इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

होशेय 4

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1इस्राएलाच्या लोकांनो, परमेश्वराचा शब्द ऐका, या देशातील लोकांविरुध्द परमेश्वराचा वाद आहे; कारण या देशामध्ये सत्यता किंवा करारबध्द विश्वासूपणा, देवाचे ज्ञान नाही.
2तर येथे शाप देणे, लबाड बोलणे, जीव घेणे, चोरी करणे आणि व्यभिचार करणे आहे. या लोकांनी सर्व नियम मोडले आहेत व इथे रक्तपातानंतर रक्तपात होत आहे.
3म्हणून ही भूमी कोरडी पडत आहे, जो कोणी येथे राहतो तो नाश पावत आहे, रानपशू, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासेही नाहीसे होत आहेत.
4पण कुणालाही वाद घालू देऊ नका, कोणीही कोणावर आरोप न लावो, कारण याजकांनो हे तुम्ही आहात ज्यांस मी दोष लावत आहे.
5आणि तू दिवसा अडखळून पडशील आणि तुझासुद्धा भविष्यवादीही रात्री अडखळून पडेल; आणि मी तुझ्या आईचा नाश करेन.
6माझे लोक ज्ञान नसल्याने नाश पावत आहेत. कारण तुम्ही ज्ञानास नाकारले म्हणून मी सुध्दा तुम्हास माझे याजक म्हणून नाकारीन. माझे, तुमच्या देवाचे नियमशास्त्र तुम्ही विसरलात म्हणून मी ही तुमच्या मुलांना विसरेन.
7जसे हे याजक वाढत गेले तसे ते माझ्या विरोधात पाप करत गेले. मी त्यांचा सन्मान लाजेमध्ये बदलून टाकीन.
8ते माझ्या लोकांच्या पापावर जगतात. त्यांच्या दुष्टतेकडे त्याचे मन लागलेले आहे.
9आणि जसे लोक तसा याजक असे होईल, आणि मी त्यांच्या आचरणामुळे त्यांना शासन करीन, आणि त्यांना त्यांच्या कर्मांचे फळ देईन.
10ते खातील पण ते त्यास पुरणार नाही; ते व्यभिचार करतील पण त्यांची वाढ होणार नाही, कारण ते आपला देव, परमेश्वर, यापासून खूप दूर गेले आहेत.
11वेश्यागमन, द्राक्षरस, आणि नवा द्राक्षरस यांनी त्यांचा विवेक काढून घेतला आहे.
12माझे लोक त्यांच्या लाकडी मुर्तीचा सल्ला घेतात, त्यांच्या काठ्या त्यांना भविष्य सांगतात. गुंतागुंतीच्या आत्म्याने त्यांना बहकवले आहे, आणि त्यांनी माझा, त्यांच्या परमेश्वराचा त्याग केला आहे.
13ते पर्वतांच्या शिखरावर बलिदान करतात आणि टेकडयांवर धूप जाळतात, ओक, हिवर, आणि धूप जाळतात, कारण त्यांची सावली चांगली (छान) असते; म्हणून तुमच्या मुली जारकर्म करतात व सुना व्यभिचार करतात.
14तुमच्या मुली जारकर्म करतात व सुना व्यभिचार करतात तेव्हा मी त्यांना शासन करणार नाही कारण पुरुष स्वत: वेश्येकडे वेगळे होऊन जातात, आणि कलावंतिणींबरोबर यज्ञ करतात; हे विवेकहीन लोक आहेत, ते नाश पावतील.
15हे इस्राएला जरी तू व्यभिचार केला आहेस, तरी यहूदा दोषी न होवो; तुम्ही लोकहो, गिल्गालास जाऊ नका, वर बेथ अवेनास जाऊ नका, परमेश्वरांच्या जिविताची शपथ वाहू नका.
16कारण इस्राएल हट्टी कालवडी सारखा हट्टी वागला आहे. मग परमेश्वर त्यास कोकरे जसे कुरणात चरतात तसा गायरानात कसा आणणार?
17एफ्राईम मुर्तीसोबत एक झाला आहे, त्यास एकटे सोडा.
18त्यांचा द्राक्षरस आंबट झाला आहे; ते एकसारखे व्यभिचार करतच राहतात. तिच्या अधिकाऱ्यास अप्रतिष्ठा अतिप्रिय आहे.
19वारा आपल्या पंखात तिला लपेटून नेईन, आणि ते आपल्या बलिदानांमुळे लज्जित होतील.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.