इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

उत्पत्ति 21

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेकडे लक्ष दिले, आणि परमेश्वराने सारेला वचन दिल्याप्रमाणे केले.
2अब्राहामाच्या म्हातारपणी सारा गरोदर राहिली, त्यास जी नेमलेली वेळी देवाने सांगितली होती त्या वेळी त्याच्यापासून सारेला मुलगा झाला.
3अब्राहामाला जो मुलगा सारेपासून झाला त्याचे नाव त्याने इसहाक ठेवले.
4देवाने आज्ञा केल्याप्रमाणे अब्राहामाने त्याचा मुलगा इसहाक आठ दिवसाचा झाल्यावर त्याची सुंता केली.
5इसहाकाचा जन्म झाला तेव्हा अब्राहाम शंभर वर्षांचा होता.
6सारा म्हणाली, “देवाने मला हसवले आहे; जो कोणी हे ऐकेल तो प्रत्येकजण माझ्याबरोबर हसेल.”
7आणखी ती असेही म्हणाली, “सारा या मुलाला स्तनपान देईल असे अब्राहामाला कोण म्हणाला असता? आणि तरीसुद्धा त्याच्या म्हातारपणात मला त्याच्यापासून मुलगा झाला आहे!”
8मग बालक वाढत गेला आणि त्याचे स्तनपान तोडले, आणि इसहाकाच्या स्तनपान तोडण्याच्या दिवशी अब्राहामाने मोठी मेजवानी दिली.
9मग साराची मिसरी दासी हागार हिचा मुलगा इश्माएल जो तिला अब्राहामापासून झाला होता, तो चेष्टा करीत आहे असे सारेने पाहिले.
10म्हणून सारा अब्राहामाला म्हणाली, “या दासीला व तिच्या मुलाला येथून बाहेर घालवून द्या. या दासीचा मुलगा, माझा मुलगा इसहाक याच्याबरोबर वारस होणार नाही.”
11त्याच्या मुलामुळे या गोष्टीचे अब्राहामाला फार दुःख झाले.
12परंतु देव अब्राहामाला म्हणाला, “मुलाकरता व तुझ्या दासी करता दुःखी होऊ नकोस. तुला ती या बाबतीत जे काही सांगते, ते तिचे सर्व म्हणणे ऐक. कारण इसहाकाद्वारेच तुझ्या वंशाला नाव देण्यात येईल.
13मी त्या दासीच्या मुलाचेही राष्ट्र करीन, कारण तो तुझा वंशज आहे.”
14अब्राहाम सकाळीच लवकर उठला, भाकरी व पाण्याची कातडी पिशवी घेतली आणि हागारेला देऊन तिच्या खांद्यावर ठेवली. त्याने तिचा मुलगा तिला दिला आणि तिला पाठवून दिले. ती गेली आणि बैर-शेबाच्या रानामध्ये भटकत राहिली.
15कातडी पिशवीतील पाणी संपले, तेव्हा हागारेने आपल्या मुलाला एका झुडपाखाली टाकले.
16नंतर ती बरीच दूर म्हणजे बाणाच्या टप्प्याइतकी दूर जाऊन बसली, कारण तिने म्हटले “मला माझ्या मुलाचे मरण पाहायला नको.” ती त्याच्या समोर बसून मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडू लागली.
17देवाने मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि देवाचा दूत स्वर्गातून हागारेला हाक मारून म्हणाला, “हागारे, तुला काय झाले? भिऊ नकोस, तुझा मुलगा जेथे आहे तेथून त्याचा आवाज देवाने ऐकला आहे
18ऊठ, मुलाला उचलून घे. आणि त्यास धैर्य दे, मी त्याच्यापासून एक मोठे राष्ट्र करीन.”
19मग देवाने हागारेचे डोळे उघडले आणि तिने पाण्याची विहीर पाहिली. ती गेली आणि पाण्याची कातडी पिशवी भरून घेतली आणि मुलाला पाणी प्यायला दिले.
20देव त्या मुलाबरोबर होता आणि तो वाढला. तो रानात राहिला आणि तिरंदाज बनला.
21तो पारानाच्या रानात राहिला आणि त्याच्या आईने त्यास मिसर देशातील मुलगी पत्नी करून दिली.
22त्यानंतर अबीमलेख व त्याचा सेनापती पिकोल यांनी अब्राहामाशी बोलणी केली, ते म्हणाले, “तू जे काही करतोस त्यामध्ये देव तुझ्याबरोबर आहे;
23म्हणून आता येथे देवाची शपथ वाहा की, तू माझ्याशी व माझ्यामागे माझ्या मुलांशी किंवा माझ्या वंशजाशी खोटेपणाने वागणार नाहीस. जसा मी तुझ्याशी करार करून विश्वासूपणाने राहिलो, तसाच तू माझ्याशी व ज्या या माझ्या देशात तू राहिलास त्याच्याशी राहशील.”
24आणि अब्राहाम म्हणाला, “मी शपथ वाहतो.”
25मग अबीमलेखाच्या सेवकांनी पाण्याची विहीर बळकावली म्हणून अब्राहामाने अबीमलेखाकडे तक्रार केली.
26अबीमलेख म्हणाला, “असे कोणी केले आहे ते मला माहीत नाही. ह्यापूर्वी तू हे मला कधीही सांगितले नाहीस. आजपर्यंत मी हे ऐकले नव्हते.”
27म्हणून अब्राहामाने मेंढरे व बैल घेतले आणि अबीमलेखास दिले आणि त्या दोन मनुष्यांनी करार केला.
28अब्राहामाने अबीमलेखाला कळपातील सात कोकरे वेगळी करून त्यांच्यापुढे ठेवली.
29अबीमलेख अब्राहामाला म्हणाला, “ही सात कोकरे तू वेगळी करून ठेवली याचा अर्थ काय आहे?”
30त्याने उत्तर दिले, “तू ही कोकरे माझ्याकडून स्विकारशील तेव्हा ही विहीर मी खणली आहे असा तो पुरावा होईल.”
31तेव्हा त्याने त्या जागेला बैर-शेबा असे नाव दिले, कारण त्या ठिकाणी त्या दोघांनी शपथ वाहून वचन दिले.
32त्यांनी बैर-शेबा येथे करार केल्यानंतर अबीमलेख व त्याचा सेनापती पिकोल हे पलिष्ट्यांच्या देशात परत गेले.
33अब्राहामाने बैर-शेबा येथे एक एशेल झाड लावले. तेथे सनातन देव परमेश्वर याचे नाव घेऊन त्याने प्रार्थना केली.
34अब्राहाम पलिष्ट्यांच्या देशात पुष्कळ दिवस परदेशी म्हणून राहिला.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.