इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

इब्री लोकांस पत्र 5

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1प्रत्येक यहूदी महायाजकाची निवड लोकांमधून होते आणि लोकांच्या वतीने त्यांच्या पापांसाठी यज्ञ व दाने ही दोन्ही देवाला अर्पावी, त्या कामाकरता महायाजक नेमलेला असतो.
2जे चुका करतात व जे अज्ञानी आहेत, त्यांच्याशी प्रत्येक मुख्य याजक सौम्यपणे वागू शकतो कारण तो स्वतः दुर्बल असतो.
3आणि त्या दुर्बलपणामुळे त्याने त्याच्या पापांसाठी तसेच लोकांच्या पापांसाठी अर्पणे केलीच पाहिजेत.
4आणि कोणीही मुख्य याजकपणाचा बहुमान स्वतःच्या पुढाकाराने घेत नसतो, तर अहरोनाला होते तसे त्यालाही देवाचे पाचारण असणे आवश्यक असते.
5त्याचप्रमाणे, ख्रिस्ताने महायाजक होण्याचा गौरव स्वतःहून आपणावर घेतले नाही, परंतु देव ख्रिस्ताला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस आज मी तुला जन्म दिला आहे.”
6दुसऱ्या शास्त्रभागात तो असे म्हणतो, “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस.”
7येशूने आपल्या देहाच्या दिवसात देवाकडे मोठ्याने ओरडून आणि रडून प्रार्थना व विनंत्या केल्या. जो देव त्यास मृत्युपासून वाचवू शकत होता आणि देवाविषयीच्या त्याच्या सदभक्तीमुळे येशूच्या प्रार्थना ऐकण्यात आल्या.
8जरी तो देवाचा पुत्र होता, तरी त्याने जे दुःख सोसले त्यापासून तो आज्ञाधारकपणा शिकला.
9आणि नंतर त्यास परिपूर्ण केल्यावर. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी सार्वकालिक तारणाकर्ता तो झाला
10व मलकीसदेकाच्या संप्रदायास अनुसरून देवाकडून तो महायाजक म्हणून नियुक्त झाला.
11याविषयी सांगण्यासारखे पुष्कळ आहे, पण तुम्हास ते स्पष्ट करणे कठीण आहे कारण तुम्ही ऐकण्यात खूप मंद झाला आहात.
12आतापर्यंत तुम्ही शिक्षक व्हायला हवे होते, तरी देवाच्या शिक्षणाचे प्राथमिक धडे पुन्हा तुम्हास कोणीतरी शिकविण्याची गरज आहे. तुम्हास दुधाची गरज आहे, जड अन्नाची नाही असे तुम्ही झाला आहात.
13कारण जो कोणी अजून दुधावरच राहतो तो नीतिमत्त्वाच्या वचनाशी पोक्त नाही कारण अजून तो बाळच आहे.
14परंतु ज्यांच्या ज्ञानेद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट पारख करण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.