इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

निर्गम 39

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे पवित्रस्थानातील सेवेसाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाची सुताची कुशलतेने विणलेली वस्रे केली; अहरोनासाठीही पवित्र वस्रे बनवली.
2त्यांनी सोन्याच्या जरीचे आणि निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाच्या सुताचे व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे एफोद तयार केले.
3त्यांनी सोने ठोकून त्याचे पातळ पत्रे केले व ते पत्रे कापून त्याची तार केली आणि ती कुशल कारागिराकडून निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुतामध्ये व कातलेल्या तलम सणाच्या कापडामध्ये भरली.
4त्यांनी एफोदसाठी खांदपट्ट्या केल्या व त्या एफोदाच्या दोन्ही टोकांना जोडल्या.
5एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर जी कुशलतेने विणलेली पट्टी असते तिची बनावट त्याच्यासारखीच असून ती अखंड तुकड्याची केली. ती सोन्याच्या जरीची, निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाच्या सुताची व कातलेल्या तलम सणाच्या कापडाची केली. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.
6मुद्रेवर छाप कोरतात तशी त्यांनी इस्राएलाच्या मुलांची नावे गोमेद रत्नावर कोरली व ती रत्ने सोन्याच्या कोंदणात बसवली.
7इस्राएल लोकांची स्मारकरत्ने व्हावी म्हणून ती एफोदाच्या खांदपट्ट्यांवर लावली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले.
8त्यांने कुशल कारागिराकडून एफोदप्रमाणेच सोन्याच्या जरीचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा ऊरपट बनवून घेलता.
9तो ऊरपट चौरस होता. त्यांनी तो दुहेरी केला; तो दुहेरी असून तो एक वीत लांब व एक वीत रुंद असा चौरस होता.
10त्यामध्ये रत्नांच्या चार रांगा बसविल्या; पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक;
11दुसऱ्या रांगेत पाचू इंद्रनीलमणी व हिरा;
12तिसऱ्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग;
13आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे, ही सर्व रत्ने सोन्याच्या जाळीदार कोंदणात बसविली.
14इस्राएलाच्या पुत्रांसाठी एक याप्रमाणे ती बारा रत्ने ऊरपटावर होती. त्यांच्या बारा वंशांच्या संख्येइतकी बारा नावे होती. एकेका रत्नावर एकेका मुलाचे नाव मुद्रा कोरतात त्याप्रमाणे त्यांनी कोरले होते.
15दोरीसारखा पीळ घातलेल्या शुद्ध सोन्याच्या साखळ्या त्यांनी ऊरपटावर लावल्या.
16सोन्याची दोन जाळीदार कोंदणे व सोन्याच्या दोन कड्या बनवून त्या ऊरपटाच्या दोन्ही टोकास लावल्या.
17ऊरपटाच्या टोकास लावलेल्या दोन्ही कड्यांत पीळ घातलेल्या सोन्याच्या साखळ्या घातल्या.
18पीळ घातलेल्या दोन्ही साखळ्यांची दुसरी दोन टोके सोन्याच्या कोंदणात खोचून त्या त्यांनी एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर समोरच्या बाजूला लावल्या.
19सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या ऊरपटाच्या दोन्ही टोकांवर एफोदाच्या आतील बाजूच्या कडेला एफोदाजवळ लावल्या.
20सोन्याच्या आणखी दोन कड्या करून एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर खालून त्याच्यासमोर त्याच्या सांध्याजवळ कुशलतेने विणलेल्या पट्टीवर लावल्या.
21त्यांनी त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांनी निळ्या, फितीने अशा बांधल्या की ऊरपट एफोदाच्या पट्ट्यांवर राहावा व तो ऊरपट एफोदावरून घसरू नये. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी हे सर्व केले.
22नंतर बसालेलने एफोदाबरोबर घालावयचा निळ्या रंगाच्या सुताचा झगा विणून घेतला.
23त्यांनी झग्याच्या मध्यभागी एक भोक ठेवले व त्या दरम्यान झगा फाटू नये म्हणून त्या भोकाच्या किनारीला सभोवती कापडाचा गोट शिवला.
24मग त्यांनी त्या झग्याच्या खालच्या घेराभोवती कातलेल्या तलम सणाच्या कापडाची व निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या कापडाची डाळिंबे काढली.
25नंतर त्यांनी शुद्ध सोन्याची घुंगरे केली व ती झग्याच्या खालच्या घेराभोवती दोन दोन डाळिंबाच्यामध्ये लावली. म्हणजे झग्याच्या खालच्या घेराभोवती घुंगरु मग डाळिंब, पुन्हा घुंगरू मग डाळिंब याप्रमाणे दोन डाळिंबामध्ये एक घुंगरु अशी ती झाली;
26सेवा करते वेळी अंगी घालायच्या झगाच्या घेराच्या काठावर सभोवती एक घुंगरू व एक डाळिंब व एक घुंगरू व एक डाळिंब असे लावले; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे तसेच त्यांनी हे केले.
27अहरोन व त्याच्या मुलांसाठी तलम सणाच्या विणलेल्या कापडाचे अंगरखे केले.
28आणि त्यांनी तलम सणाचे मंदिल, फेटे व कातलेल्या सणाचे चोळणे केले.
29मग त्यांनी तलम सणाच्या कापडाचा व निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाचा वेलबुट्टीदार कमरपट्टा बनविला; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले.
30मग त्यांनी पवित्र मुकुटासाठी शुद्ध सोन्याची पट्टी केली व तिच्यावर “परमेश्वरासाठी पवित्र” अशी अक्षरे कोरली.
31ती मंदिलाभोवती समोर बांधता यावी म्हणून तिला निळी फीत लावली. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले.
32अशा प्रकारे पवित्र निवासमंडपाचे म्हणजे दर्शनमंडपाचे सर्व काम पूर्ण झाले. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले.
33मग त्यांनी तो निवासमंडप मोशेकडे आणला. तंबू व तंबूच्या सर्व वस्तू म्हणजे आकड्या, फळ्या, अडसर, खांब, खांबाच्या उथळ्या;
34आणि लाल रंगवलेली मंडप झाकण्याची मेंढ्यांची कातडी व तहशांची कातडी व अंतरपट;
35साक्षपटाचा कोश, तो वाहून नेण्याचे दांडे आणि दयासन
36मेज, त्यावरील सर्व वस्तू व पवित्र समक्षतेची भाकर;
37शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष, त्यावरील दिवे व त्याची सर्व उपकरणे व दिव्यासाठी तेल;
38सोन्याची वेदी, अभिषेकाचे तेल, सुगंधी धूप आणि तंबूच्या दारासाठी पडदा;
39पितळेची वेदी व तिची पितळेची जाळी, वेदी वाहून नेण्याचे दांडे व तिची सर्व पात्रे, गंगाळ व त्याची बैठक:
40अंगणाचे पडदे व कनाती, खांब व त्याच्या उथळ्या, अंगणाच्या प्रवेशदाराचा पडदा, तणावे, मेखा व पवित्र निवासमंडपाच्या व दर्शनमंडपाच्या सेवेसाठी लागणारे सर्व साहित्य;
41पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्रे, अहरोन याजकाची पवित्र वस्रे आणि याजक या नात्याने सेवा करण्यासाठी त्याच्या पुत्रांची वस्रे ही सर्व त्यांनी आणली;
42परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सगळे काम केले.
43लोकांनी काम केले ते सर्व मोशेने बारकाईने पाहिले; ते त्यांनी अगदी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले होते म्हणून मोशेने त्यांना आशीर्वाद दिला.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.