इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

यहेज्केल 44

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1नंतर त्या मनुष्याने मला परत, पूर्वेकडे तोंड असलेल्या, मंदिराच्या बाहेरच्या प्रवेशद्वारापाशी आणले. ते घट्ट बंद होते.
2परमेश्वर मला म्हणाला, “हे दार बंद केलेले राहील. ते उघडणार नाही. ह्यामधून कोणीही मनुष्य जाणार नाही. कारण परमेश्वर इस्राएलाचा देव यातून आत गेला आहे; म्हणून ते बंद केलेले राहीन.
3इस्राएलाचा राज्यकर्ता परमेश्वरासमोर त्या प्रवेशद्वारात बसून भोजन करील; या द्वाराजवळच्या द्वारमंडपाच्या वाटेने तो आत येईल व याच्याच वाटेने बाहेर जाईल.”
4मग त्याने मला उत्तरेकडच्या दारातून मंदिरासमोर आणले. मी पाहिले तो पाहा! परमेश्वराच्या तेजाने परमेश्वराचे मंदिर भरले होते; हे पहिले व मी उपडा पडलो.
5मग परमेश्वर मला म्हणाला, “मानवाच्या मुला, परमेश्वराच्या मंदिराविषयीचे सर्व विधी व नियमाबाबत मी जे सर्व तुला सांगतो, त्याकडे लक्ष दे; आपले डोळे उघडून पाहा व कान देऊन ऐक आणि मंदिराच्या प्रवेशाकडे व पवित्रस्थानाच्या बाहेर जाण्याचे मार्ग काळजीपूर्वक पाहा.
6मग तू बंडखोरांना इस्राएलाच्या घराण्यास सांग की, प्रभू परमेश्वर, असे म्हणतो, ‘इस्राएलाच्या घराण्यांनो, तुम्ही सर्व घृणास्पद कृत्ये केली आहेत, ती तुम्हास पुरेशी होवो;
7कारण तुम्ही माझी भाकर, चरबी व रक्त अर्पण करताना जे मनाने व शरीरानेही बेसुंती अश्या परक्या लोकांस माझ्या पवित्रस्थानात आणून माझे मंदिर भ्रष्ट केले आहे. याप्रमाणे तुम्ही माझा करार मोडून आपल्या सर्व अमंगळ कृत्यात भर टाकली आहे.
8तुम्ही माझ्या पवित्र वस्तूंची राखण जबाबदारीने केली नाही, तर तुम्ही आपणासाठी माझ्या पवित्रस्थानाची काळजी घेण्याचे काम दुसऱ्याला दिले.”
9प्रभू परमेश्वर असे म्हणतो, इस्राएल लोकांच्यात राहणाऱ्या मनाने व शरीराने बेसुंती असलेल्या परक्याने कोणी माझ्या पवित्रस्थानात प्रवेश करू नये.
10जेव्हा इस्राएल भरकटून दूर गेले, तेव्हा लेवीं माझ्यापासून दूर गेले, जे माझ्यापासून भरकटून दूर आपल्या मूर्तीच्या मागे गेले, आता ते आपल्या पापासाठी किंमत देतील.
11ते माझ्या पवित्रस्थानातले सेवक आहेत, ते मंदिराच्या द्वारांचे पहारेकरी आणि मंदिरात सेवा करणारे आहेत. ते लोकांसाठी होमार्पणे व यज्ञबली याचे पशू कापतील; ते त्यांच्यापुढे त्यांची सेवा करायला उभे राहतील.
12पण त्यांनी त्यांच्या मूर्तीपुढे इस्राएल घराण्याची सेवा केली व ते त्यास पापांत पाडणारे अडथळे झाले म्हणून मी आपला हात त्यांच्याविरुद्ध शपथ घेऊन उंचावला आहे आणि ते आपल्या पापासाठी किंमत देतील. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
13म्हणून माझ्याकडे याजकाचे काम करायला ते माझ्याजवळ येणार नाहीत किंवा माझ्या पवित्र वस्तुजवळ, परमपवित्र वस्तू आहेत त्यांजवळ ते येणार नाहीत; त्याऐवजी त्यांनी जे घृणास्पद कृत्ये केली आहेत त्याचा दोषीपणा व निंदा त्यांना सहन करावी लागेल.
