इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

यहेज्केल 48

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1ही वंशाची नावे आहेत. दानाचा वंश देशाचा एक विभाग स्विकारील. त्याची सीमा उत्तर सीमेपासून हेथलोनाकडच्या वाटेजवळ, हामाथाच्या प्रवेशापर्यंत दिमिष्काच्या सीमेवरील हसर-एनान, उत्तरेकडे हमाथाजवळ. दानाची सीमा त्याच्या पूर्वेकडून सर्व मार्गाने महासमुद्राकडे जाईल.
2दानाच्या दक्षिण सीमेपाशी पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत एक विभाग तो आशेराचा.
3आशेराबरोबर दक्षिण सीमेचा एक विभाग नफतालीचा, त्याच्या पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत पसरलेला.
4नफतालीबरोबर दक्षिण सीमेचा एक विभाग मनश्शेचा, पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंतचा विस्तारीत प्रदेश.
5मनश्शेबरोबर त्याच्या दक्षिण सीमेचा एक विभाग पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत तो एफ्राईमाचा.
6एफ्राईमाच्या दक्षिण सीमेच्या पूर्वबाजूपासून ते पश्चिमबाजूपर्यंत एक विभाग रऊबेनाचा.
7रऊबेनाबरोबरच्या बाजूच्या सीमेच्या पूर्व ते पश्चिम एक विभाग तो यहूदाचा.
8यहूदाच्या सीमेस लागून असलेला जो पूर्व बाजूपासून ते पश्चिम बाजूपर्यंत विस्तारलेला प्रदेश पंचवीस हजार हात रुंद व इतर वंशांना मिळालेल्या विभागाइतका पूर्व बाजूपासून ते पश्चिम बाजूपर्यंत लांब तो समर्पित अंश म्हणून अर्पाल आणि त्याच्या मध्यभागी पवित्रस्थान होईल.
9तुम्ही जो प्रदेश परमेश्वरास अर्पण कराल तो लांबीला पंचवीस हजार हात व रुंदीला वीस हजार हात असावा.
10पवित्र प्रदेशाचा विभाग हा नेमून दिला होता, हा समर्पित प्रदेश याजकांचा; ही जमीन उत्तरेला पंचवीस हजार हात लांबीची, पूर्वेला व पश्चिमेला दहा-दहा हजार हात रुंदीची असेल. तिची दक्षिणेला लांबी पंचवीस हजार हात असावी. त्याच्या बरोबर मध्यावर परमेश्वराचे मंदिर असेल.
11सादोकाच्या वंशजातले जे याजक पवित्र झालेले आहेत ज्या कोणी माझी सेवा निष्ठेने केली, त्यांच्यासाठी तो होईल. जेव्हा इस्राएली लोक बहकून गेली तेव्हा जसे लेवी बहकले तसे ते बहकले नाहीत. इस्राएलाच्या लोकांबरोबर बहकले नाहीत.
12त्यास देशातील अर्पिलेल्या प्रदेशातून हा एक प्रदेश त्यांना परमपवित्र होईल; तो लेवींच्या सीमेपाशी असेल.
13याजकांच्या सीमेपाशी लेव्यांना पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद प्रदेश मिळावा. त्यांना पूर्ण लांबी रुंदीची, म्हणजे पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद जमीन असावी.
14त्यांनी या जमिनीची विक्री वा अदलाबदली करु नये. इस्राएल देशातील कोणतेही प्रथमफळे वेगळे करून इतर प्रदेशाकडे जाऊ देऊ नये. कारण तो भाग परमेश्वरास पवित्र आहे.
15उरलेली जमीन, पंचवीस हजार हात लांबीच्या प्रदेशापैकी जो पांच हजार हात रुंदीचा भाग राहील तो नगरासाठी सार्वजनिक, कुरणासाठी, घरे बांधण्यासाठी उपयोगात येईल. नगर ह्याच्या मध्यावर असावे.
16नगरीची मापे पुढीलप्रमाणे असतील, उत्तर बाजू चार हजार पाचशे हात, दक्षिण बाजू चार हजार पाचशे हात पूर्व व पश्चिम बाजूही तेवढ्याच म्हणजे चार हजार पाचशे हात.
17नगरासाठीचे कुरण उत्तरेकडे अडीचशे हात, दक्षिणेकडे अडीचशे हात, व पूर्वेकडे अडीचशे हात व पश्चिमेकडे अडीचशे हात असावे.
