इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

एज्रा 7

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1यानंतर, पारसाचा राजा अर्तहशश्त याच्या कारकीर्दीत, एज्रा, जो सरायाचा मुलगा, अजऱ्याचा मुलगा, हिल्कीयाचा मुलगा,
2जो शल्लूमचा मुलगा, जो सादोकाचा मुलगा, जो अहीटूबचा मुलगा,
3जो अमऱ्याचा मुलगा, जो अजऱ्याचा मुलगा आणि जो मरायोथचा मुलगा,
4जो जरह्याचा मुलगा, जो उज्जीचा मुलगा, आणि जो बुक्कीचा मुलगा
5जो अबीशूवाचा मुलगा, जो फिनहासचा मुलगा आणि जो एलाजाराचा मुलगा, जो प्रमुख याजक अहरोन याचा मुलगा.
6हाच एज्रा बाबेलाहून गेला. परमेश्वर इस्राएलचा देव याने जे मोशेचे नियमशास्त्र दिले होते त्यामध्ये एज्रा निपुण नियमशास्त्र शिक्षक होता. परमेश्वर देवाचा हात त्याच्यावर असल्यामुळे त्याने जे काही मागितले ते सर्व राजाने त्यास दिले.
7राजा अर्तहशश्त याच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी, काही इस्राएली लोक आणि याजक, लेवी, गायक, व्दारपाल व ज्यांना मंदिराच्या सेवेसाठी नेमले होते, तेसुध्दा वर यरूशलेमेला गेले.
8राज्याच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षाच्या पाचव्या महिन्यात एज्रा यरूशलेमेत आला.
9पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी त्याने बाबेल सोडले. देवाचा चांगला हात त्याच्याबरोबर असल्यामुळे, तो पाचव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी यरूशलेमेला पोहोंचला.
10एज्राने परमेश्वराच्या नियमशास्त्राचे मन:पूर्वक अध्ययन करून त्याचे पालन करण्यास, व इस्राएलांस त्यातील नियम व विधी शिकविण्यात आपले मन लावले.
11राजा अर्तहशश्ताने, एज्रा, जो याजक व जो परमेश्वर देवाने इस्राएलांस दिलेल्या नियमशास्त्राचा शिक्षक होता, त्यास दिलेला हा आदेश होय;
12“स्वर्गातील देवाचा नियमशास्त्राचा शिक्षक व याजक एज्रा यास, राजांचा राजा अर्तहशश्त याजकडून,
13मी असा आदेश देत आहे की, माझ्या राज्यातील इस्राएल लोक आणि त्यांचे याजक व लेवी, यांच्यापैकी ज्या कोणाला तुझ्याबरोबर यरूशलेमेला जाण्याची इच्छा असेल, त्याने जावे.
14तुजजवळ जे देवाचे नियमशास्त्र आहे त्याप्रमाणे यहूदा आणि यरूशलेम याविषयी तपास करावा म्हणून राजा व त्याचे सात सल्लागार तुला पाठवत आहोत.
15इस्राएलचा देव ज्याचे घर यरूशलेममध्ये आहे. ज्याला तू सोनेचांदी स्वखुशीने अर्पण केले आहे. ते तू न्यावेस.
16जे लोक तसेच याजक आपल्या देवाचे घर जे यरूशलेमेत आहे त्यासाठी स्वखुशीने अर्पण करीत असतील त्यांच्या स्वखुशीच्या अर्पणाबरोबर जे सोनेचांदी सर्व बाबेल प्रांतात तुला मिळेल ते सर्वही न्यावे.
17या पैशातून तू बैल, मेंढे, कोकरे घे. तसेच त्या सोबतची अन्नार्पणे आणि पेयार्पणेही विकत घे. मग ती यरूशलेमेमधील तुमच्या देवाच्या मंदिरातील वेदीवर अर्पण कर.
18यातून उरलेल्या त्या सोन्यारुप्याचा वापर तू आणि तुझे भाऊबंद यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे आपल्या देवाला आवडेल तसा करा.
19तुमच्या देवाच्या मंदिरातील उपासनेसाठी जी पात्रे दिली आहेत, ती तू यरूशलेमेस त्यापुढे सोपवून दे.
20देवाच्या मंदिरासाठी आणखी कश्याची गरज असेल जे तुला द्यावे लागेल तर ते तू माझ्या खजिन्यातून त्याचा खर्च कर.
21आता, मी, राजा अर्तहशश्त, असा आदेश काढतो की नदीपलीकडच्या सर्व खजिनदारांनी जे काही एज्रा तुम्हाजवळ मागेल ते पूर्ण द्यावे,
22एज्राला द्यायच्या गोष्टी पुढीलप्रमाणे: चांदी शंभर किक्कारपर्यंत, गहू शंभर कोरपर्यंत, द्राक्षरस शंभर बथपर्यंत, तेल शंभर बथपर्यंत, अमर्याद मीठ द्यावे.
23स्वर्गीय देवाचा हा आदेश आहे, हे सर्व स्वर्गातील देवाच्या घरासाठी भक्तीने करावे. देवाचा माझ्यावर व माझ्या मुलांच्या राज्यावर कोप का होऊ द्यावा?
24आम्ही तुम्हास कळवतो की, मंदिरातील सर्व याजक, लेवी, गायक, द्वारपाल, मंदिरातील नेमलेले सेवेकरी आणि देवाच्या मंदिरातील सेवक यांच्याकडून कोणताही कर, खंडणी, जकात घेऊ नये.
25एज्रा देवाने जे ज्ञान तुला दिले त्याच्यायोगे तू शास्ते व धार्मिक आणि न्यायाधीश यांची नेमणूक कर. तुझ्या देवाचे नियम जाणणाऱ्या नदीच्या पलीकडील लोकांचे ते न्यायाधीश होतील. आणि ज्यांना देवाचे नियम माहीत नाहीत अशांना ते शिकवतील.
26जो कोणी तुमच्या देवाच्या आज्ञा किंवा राजाचे आदेश पाळणार नाही त्यास शासन झाले पाहिजे. त्यास मृत्युदंड, हद्दपार, मालमत्तेची जप्ती, कैद करायचे ते त्याने केलेल्या गुन्ह्याच्या स्वरुपावर अवलंबून राहील.”
27परमेश्वर आमच्या पूर्वजांचा देव धन्यवादित असो. यरूशलेमेमधील जे देवाचे मंदिर ते शोभिवंत करावे अशी इच्छा देवानेच राजाच्या मनात घातली.
28आणि राजा, त्याचे सल्लागार आणि सर्व पराक्रमी अधिकारी यांची माझ्यावर कृपादृष्टी होईल असे केले आहे आणि परमेश्वर माझा देव याचा हात माझ्यावर होता. मी इस्राएलातील पुढारी माझ्याबरोबर जाण्यासाठी जमवले.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.