14पण मी त्यांना मंदिराची काळजी घेणारे, त्याच्या सर्व सेवेसाठी आणि त्यामध्ये जे काही काम करायचे त्यासाठी नेमीन.
15आणि “पण जेव्हा इस्राएलाचे लोक भरकटून माझ्यापासून दूर गेले, तेव्हा लेवी याजकापैकी सादोकाचे वंशज माझ्या पवित्रस्थानाची कर्तव्ये पूर्ण करीत होते. तेच माझी सेवा करायला माझ्याजवळ येतील; आणि मला चरबी व रक्त अर्पावे म्हणून माझ्यापुढे उभे राहतील.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
16ते माझ्या पवित्रस्थानात येतील. ते माझी आराधना करण्यासाठी माझ्या मेजाजवळ येतील आणि माझी कर्तव्ये पूर्ण करतील.
17ते आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वारातून आत आले की त्यांनी तागाची वस्त्रे घालावीत. आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वारात काम करताना अथवा मंदिरात सेवा करताना ते लोकरीची वस्त्रे घालू नयेत.
18त्यांच्या डोक्यास तागाचे फेटे असावेत व त्यांच्या कमरेची अंतर्वस्त्रेही तागाची असावीत. त्यांना घाम येईल अशी वस्रे त्यांनी घालू नयेत.
19जेव्हा ते बाहेरील अंगणात लोकांकडे बाहेर जातील, तेव्हा त्यांच्या वस्रांच्या स्पर्शाने लोक पवित्र होऊ नयेत म्हणून त्यांनी सेवेच्या वेळेची वस्रे काढून पवित्र खोल्यात ठेवावी व दुसरी वस्रे घालावी.
20त्यांनी आपली डोकी मुंडन करू नयेत वा केस लांब वाढू देऊ नयेत तर त्यांनी आपले केस कातरुन बारीक करावे.
21आतल्या अंगणात जाताना कोणत्याही याजकाने द्राक्षरस पिऊ नये.
22कोणत्याही याजकाने विधवेशी वा घटस्फोटितेशी लग्न करु नये. त्यांनी इस्राएली वंशातील कुमारीकेशी लग्न करावे अथवा जी पूर्वी याजकाची पत्नी होती अशी विधवा, तिच्याशी लग्न करावे.
23त्यांनी माझ्या लोकांस “शिक्षण द्यावे. पवित्र व सामान्य, आणि शुद्ध व अशुद्ध ह्यातील फरक त्यास दाखवून द्यावा.
24वादविवादाचा न्याय करण्यास त्यांनी तत्पर असावे. माझ्या निर्णयाप्रमाणे त्यांनी निवाडा करावा. ते माझ्या सर्व नेमलेल्या सणात माझे विधी व माझे नियम पाळतील, आणि माझे शब्बाथ दिवस पवित्र पाळावेत.
25मृताच्या जवळ जाऊन ते अशुद्ध होणार नाहीत, पण मृत पुरुष जर याजकाची स्वत:ची वडील, आई, मुलगा, मुलगी, भाऊ अथवा अविवाहित बहीण असेल, तर मात्र मृताजवळ गेले व अशुद्ध झाले तरी चालेल.
26याजक शुद्ध झाल्यानंतर, लोकांनी त्याच्यासाठी सात दिवस मोजावे.
27मग तो पवित्र जागी जाऊ शकतो. पण ज्या दिवशी तो पवित्रस्थानातील सेवा करण्यासाठी आतल्या अंगणात जाईल, त्यादिवशी त्याने आपले पापार्पण करावे.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
28आणि हे त्याचे वतन आहे, मी त्यांचे वतन आहे. म्हणून त्यांना इस्राएलामध्ये वाटा नाही. मी त्यांचा वाटा आहे.
29त्यांना अन्नार्पण, दोषार्पण, पापार्पण ही त्यांनी खावी. इस्राएलांनी वाहिलेली हरएक वस्तू त्यांची व्हावी.
30सर्वप्रथम फळांचा प्रथमभाग, समर्पित अंश म्हणून अर्पण करावयाची प्रत्येक वस्तू याजकाची व्हावी; तुम्ही मळलेल्या पिठाचा पहिला भाग याजकाचा असेल. अशासाठी की, तुझ्या घरात आशीर्वाद राहावा.
31पक्ष्यातले किंवा पशूतले जे काही आपोआप मरण पावलेले किंवा फाडलेले असेल ते याजकांनी खाऊ नये.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.