18आणि पवित्र अर्पिलेल्या प्रदेशासमोर जो उरलेला प्रदेश तो लांबीने पूर्वेकडे दहा हजार हात. व पश्चिमेला दहा हजार हात होईल; आणि तो पवित्र अर्पिलेल्या प्रदेशासमोर होईल; त्याचे उत्पन्न नगरातील कामगारांसाठी अन्नासाठी होईल.
19सर्व इस्राएलाच्या वंशांतून जे कोणी नगरात काम करतील त्या लोकांनी त्या जागेची मशागत करावी.
20सर्व अर्पिलेला प्रदेश पंचवीस हजार हात लांब आणि पंचवीस हजार रुंद होईल; ह्याप्रकारे तुम्ही प्रदेशाचे पवित्र अर्पण एकत्रितपणे नगराच्या विभागासाठी द्यावे.
21“तो अर्पिलेला भाग व नगराचे विभाग यांच्या एका बाजूला व दुसऱ्या बाजूला जो उरलेला भाग आहे तो अधिपतीचा असावा. अर्पिलेल्या प्रदेशाच्या पंचवीस हजार हातांच्यासमोर पूर्व सीमेकडे आणि पश्चिमेकडे पंचवीस हजार हातांच्यासमोर पश्चिम सीमेकडे, वंशाच्या विभागासमोर जो प्रदेश आहे तो अधिपतीसाठी असावा आणि पवित्र अर्पिलेला प्रदेश व मंदिराचे पवित्रस्थान त्याच्या मध्यभागी असावे.
22ह्यातील काही हिस्सा याजकाचा, काही लेवींचा व काही मंदिराकरिता आहे. मंदिर या भागाच्या मध्यभागी आहे. शिल्लक राहिलेली जमीन देशाच्या राजाच्या मालकीची आहे. राजाला, बन्यामीनची जमीन व यहूदाची जमीन यांच्यामधील जमीन मिळेल.
23आणि बाकीच्या वंशास, पूर्व बाजूपासून पश्चिमबाजूपर्यंत, त्यातला एक बन्यामीनाचा भाग.
24बन्यामिनाच्या सीमेपाशी त्याच्या पूर्वबाजूपासून पश्चिमबाजूपर्यंत तो शिमोनाचा विभाग.
25शिमोनाच्या सीमेपाशी पूर्व बाजूपासून पश्चिमबाजूपर्यंत तो इस्साखाराचा विभाग.
26इस्साखाराच्या सीमेपाशी पूर्वबाजूस पश्चिमबाजूपर्यंत तो जबुलूनाचा विभाग.
27जबुलूनाच्या सीमेपाशी पूर्वबाजूपासून पश्चिमबाजूपर्यंत, गादाचा, एक विभाग.
28गादाच्या सीमेपाशी दक्षिण बाजूस, दक्षिणेकडे, तामारापासून मरीबोथ कादेशाच्या जलापर्यंत, नदीकडे मोठ्या समुद्रापर्यंत सीमा होईल.
29ज्या देशाची वाटणी तुम्ही चिठ्ठ्या टाकून इस्राएलाच्या वंशास वतनासाठी विभागणी कराल तो हाच आहे. त्यांचे विभाग हेच आहेत.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
30ही नगराची बाहेर निघण्याची ठिकाणे आहेत. उत्तर बाजूस मापाने चार हजार पाचशे हात लांब असेल.
31नगराच्या वेशी, तिला तीन द्वारे असतील, इस्राएल वंशाच्या नावाप्रमाणे त्यांची नावे, रऊबेनचे द्वार, यहूदाचे द्वार व लेवीचे द्वार.
32पूर्व बाजू चार हजार पाचशे हात लांब असेल. तिला तीन द्वारे असतील. योसेफाचे द्वार, बन्यामीनाचे द्वार व दानाचे द्वार.
33दक्षिण बाजूसुद्धा चार हजार पाचशे हात लांब असेल. तिलाही शिमोनाचे द्वार, इस्साखाराचे द्वार व जबुलूनाचे द्वार अशी तीन द्वारे असतील.
34पश्चिम बाजूही चार हजार पाचशे हात लांब असेल. तिच्या तीन द्वारांची नावे पुढीलप्रामाणे असतील. गादाचे द्वार, आशेराचे द्वार व नफतालीचे द्वार.
35ते सभोवतीचे अंतर अठरा हजार हात असेल. त्या दिवसापासून नगरीचे नाव ‘परमेश्वर तेथे आहे’ असे पडेल.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.