इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

पौलाचे गलतीकरांस पत्र 2

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1नंतर, चौदा वर्षांनी मी पुन्हा, बर्णबाबरोबर, यरूशलेम शहरास वर गेलो, मी आपल्याबरोबर तीतालाही नेले.
2मला प्रकटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो आणि जे शुभवर्तमान मी परराष्ट्रीयात गाजवत असतो, ती मी त्यांच्यापुढे मांडले; पण जे विशेष मानलेले होते त्यांना एकांती मांडले; नाही तर, मी व्यर्थ धावतो किंवा धावलो, असे कदाचित् झाले असते.
3पण माझ्याबरोबर असलेला तीत हा ग्रीक असल्यामुळे, त्यालाही सुंता करून घेण्यास भाग पाडण्यात आले नाही.
4आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूमुळे देखील भाग पाडण्यात आले नाही; ते आम्हास दास्यात घालण्याकरता, ख्रिस्त येशूमध्ये जी मोकळीक आपल्याला आहे ते हेरण्यास, चोरून आत आले होते.
5शुभवर्तमानाचे सत्य तुमच्याकडे रहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभरही वश होऊन त्यांच्या अधीन झालो नाही.
6तरीही, जे विशेष मानलेले कोणी होते त्यांच्याकडून (ते कसेहि असोत होते त्याचे मला काही नाही; देव मनुष्याचे बाह्य रूप पाहत नाही.) कारण जे विशेष मानलेले होते त्यांनी मला काही अधिक दिले नाही.
7तर उलट सुंता झालेल्या यहूद्यांना शुभवर्तमान सांगणे जसे पेत्रावर सोपवले होते तसेच सुंता न झालेल्या परराष्ट्रीय लोकांस शुभवर्तमान सांगणे माझ्यावर सोपवले आहे, हे त्यांनी बघितले.
8कारण ज्याने पेत्राच्याद्वारे सुंता झालेल्या लोकात प्रेषितपणा चालवावयास शक्ती पुरवली त्याने मलाही परराष्ट्रीयात तो चालवण्यास शक्ती पुरवली.
9आणि त्यांनी मला दिलेले कृपादान ओळखून, याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ होते त्यांनी मला व बर्णबाला उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आपण देवाच्या कार्यांत सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे आणि त्यांनी सुंता झालेल्याकडे जावे.
10मात्र आम्ही गरिबांची आठवण ठेवावी, अशी त्यांची इच्छा होती; आणि मी तर त्याच गोष्टी करण्यास उत्कंठीत होतो.
11आणि त्यानंतर, केफा अंत्युखियास आला असता, मी त्याच्यासमोर त्यास आडवा आलो, कारण तो दोषीच होता.
12कारण याकोबापासून कित्येकजण येण्याअगोदर तो अन्यजाती लोकांबरोबर जेवत असे; पण ते आल्यावर तो सुंता झालेल्या लोकांस भिऊन त्याने माघार घेऊन वेगळा राहू लागला.
13तेव्हा तसेच दुसर्‍या यहूदी विश्वास ठेवणाऱ्यांनीही त्याच्याबरोबर ढोंग केले; त्यामुळे बर्णबादेखील त्यांच्या ढोंगाने ओढला गेला.
14पण मी जेव्हा हे बघितले की, शुभवर्तमानाच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत, तेव्हा सर्वांसमोर मी केफाला म्हटले, “तू स्वतः यहूदी असून तू जर परराष्ट्रीयाप्रमाणे राहतोस आणि यहूद्यांप्रमाणे वागत नाहीस, तर जे परराष्ट्रीयांनी यहूद्यांसारखे वागावे म्हणून तू त्याच्यावर जुलूम करितोस हे कसे?”
15आम्ही जन्मापासूनच यहूदी आहोत, पापी परराष्ट्रीयातले नाही.
16तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे ठरतो, हे ओळखून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला; ह्यासाठी की, विश्वासाने मनुष्य नीतिमान ठरवला जातो, म्हणून आम्हीही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला; म्हणजे आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी पाळून नाही, कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्यजातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही.
17पण ख्रिस्तात नीतिमान ठरवले जाण्यास पाहत असता जर आपणदेखील पापी आढळलो तर ख्रिस्त पापाचा सेवक आहे काय? कधीच नाही.
18कारण मी जे पाडले आहे ते पुन्हा उभारले तर मी स्वतःला नियमशास्त्र मोडणारा ठरवीन.
19कारण मी नियमशास्त्राद्वारे नियमशास्त्राला मरण पावलो आहे, ह्यासाठी की, मी देवाकरता जगावे.
20मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जगणे आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्याद्वारे आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले.
21मी देवाची कृपा व्यर्थ करीत नाही कारण जर नीतिमत्त्व नियमशास्त्राकडून असेल तर ख्रिस्ताचे मरण विनाकारण झाले.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.