इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

निर्गम 5

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1या गोष्टी घडल्यानंतर, मोशे व अहरोन फारोकडे गेले व त्यास म्हणाले, “इस्राएली लोकांचा देव परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनी माझ्यासाठी रानात उत्सव करावा म्हणून त्यांना जाऊ दे.”
2फारो म्हणाला, “हा परमेश्वर कोण आहे? मी त्याचा शब्द का ऐकावा आणि इस्राएलाला जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वरास ओळखत नाही. म्हणून इस्राएलाला मी जाऊ देणार नाही.”
3मग अहरोन व मोशे म्हणाले, “इब्री लोकांचा देव आम्हांशी बोलला आहे. म्हणून आम्हांला रानात तीन दिवसाच्या वाटेवर जाऊ द्यावे आणि तेथे आमचा देव परमेश्वर याल यज्ञार्पण करू द्यावे अशी आम्ही आपणाला विनंती करतो. आणि आम्ही जर असे केले नाही तर तो मरीने किंवा तलवारीने आमच्यावर तुटून पडेल.”
4परंतु मिसराचा राजा फारो त्यांना म्हणाला, “हे मोशे, हे अहरोना, तुम्ही लोकांस काम सोडून जायला का लावता? तुम्ही आपल्या कामावर माघारी चालते व्हा.
5फारो त्यांना असेही म्हणाला, येथे आता आमच्या देशात खूप इब्री आहेत आणि तुम्ही त्यांना काम करण्यापासून थांबवत आहात.”
6त्याच दिवशी फारोने मुकादमांना व नायकांना आज्ञा दिली.
7तो त्यांना म्हणाला, “तुम्ही लोकांस विटा बनवण्याकरिता आजपर्यंत सतत गवत दिलेले आहे. परंतु आता त्यांना लागणारे गवत त्यांना स्वत: शोधून आणायला सांगा.
8तरी पूर्वी इतक्याच विटा त्यांनी बनवल्या पाहिजेत. त्यामध्ये काही कमी करून स्वीकारू नका. कारण ते आळशी झाले आहेत. म्हणूनच ते ओरड करून म्हणतात, आम्हांला जाण्याची परवानगी दे आणि आमच्या देवाला यज्ञ करू दे.
9तेव्हा त्यांच्यावर अधिक काम लादून त्यांना सतत कामात ठेवा. म्हणजे मग खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत.”
10म्हणून लोकांचे मुकादम व नायक लोकांकडे जाऊन म्हणाले, “फारो असे म्हणतो, तुम्हास विटा बनवण्यासाठी लागणारे गवत देणार नाही.
11तेव्हा तुम्हास लागणारे गवत तुम्ही स्वत:च आणले पाहिजे. तुमचे काम काही कमी होणार नाही.”
12म्हणून मग लोक गवत शोधण्याकरता सर्व मिसर देशभर पांगले.
13त्यांच्यावर नेमलेले मुकादम त्यांच्याकडून अधिक काम करवून घेऊन पूर्वी इतक्याच विटा तयार करण्याकरता त्यांच्यामागे सतत तगादा लावत.
14मिसराच्या मुकादमांनी इस्राएली लोकांवर नायक नेमले होते. त्यांना फारोच्या मुकादमांनी मार देऊन विचारले की, “तुम्ही पूर्वी जेवढ्या विटा बनवत होता तेवढ्या आता का बनवत नाही?”
15मग इस्राएली नायक तक्रार घेऊन फारोकडे गेले व म्हणाले, “आम्ही जे तुमचे सेवक त्या आमच्याशी तुम्ही अशा प्रकारे का वागत आहा?
16तुम्ही आम्हांला गवत देत नाही, परंतु पूर्वी इतक्याच विटा बनवण्याचा हुकूम करता, आणि आता आपल्या दासांना मार मिळत आहे. पण सारा दोष आपल्या लोकांचा आहे.”
17फारो म्हणाला, “तुम्ही आळशी आहात, म्हणूनच तुम्ही म्हणता, आम्हांला परमेश्वरास यज्ञ करायला जाऊ देण्याची परवानगी दे.
18आता आपल्या कामावर माघारी जा. तुम्हास गवत काही मिळायचे नाही, परंतु पूर्वीप्रमानेच विटा तुम्ही केल्या पाहिजेत.
19आपण संकटात आहोत हे इस्राएली नायकांना समजले. कारण पूर्वी इतक्याच विटा व रोजचे काम त्यांना शक्य नव्हते.”
20फारोच्या भेटीनंतर परत जाताना त्यांना वाटेत मोशे व अहरोन भेटले;
21तेव्हा ते मोशे व अहरोन ह्यांना म्हणाले, “परमेश्वर तुम्हांकडे पाहो व तुम्हास शिक्षा करो. कारण फारो व त्याचे सेवक यांच्या दृष्टीने तुम्ही आम्हांला अपमानकारक केले आहे. आम्हांला मारून टाकण्यासाठी तुम्ही त्यांच्या हातात जणू तलवारच दिली आहे.”
22मग मोशेने परमेश्वराकडे परत जाऊन प्रार्थना करून म्हटले, “प्रभू, तू या लोकांस का त्रास देत आहेस? पहिली गोष्ट म्हणजे तू मला का पाठवलेस?
23मी तुझ्या नावाने बोलण्यासाठी फारोकडे आलो, तेव्हापासून तो या लोकांस त्रास देत आहे. आणि तू आपल्या लोकांस मुक्त तर मुळीच केले नाहीस.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.