाऱ्याला खूश करतात.
4ते सर्व व्यभिचारी आहेत. जसा भटारी भट्टी पेटवून कनिक भिजवतो; व ते खमिराने फुगत नाही तसे ते आहेत.
5राजाच्या शुभ दिवशी अधिकारी मद्य पिऊन मस्त झाले; मग त्याने आपला हात थट्टा करणाऱ्यांच्या हाती दिला.
6भट्टीसारख्या हृदयाने ते कपटी आणि फसव्या योजना करतात. त्यांचा राग रात्रभर अग्नीसारखा धुमसतो, आणि सकाळी धगधगणाऱ्या आग्नीसारखा जळतो.
7ते सर्व भट्टी सारखे गरम आहेत, ते आपल्या राज्यकर्त्यांस गिळून टाकतात, त्यांचे सर्व राजे पतन पावले आहे, त्यांच्यातील कोणीही माझा धावा करीत नाही.
8एफ्राईम त्या लोकांसोबत मिसळतो, एफ्राईम न पलटलेल्या भाकरीसारखा झाला आहे.
9परक्यांनी त्याची ताकद गिळली आहे; पण त्यास हे ठाऊक नाही. त्याचे काही केस पांढरे झाले आहेत, पण ते त्यास माहित नाही.
10इस्राएलाचा गर्व त्यांच्या विरोधात साक्ष देतो, इतके असूनही ते आपला देव परमेश्वराकडे वळत नाहीत, हे करण्यापेक्षा ते त्यास शोधत नाही.
11एफ्राईम कबुतरा सारखा भोळा व भावनाहीन आहे, तो मिसराला हाक मारतो, नंतर अश्शूरास उडून जातो.
12जेव्हा ते जातील, मी आपले जाळे त्यांच्यावर टाकेन, आकाशतल्या पक्षांप्रमाणे मी त्यांना खाली आणिन, लोकांच्या समुदायामध्ये मी त्यांना शिक्षा करीन.
13हायहाय, त्यांना! कारण ते मजपासून बहकले आहेत. त्यांच्यावर नाश येत आहे! त्यांनी माझ्याविरुध्द फितुरी केली आहे. मी त्यांची सुटका केली असती; पण त्यांनी माझ्या विरोधात लबाडी केली आहे.
14त्यांनी त्यांच्या हृदयापासून माझा धावा केला नाही, परंतू ते पलंगावर पडून धान्य व नव्या द्राक्षरसासाठी विलाप करतात, ते माझ्यापासून बहकले आहेत.
15जरी मी त्यास शिक्षण दिले आणि त्यांना बाहूबल दिले, आता ते माझ्या विरोधात कट रचतात.
16ते परत फिरतात, पण ते मी जो सर्वोच्च देव आहे, त्याकडे फिरत नाही, ते फसव्या धनुष्यासारखे झाले आहेत, त्यांचे अधिकारी आपल्या जिभेच्या उन्मतपणामुळे तलवारीने पाडले जातील, मिसरात त्यांची थट्टा करण्यात येईल.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.