इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

यहेज्केल 30

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,
2“मानवाच्या मुला, भविष्य सांग आणि म्हण. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, विलाप करा, मोठ्या शोकाचे दिवस येत आहे!
3तो दिवस नजीक आहे. परमेश्वराचा दिवस जवळ आहे. तो ढगाळ दिवस असेल. ती राष्ट्रांसाठी न्यायाची वेळ असेल.
4मग मिसराविरूद्ध तलवार येईल आणि जेव्हा मारलेले लोक मिसरात पडतील तेव्हा कूशात वेदना होतील, ते तिची संपत्ती घेऊन जातील आणि तिचे पाये नष्ट होतील.
5कूशी, पूटी, लूदी आणि सर्व परदेशी, याजबरोबर करार केलेले लोक त्यासह तलवारीने पडतील.
6परमेश्वर असे म्हणतो, मग जो कोणी एक मिसराला मदत करील तो पडेल आणि तिच्या सामर्थ्याचा गर्व खाली उतरेल. मिग्दोलापासून सवेनेपर्यंतचे त्याचे सैनिक तलवारीने पडतील. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
7ते जे देश ओसाड झाले आहेत त्यांच्यामध्ये ते घृणास्पद होतील आणि त्यांची नगरे नाश झालेल्या नगरात असतील.
8जेव्हा मी मिसरामध्ये आग लावीन आणि तिच्या सर्व सहाय्यकांचा नाश करीन. तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.
9त्या दिवशी, सुरक्षित कूशी लोकांस दहशत बसवायला माझ्यापासून दूत जहाजात बसून निघून जातील; आणि त्या दिवशी तेथे मिसरांच्यामध्ये न चुकणाऱ्या वेदना त्यांच्यावर येतील. कारण पाहा! ती येत आहे!
10प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी मिसराचा समुदाय बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याच्या हाताने नाहीसा करीन.
11तो व त्याच्याबरोबर त्याची सेना, राष्ट्राची दहशत, देशाचा नाश करण्यासाठी आणण्यात येईल; ते मिसराविरूद्ध आपल्या तलवारी काढतील व देश मरण पावलेल्या लोकांनी भरुन टाकतील.
12मी नद्यांना कोरडी भूमी करीन आणि मी देश दुष्ट मनुष्यांच्या हाती विकत देईन. मी, परमेश्वर, सांगतो की परक्यांच्या हातून हा देश व यातले सर्व काही यांची नासधूस करवीन. मी, परमेश्वर, असे सांगत आहे.
13प्रभू परमेश्वर असे म्हणतोः मी मूर्तींचा नाश करीन आणि मी नोफातून कवडीमोलाच्या मूर्त्त्यां नाहीशा करीन. ह्यापुढे मिसर देशामध्ये कोणीही अधिपती होणार नाही आणि मी मिसर देशावर दहशत ठेवीन.
14मी पथ्रोसला ओसाड करीन. व सोअनास आग लावीन. मी नो याला न्यायदंड करीन.
15कारण मी मिसराचा बालेकिल्ला जो सीन त्यावर मी आपल्या क्रोधाग्नीचा वर्षाव करीन. व नोच्या समुदायाला कापून काढीन.
16मी मिसराला आग लावीन. सीनला खूप वेदना होतील व नो मोडून पडेल. प्रत्येक दिवशी नोफावर शत्रू येतील.
17आवेन व पी-बेसेथ येथील तरुण पुरुष तलवारीने पडतील आणि त्यांची नगरे बंदिवासात जातील.
18जेव्हा मी तहपन्हेस येथे मिसराची जोखडे तोडीन तेव्हा त्यादिवशी मी त्यांचा प्रकाश धरून ठेवीन आणि त्यांच्या सामर्थ्याचा गर्व नाहीसा होईल. तिला ढग झाकेल आणि तिच्या मुलींना कैद करून नेले जाईल.
19अशा रीतीने, मी मिसरावर न्यायादंड आणीन, मग त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.”
20मग अकराव्या वर्षात, पहिल्या महिन्याच्या सातव्या दिवशी, परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,
21“मानवाच्या मुला, मिसराचा राजा फारो याचा भुज मी मोडला आहे. पाहा! त्याच्या हाताला तलवार धरण्याची शक्ती यावी म्हणून त्यास बरे करण्यासाठी औषधोपचार करून पट्टी लावून त्यास कोणीही बांधले नाही.
22यास्तव प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी मिसराचा राजा फारो! याच्याविरूद्ध आहे. मी त्याचे दोन्ही हात एक चांगला असलेला व दुसरा मोडलेला आहे तोही मोडीन. आणि त्याच्या हातातून तलवार गळून पडेल असे मी करीन.
23मग मी मिसऱ्यांना राष्ट्रांमध्ये विखरुन टाकीन आणि त्यांना देशामध्ये उधळून लावीन.
24मी बाबेलाच्या राजाचे बाहू बळकट करीन. आणि आपली तलवार त्यांच्या हाती देईन. यासाठी की, मी फारोचे बाहू तोडीन. मग तो बाबेल राजासमोर मरणाऱ्या मनुष्याप्रमाणे कण्हण्यांनी कण्हून ओरडेल.
25कारण मी बाबेलाच्या राजाचे बाहू बळकट करीन, पण फारोचे बाहू गळून पडतील. जेव्हा मी मिसर देशावर उगारण्यासाठी आपली तलवार बाबेल राजाच्या हातात ठेवीन. मग तो तीने त्यांच्या देशावर हल्ला करील. तेव्हा ते जाणतील की परमेश्वर आहे.
26म्हणून मी मिसऱ्यांना राष्ट्रांत विखरुन टाकीन आणि त्यांना देशातून पांगविन. मग ते जाणतील की मीच परमेश्वर आहे.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.